‘हिल टॉप’, वागातोर येथे चालू असलेल्या छोट्या स्वरूपातील ‘सनबर्न’मध्ये कोरोनाविषयक नियमांचे सर्रास उल्लंघन

(प्रतिकात्मक चित्र)

म्हापसा, २८ डिसेंबर (वार्ता.) – गोवा शासनाने वागातोर समुद्रकिनार्‍यावर होणार्‍या ‘सनबर्न’ या ‘इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टीव्हल’ला अनुज्ञप्ती नाकारल्याने यंदा हा महोत्सव ‘हिल टॉप’, वागातोर या एका खासगी क्लबमध्ये २८ ते ३० डिसेंबर या कालावधीत छोट्या स्वरूपात होत आहे. या महोत्सवात लोकांना आकर्षित करण्यासाठी आयोजकांनी विशेष सवलती ठेवल्या आहेत. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी सामाजिक अंतर पाळले न जाणे, तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश करतांना प्रवेश करणार्‍याचे शरिराचे तापमान पाहिले जाते; मात्र त्यानंतर सामाजिक अंतर पाळणे किंवा प्रवेश करणार्‍यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे कि नाही ? हे पाहिले जात नाही. गोव्यात २७ डिसेंबर या दिवशी कोरोनाचा नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’चा पहिला रुग्ण आढळल्याने सरकारने सतर्कतेचे आदेश दिलेले आहेत; मात्र प्रत्यक्षात कार्यक्रमांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे.

यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘सनबर्न’च्या आयोजकांनी छोट्या ‘सनबर्न’ कार्यक्रमासमवेतच प्रसिद्ध कलाकारांचा सहभाग असलेल्या आणि रात्री १० वाजल्यानंतर होणार्‍या अनेक मेजवान्यांचे (पार्ट्यांचे) आयोजन केले आहे. या कार्यक्रमांना ‘सनबर्न गोवा २०२१ आफ्टर डार्क’, असे नाव देण्यात आले आहे. हा कार्यक्रम रात्री १० वाजल्यानंतर वागातोर परिसरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार आहे. सरकारने अनुज्ञप्ती नाकारूनही छोट्या स्वरूपातील ‘सनबर्न’ महोत्सव होत असल्याने अनेक स्थानिक नागरिकांनी सामाजिक माध्यमांमध्ये याविषयी रोष व्यक्त केला आहे. अमली पदार्थ विक्रीसाठी कुप्रसिद्ध असलेला ‘सनबर्न’ कार्यक्रम होऊ दिल्याने उत्तर गोवा काँग्रेसच्या अध्यक्षांनी सरकारवर टीका केली आहे. (हीच काँग्रेस सत्तेत असतांना ‘सनबर्न’ कार्यक्रम होत नव्हता का ? – संपादक) या कार्यक्रमात सहस्रो लोक कोरोना नियमांचे पालन न करता सहभाग घेत असल्याने सरकारच्या कार्यपद्धतीवर काँग्रेसने टीका केली आहे.