|
कणकवली – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करंजे गावचे माजी सरपंच तथा शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकारी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. ‘या प्रकरणात भाजपचे आमदार नितेश राणे यांना अटक करावी आणि या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराचे नाव घोषित करावे’, या मागणीसाठी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली २७ डिसेंबरला येथील पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला, तर शिवसेनेच्या आमदारांनी आमदार राणे यांना अटक करण्याची मागणी विधानसभेत आक्रमकपणे लावून धरली. यावर गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, हे प्रकरण गंभीर असून या प्रकरणाची चौकशी चालू आहे. कुणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. पोलीस अधीक्षकांच्या वतीने या प्रकरणाची चौकशी चालू असून दोषींना सोडले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेचे मुख्य प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनी या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी हरकतीच्या सूत्राद्वारे विधानसभेच्या सभागृहात केली. यावर गृह राज्यमंत्री देसाई यांनी सभागृहात उपरोक्त माहिती दिली.
या प्रकरणी २ दिवसांपूर्वी देहली येथून सचिन सातपुते या संशयित आरोपीला पोलिसांनी कह्यात घेतले आहे. त्याला न्यायालयाने ४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी बजावली आहे. सातपुते यांच्या अटकेमुळे संशयित आरोपींची एकूण संख्या ६ झाली आहे. कणकवलीत सध्या तणावपूर्ण वातावरण असून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल
राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल, कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी कणकवलीत दाखल झाले आहेत. यासह दंगल नियंत्रण पथक, तसेच रत्नागिरी आणि रायगड येथून पोलीस कुमक मागवण्यात आली आहे.
येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकार्यांनी ५ घंटे चर्चा केली.
आमदार राणे यांचा अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न
शिवसैनिक परब यांच्यावर झालेल्या आक्रमणाच्या प्रकरणात अटक होण्याची शक्यता गृहीत धरून आमदार नितेश राणे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. आमदार राणे यांना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळेल कि त्यांना उच्च न्यायालयात जावे लागेल ? हे २८ डिसेंबर या दिवशी अटकपूर्व जामिनासाठीच्या अर्जावर होणार्या सुनावणीनंतर स्पष्ट होणार आहे.
सत्ताधार्यांकडून सुडाचे राजकारण चालू आहे ! – नारायण राणे, केंद्रीय मंत्री
कुडाळ – सत्ताधार्यांनी सिंधुदुर्गात सुडाचे राजकारण आणि दडपशाही चालू केली आहे. कोणतीही खातरजमा न करता पोलिसांनी चालू केलेले अटकसत्र तात्काळ थांबवावे. पोलिसांनी सरकारचे ऐकून सत्तेचा दुरुपयोग करू नये. भाजप कार्यकर्त्यांवर खोट्या तक्रारी प्रविष्ट करण्याचे न थांबल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढू, अशी चेतावणी नितेश राणे यांचे वडील तथा भाजपचे नेते अन् केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी २६ डिसेंबरला पत्रकार परिषदेत दिली.