मुंबई – स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी प्रतिस्पर्धी असलेले दैनिक ‘केसरी’चे संपादक दीपक टिळक यांचा पराभव केला. निवडणुकीत श्री. प्रवीण दीक्षित यांचा १३७ इतक्या मताधिक्यांनी विजय झाला. दीपक टिळक यांना केवळ २ मते मिळाली. २६ डिसेंबर या दिवशी स्मारकामध्ये ही निवडणूक झाली.
प्रवीण दीक्षित हे वर्ष १९७७ च्या तुकडीचे (बॅच) भारतीय पोलीस सेवेतील निवृत्त अधिकारी आहेत. त्यांनी ३९ वर्षे पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्य पार पाडले. महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाच्या प्रमुख पदाचेही दायित्व त्यांनी सांभाळले आहे. नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून वीर सावरकर यांचे विचार भावी पिढीपर्यंत पोचवणे, वीर सावरकर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन संशोधन करणारे आणि त्यासाठी विविध उपक्रम राबवणारे पाठिंबा अन् प्रोत्साहन देणे, वीर सावरकर यांचा अवमान करणार्यांना थोपवणे अन् कायदेशीर कारवाई करणे ही स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यामागील भूमिका प्रवीण दीक्षित यांनी घोषित केली होती.
स्मारकाच्या कार्याविषयी काही सूचना असल्यास अवश्य कळवाव्यात ! – प्रवीण दीक्षित, नवनिर्वाचित अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या समस्त सावरकरप्रेमींनी माझी स्मारकाच्या अध्यक्षपदी निवड केली, त्याविषयी मी सर्व सदस्यांचा आभारी आहे. स्मारकाच्या कार्यासंबंधी काही सूचना असतील, तर त्या सावरकरप्रेमींनी अवश्य कळवाव्यात, अशी माझी सर्वांना विनंती आहे.