लग्नातील चुकीच्या प्रथा बंद होणे, ही काळाची आवश्यकता !

‘सध्या विवाह सोहळ्यांना जोरात आरंभ झाला आहे. अनेक जण ऋण (कर्ज) काढून थाटामाटात लग्न करण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदु धर्मामध्ये गृहस्थाश्रम स्वीकारण्यासाठी विवाह सांगितला आहे. देव, अग्नि, विद्वान आणि ब्राह्मण यांच्या साक्षीने वर-वधू या दोघांनी विवाहबद्ध व्हायचे असते. विवाहामध्ये अनेक प्रकारचे विधी असतात. उदा. सीमांतपूजन, मधुपर्कपूजन, गौरीहरपूजन इत्यादी. विवाहातील विविध मंत्रांचा अर्थ योग्यपणे  समजून घेतला, तर ‘अशा प्रकारेच विवाह झाला पाहिजे’, असे प्रत्येक व्यक्तीला वाटेल. विवाह म्हणजे शिवरूपी पती आणि शक्तीरूपी पत्नी यांचा संगम होय. असे असतांना यामध्ये काही अनिष्ट प्रघात पडू लागले आहेत. त्यामुळे आपण संस्कृती आणि परंपरा जपत आहोत कि भरमसाट व्यय करून स्वतःची प्रतिष्ठा जपत आहोत ? केवळ दिखावा करतांना कर्जाचा डोंगर, तर आपण उभा करत नाही ना? याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.

स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी लग्नपत्रिकेवर सहस्रो रुपये व्यय करणे

श्री. गोविंद चोडणकर

व्याही (वर पक्षाच्या) मंडळींकडून कोणतीही त्रुटी काढली जाऊ नये; म्हणून दक्षता घेतली पाहिजे, यात काहीच दुमत नाही. सध्या स्वतःचा मोठेपणा समाजाला दाखवण्यासाठी अफाट व्यय करण्याची चुकीची प्रथा पडू लागली आहे. उदा. लग्नपत्रिका अत्यंत आकर्षक आणि महागड्या मूल्याची निवडली जाते. पैसा आहे म्हणून सहस्रो रुपये केवळ लग्नपत्रिकेवर व्यय केले जातात.

विवाह लवकर उरकण्यासाठी प्रयत्न केला जाणे

अलीकडे एकाच दिवशी आणि एकाच मुहूर्तावर जवळच्या नातेवाईकांचेही विवाह ठरवले जातात. ते सांभाळतांना सर्वांचीच धावपळ होते आणि केवळ उपस्थितीसाठी काही जण लग्नाला जातात. काही वेळा काही जण पुरोहितांच्या मागेही विधी उरकण्यासाठी तगादा लावतात. धर्मशास्त्राप्रमाणे विवाह होत आहे ना? याचा विचार कुणीही करतांना दिसत नाही.

मुहूर्ताची वेळ उलटून गेल्यावर लग्न होण्याची चुकीची पद्धती रूढ होणे

अनेक वेळा असे दिसून येते की, आनंदाच्या भरात लग्नाचा मुहूर्त उलटून जात आहे, याचाही कुणाला पत्ता नसतो. ‘लग्नाचा मुहूर्त केवळ नावापुरता काढला जातो का ?’, अशी सद्यःस्थिती आहे. मुहूर्त उलटून गेल्यावर लग्न लागल्याची असंख्य उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात.

वधू-वरांवर अक्षता फेकल्या जाणे

मंगलाष्टकांच्या वेळी नातेवाइक आणि पुरोहित यांच्याकडून  वधू-वर यांच्यावर अक्षता फेकल्या जातात. त्याऐवजी वधू-वरांनी एकमेकांना पुष्पहार घालून झाल्यावर आपण त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या मस्तकावर अक्षता वाहू शकतो. लग्न सुरळीत पार पडावे, यासाठी ज्यांनी प्रयत्न केले पाहिजे, तेच गुरुजी वर-वधू यांना अक्षता फेकण्यात व्यस्त असतात.

वधू-वरांनी एकमेकांना हार घालण्यामध्ये पडलेला चुकीचा प्रघात

वधूला हार घालता येऊ नये; म्हणून नवरदेवाला उचलणे किंवा नवरदेवाला हार घालता येऊ नये; म्हणून वधूला उचलणे, हा आणखी एक चुकीचा प्रघात पडला आहे. या चुकीच्या प्रकारामध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला जातो. गुरुजी हा सर्व प्रकार असाहाय्यपणे पहात बाजूला उभे असतात. उपस्थितांपैकी लहान-थोरांकडून या सगळ्या प्रकारांना प्रोत्साहन दिले जाते.

लग्नाचे आयोजन ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ करणार्‍या आस्थापनांना दिल्यामुळे झालेले बाजारीकरण !

अलीकडे बारसे, वाढदिवस किंवा सोसायटीतील पूजा असो, अनेक जण ‘इव्हेंट मॅनेजमेंट’च्या आस्थापनांना (कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन पहाणारी आस्थापने) आमंत्रित करतात. लग्न झकास होण्यासाठीही सध्या ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ करणार्‍या आस्थापनांना हमखासपणे नियोजन दिल्याचे पहायला मिळते. त्यामुळे लग्नामध्ये एका बाजूला चित्रपटातील गाणी, तर दुसर्‍या बाजूला लग्नविधीचे मंत्र चालू असतात. विशिष्ट देवतांचे तत्त्व तेथे यावे, यासाठी हे मंत्र असतात. मग अशा गोंगाटामध्ये देवता येतील का ? सप्तपदी, कन्यादान यांसारखे महत्त्वाचे विधी देव, ब्राह्मण आणि नातेवाइक यांना साक्षी ठेवून करायचे असतात. वास्तविक हे विधी करायचे म्हणून करतांना दिसून येतात.

लग्नामध्ये होणारे अन्य अपप्रकार

लग्नात फटाक्यांची आतषबाजी करणे, कर्णकर्कश आवाजात ध्वनीक्षेपक लावणे, जेवणाच्या वेळी होणारी अन्नाची नासाडी, अस्वच्छता, प्लास्टिक आणि थर्माकोल यांच्या थाळ्या अन् पेले यांचा वापर केल्याने होणारे प्रदूषण या सर्व अन्य वेगळ्या समस्या आहेत. यापेक्षा मंडपात पूर्वी पारंपरिक पद्धतीने पंगतीमध्ये वाढण्यात येणारे भोजन चांगले नव्हते का ?

जगातील सर्व देश त्यांच्या प्रत्येक कृतीला राष्ट्र आणि धर्म यांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्व देतात. आम्ही मात्र केवळ आमचेच हित पहात असतो. लग्न हा एक धर्माच्या दृष्टीने एक महत्त्वाचा संस्कार आहे. त्यामुळे लग्नातील अनिष्ट प्रथांना पायबंद घातला जाणे आवश्यक आहे.

– श्री. गोविंद चोडणकर, गोवा