बेंगळुरू येथील घटना केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचाच नव्हे, तर संपूर्ण हिंदुस्थानचा अपमान ! – शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटना

  • बेंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर शाई फेकल्याचे प्रकरण

  • छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणार्‍या समाजकंटकांवर कठोर कारवाईची मागणी

कुडाळ – बेंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर शाई फेकून विटंबना केल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. हा फक्त शिवरायांचा नाही, तर संपूर्ण हिंदुस्थानचा अपमान आहे. हा अपमान शिवप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी नागरिक कदापि सहन करणार नाही. ज्या समाजकंटकांनी हे कृत्य केले आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, जेणेकरून यापुढे कोणी असे निंदनीय कृत्य करण्यास धजावणार नाही, अशी मागणी शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेने केली आहे. याविषयी २३ डिसेंबर या दिवशी येथील तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे, असे शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

बेंगळुरू येथील घटनेच्या निषेधार्थ शिवाजीनगर, कुडाळ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ एकत्र आलेले शिवप्रेमी

बेंगळुुरू येथील घटनेचा निषेध म्हणून शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेचे शिवप्रेमी शिवाजीनगर, कुडाळ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ एकत्र आले होते. ‘आज असे लक्षात येत आहे की, बरेच राजकीय पक्ष बेंगळुरू प्रकरणाचा स्वत:ची राजकीय पोळी भाजण्यासाठी वापर करत आहेत. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही देणे-घेणे नाही. त्यामुळे तरुणांनी असे राजकीय नेते आणि पक्ष यांच्या नादी न लागता एक शिवप्रेमी म्हणून या घटनेचा निषेध नोंदवावा. कोणत्याही भावनिक आवाहनाला बळी पडून सार्वजनिक मालमत्ता, तसेच सामान्य जनता यांची हानी होईल, अशी कृती करू नये’, असे आवाहन संघटनेच्या वतीने या वेळी करण्यात आले.

या वेळी सर्वश्री किशोर सरनोबत, दिगंबर माने, अभिषेक सावंत, साईप्रसाद मसगे, संतोष आईर, अजय शिरसाट, बंगलेकर, प्रसाद सावंत, माधव भानुशाली, दैवेश रेडकर, रमाकांत नाईक, विवेक पंडीत आदी शिवप्रेमी उपस्थित होते.