‘मॅकडोनाल्ड’ आस्थापनाने ‘झटका’ खाद्यपदार्थही विकावेत ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

  • हिंदू आणि शीख यांना ‘हलाल’ खाद्यपदार्थ उपलब्ध करून ‘मॅकडोनाल्ड’ धार्मिक भावनांचा अनादर करत आहे ! – संपादक

  • अशी मागणी का करावी लागते ? मुसलमानधार्जिण्या आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या विदेशी खाद्यपदार्थ आस्थापनांवर सरकार कारवाई का करत नाही ? – संपादक 
‘मॅकडोनाल्ड’

नवी देहली, २२ डिसेंबर (वार्ता.) – ‘मॅकडोनाल्ड’ खाद्य आस्थापन १०० टक्के ‘हलाल’ प्रमाणित खाद्यपदार्थांची विक्री करत आहे. त्याद्वारे ती ‘हिंदु आणि शीख यांनी ‘हलाल’ मांससेवन करावे’, अशी परिस्थिती निर्माण करत आहे. तसेच ती हिंदु आणि शीख यांच्या राज्यघटनात्मक धार्मिक हक्कांविषयी भेदभावाचे वातावरण निर्माण करत आहे. याविषयी हिंदु जनजागृती समितीकडून मॅकडोनाल्ड आस्थापनाला निवेदन देण्यात आले. तसेच ‘झटका’ खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याचीही यात मागणी करण्यात आली. ‘मॅकडोनाल्ड’च्या उत्तर भारत आणि उत्तर पूर्व भारताचे चालक असणार्‍या ‘कॅनॉट प्लाझा रेस्टोरेंट्स प्रा.लि., देहली या आस्थापनाला हे निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे श्री. श्रीराम लुकतुके आणि श्री. नरेंद्र सुर्वे उपस्थित होते. हे निवेदन आस्थापनाच्या अधिकारी ज्योती राव यांनी स्वीकारले. ‘देशभरांतील शाखांमधून १०० टक्के ‘हलाल’ खाद्यपदार्थ पुरवण्यात येते’, असे मॅकडोनाल्डने ट्वीट करून घोषित केलेले आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या निवेदनात म्हटले आहे की,

१. भारतात बहुसंख्य लोक हिंदू आहेत. धार्मिकदृष्ट्या विचार करता ‘हलाल’ खाद्यपदार्थांची आवश्यकता केवळ मुसलमानांना आहे. याचा अर्थ भारतातील इतर धर्मियांना हे लागू होत नाही. भारत बहु सांस्कृतिक आणि धार्मिक देश आहे. प्रत्येक धर्माच्या स्वतःच्या श्रद्धा आहेत. त्यांना त्याविरुद्ध जाऊन ‘मॅकडोनाल्ड’मध्ये ‘हलाल’ खाद्यपदार्थ खाण्यास बाध्य केले जात आहे.

२. तुम्ही मुसलमानांच्या धार्मिक भावनांचा आदर करण्यासाठी त्यांना ‘हलाल’ खाद्यपदार्थ  देऊ शकता; पण त्यामुळे ‘झटका’ खाद्यपदार्थांचा पर्याय न देता तुम्ही हिंदू आणि शीख यांच्या धार्मिक भावनांचा अनादर करत आहात. त्यामुळे राज्यघटनेच्या सहिष्णु धोरणाला धक्का लागतो. भारतात हिंदू आणि शीख समुदाय एकूण लोकसंख्येच्या ८७ टक्के आहे आणि ते तुमचे मोठ्या प्रमाणात ग्राहकदेखील आहेत.

३. एखाद्या अशासकीय संस्थेकडून उदा. जमात-ए-उलेमा-ए-हिंद सारख्या संस्थेकडून ‘हलाल प्रमाणपत्र’ घेणे हे एकप्रकारे देशविरोधी घटकांना खतपाणी घालण्यासारखे आहे. त्यामुळे राष्ट्रीय हित लक्षात घेऊन धार्मिक सलोखा रहावा, या दृष्टीने मॅकडोनाल्डला निवेदन देण्यात आले आहे.

४. एखाद्या अशासकीय संस्थेकडून ‘हलाल प्रमाणपत्र’ घेऊ नये आणि हिंदू आणि शीख यांना ते खाणे अनिवार्य करू नये. त्यासमवेत तुम्ही तुमच्या असणार्‍या शाखांमधून ‘झटका’ खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यासंबंधीही योजना बनवावी.