‘जीए सॉफ्टवेअर’ आस्थापन काळ्या सूचीत असतांनाही तिच्यासमवेत परत करार का ? – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकही परीक्षा घोटाळ्यांविना होत नाहीत !

देवेंद्र फडणवीस

मुंबई – महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकही परीक्षा घोटाळ्यांविना होत नाहीत, अशी स्थिती आहे. ‘जीए’ सॉफ्टवेअर आस्थापन काळ्या सूचीत होते. यानंतर ३ मासांच्या कालावधीतच तिला काळ्या सूचीतून बाहेर काढून याच आस्थापनासमवेत करार करण्यात आला. यामुळेच परीक्षांमध्ये परत मोठा घोटाळा झाला. ‘जीए सॉफ्टवेअर’ आस्थापन काळ्या सूचीत असतांनाही तिच्यासमवेत परत करार का करण्यात आला ? असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. ते विधानसभेत बोलत होते.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले,

१. परीक्षा घोटाळ्यांमुळे पूर्ण महाराष्ट्रातील तरुण आणि विद्यार्थी यांच्यामध्ये रोष आहे. यामुळे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी या विषयावर चर्चा व्हायला हवी. परीक्षा घोटाळ्याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आम्हाला वेळ द्या.

२. पहिल्यांदा आरोग्य विभागात घोटाळा झाला, नंतर म्हाडामध्ये घोटाळा झाला. यानंतर ‘टीईटी’मध्येसुद्धा घोटाळा झाला आहे. २५ आणि २६ सप्टेंबर यादिवशी आरोग्य विभागाची परीक्षा झाली. ही परीक्षा घेणार्‍या ‘न्यासा’ या आस्थापनाने पेपर फोडण्यापासून सर्वच गोष्टी यात केल्या. माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी या संदर्भातील एक ‘ऑडियो क्लिप’ समोर आणली असून यात ‘क’ गटासाठी १५ लाख आणि ‘ड’ गटासाठी ८ लाख रुपये द्यावे लागतील, असे दलाल सांगत असल्याचे ऐकू येते.

३. न्यासा आस्थापनाला २१ जानेवारी २०२१ या दिवशी अपात्र ठरवण्यात आले. त्यानंतर ४ मार्च २०२१ या दिवशी उच्च न्यायालयाने पात्र केले; मात्र यानंतर स्पर्धेत असलेली ४ आस्थापनाने डावलून जाणीवपूर्वक ‘न्यासा’ याच आस्थापनेला काम देण्यात आले.

४. संपूर्ण शासकीय यंत्रणा सडलेली असून केवळ अमरावतीसारख्या शहरात आरोग्य भरतीत २०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी भरतीसाठी पैसे दिले आहेत.