प.पू. दास महाराज यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याची सेवा करतांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साधकांना आलेल्या अनुभूती

प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी नाईक

सौ. नयन सदानंद मसूरकर, गौतमारण्य आश्रम, बांदा.

१. साधकांच्या माध्यमातून ईश्वरच साहाय्य करत असल्याची अनुभूती येणे : ‘वर्ष २०१९ – २०२० पासून मी प.पू. दास महाराज यांच्या आश्रमात पूर्णवेळ सेवा करत आहे. ‘प.पू. दास महाराज यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा केवळ आमच्यासाठीच आहे’, असे आम्हाला वाटले. सेवा करतांना ‘सतत साधकांच्या माध्यमातून ईश्वरच साहाय्य करत आहे. मी काहीच करत नाही’, असे मला जाणवते.

२. प.पू. दास महाराज यांच्या पायांत शक्ती नसतांनाही देवाला साष्टांग नमस्कार करणे : प.पू. दास महाराज आणि पू. माई म्हणजे प्रेमाचा वहाता झराच आहे. शारीरिकदृष्ट्या त्यांचे पाय कमकुवत आहेत, तरीही त्यांचा देवाप्रती भाव असल्याने ते देवाला साष्टांग नमस्कार करतात. मी शरिराने सुदृढ असूनही तेवढे करत नाही.

३. स्वयंपाकाची सेवा भाव ठेवून केल्यावर आनंद मिळणे आणि सर्वांनी महाप्रसाद चांगला झाल्याचे सांगणे : १८.१२.२०२१ पासून माझ्याकडे सोहळ्यासाठी महाप्रसाद बनवण्याची सेवा आहे. ‘जे सेवेकरी आहेत, ते ईश्वरच आहेत’, असा भाव ठेवून मी महाप्रसाद बनवत आहे. त्यामुळे माझी चिडचिड न होता मला आनंद मिळत आहे. सगळे सांगतात, ‘‘सर्व महाप्रसाद चांगला झाला आहे.’’ तेव्हा ‘यात माझे काही नाही. मी निमित्तमात्र आहे, हे लक्षात येते.’

श्री. प्रसाद शांताराम नाईक, केसरी, तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.

प.पू. दास महाराज यांची सेवा करतांना ‘आम्ही परात्पर गुरु डॉक्टरांचीच सेवा करत आहोत’, असे वाटत असल्यामुळे सेवा करतांना कधीच थकवा न जाणवणे : ‘आम्ही १५ – २० वर्षे माडकोळला रामनवमीच्या वेळी सेवा करतो. प.पू. बाबांच्या राममंदिरामधील सर्व सेवांमध्ये आमचा सहभाग असतो. ‘ईश्वरप्राप्तीसाठी आम्हाला वेगळे काही करावे’, असे वाटत नाही. ‘प.पू. बाबा म्हणजेच परात्पर गुरु डॉक्टर आहेत’, अशी आमची श्रद्धा आहे. प.पू. बाबांची सेवा करतांना ‘आम्ही परात्पर गुरु डॉक्टरांचीच सेवा करत आहोत’, असे वाटते. त्यामुळे आम्हाला सेवा करतांना कधीच थकवा जाणवत नाही. आम्ही जी सेवा करतो, ती पूर्णपणे झोकून देऊन करत असतो. जे काही आम्हाला ईश्वराने दिले आहे, त्याचे आम्ही चीज करतो. त्यामुळे आम्ही भाग्यवान आहोत.’

श्री. सदानंद नामदेव मसूरकर, गौतमारण्य आश्रम, बांदा.

१. निखळ प्रेमभाव ! : ‘प.पू. दास महाराज यांच्यामध्ये पुष्कळ प्रेमभाव आहे. ते सर्वांची विचारपूस करतात.

२. सतर्कता : ते प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करतात, उदा. काही कारणाने वीज गेली असेल, तर ती लगेच दुरुस्त करून चालू कशी करता येईल ? पाण्याचा पंप चालू करून घेणे, या संदर्भात ते सतर्क असतात.’

श्री. हेमंत मणेरीकर, जिल्हा सिंधुदुर्ग

सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याच्या संदर्भातील सेवा चालू असतांना साधकांमध्ये पुष्कळ उत्साह जाणवणे : ‘मागील वर्षभर मी पानवळ, बांदा येथे गौतमारण्य आश्रमात सेवा करत आहे. प.पू. दास महाराज आणि पू. माई यांच्या सहवासात अन् या भूमीमध्ये आम्हाला पुष्कळ चैतन्य जाणवते. वर्ष २०२० पासून दळणवळण बंदीमुळे रामनवमी उत्सव होऊ शकला नाही; परंतु ‘या वर्षी प.पू. दास महाराज यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याच्या निमित्ताने या चैतन्याचा लाभ सर्व साधक आणि भक्तमंडळींना मिळावा, यासाठीच हे नियोजन आहे’, असे वाटले. सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याच्या संदर्भातील सेवा चालू असतांना सर्व साधकांना पुष्कळ उत्साह आणि चैतन्य जाणवले.

प.पू. दास महाराज यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा म्हणजे साधकांना एक पर्वणीच लाभली, ‘याचा लाभ उपस्थितांनाच नव्हे, तर सर्वांनाच होईल’ असे जाणवले. गुरुचरणी कोटी कोटी कृतज्ञता !’

(वरील सर्व सूत्रांचा दिनांक १८.१२.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक