बिपीन रावत यांच्या निधनावर आक्षेपार्ह ‘पोस्ट’ प्रसारित केल्याच्या प्रकरणाची केपे पोलिसांकडून अदखलपात्र गुन्हा नोंद

केपे, १६ डिसेंबर (वार्ता.) :  भारताचे संरक्षणदल प्रमुख असलेले जनरल बिपीन रावत यांचे ८ डिसेंबर या दिवशी अपघाती निधन झाल्यानंतर अविनाश तावारिस या ख्रिस्त्याने त्याच्या ‘फेसबूक टाईम लाईन’वर आक्षेपार्ह ‘पोस्ट’ प्रसारित केली होती. या प्रकरणी कावरे, केपे येथील मयूर देविदास यांनी केपे पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली होती. केपे पोलिसांनी ही तक्रार एक अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंद केली आहे आणि न्यायासाठी योग्य न्याययंत्रणेकडे जाण्याची सूचना तक्रारदाराला केली आहे.

अविनाश तावारिस यांनी त्यांच्या ‘पोस्ट’मध्ये जनरल बिपीन राव यांना अपकीर्त केले होते. नागालँड येथे निष्पाप नागरिकांची हत्या करणार्‍या सेनादलाचे जनरल बिपीन रावत प्रमुख होते. जनरल बिपीन रावत हे गणवेश धारण केलेले एक राजकारणी आहेत, असा आरोप तावारिस यांनी केला होता. या प्रकरणी मयूर देविदास यांनी तक्रारीत म्हटले होते की, अविनाश तावारिस यांनी प्रसारित केलेली ‘पोस्ट’ स्वीकारार्ह नाही आणि यांमुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येऊ शकते. या ‘पोस्ट’मुळे देशप्रेमी भारतियांच्या भावना दुखावल्या जाऊन गोव्यात दंगली घडू शकतात. त्यामुळे अविनाश तावारिस यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती.