मुंबई – केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एन्.सी.बी.) १३ डिसेंबर या दिवशी ३ ठिकाणी धाडी टाकून ८ किलो अमली पदार्थ कह्यात घेतले आहेत. सीमा शुल्क विभागाच्या विमानतळ गुप्तचर विभागाने मागील आठवड्यात आफ्रिकी महिलेकडून २४० कोटी रुपयांचे हेरॉइन कह्यात घेतले होते. त्यानंतर अमली पदार्थविरोधी पथकाने विमानतळाच्या परिसरातून एका दलालाला ‘एम्.डी.’ या अमली पदार्थासह कह्यात घेतले होते. हे अमली पदार्थ कुरियरने ऑस्ट्रेलियाला पाठवले जाणार होते. याच जप्तीनंतर पुढील धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये डोंगरी येथे दोन ठिकाणी आणि अंधेरी अन् वांद्रे येथे एका ठिकाणी धाड टाकण्यात आली. यांपैकी डोंगरी येथे ८ किलो ‘एम्.डी.’ हा अमली पदार्थ सापडला. कारवाई आणि शोधमोहीम चालू आहे, अशी माहिती केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाच्या सूत्रांनी दिली. या कारवाईला केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाचे मुंबईचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांनी दुजोरा दिला आहे.