चारही वेदांचा मराठीत अनुवाद करण्याचे महत्कार्य करणारे डोंबिवली येथील वेदमूर्ती डॉ. भीमराव कुलकर्णी यांचे देहावसान !

वेदमूर्ती डॉ. भीमराव कुलकर्णी

डोंबिवली, १४ डिसेंबर (वार्ता.) – चारही वेदांचा मराठीत अनुवाद करणारे, ७० उपनिषदांचे भाषांतर करणारे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक वेदमूर्ती डॉ. भीमराव सदाशिव कुलकर्णी (वय ९९ वर्षे) यांचे १३ डिसेंबर या दिवशी सायंकाळी येथील रहात्या घरी वार्ध्यक्यामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात् मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. वर्ष २०२१ मध्येच त्यांनी केलेल्या वेदाभ्यासाविषयी त्यांना ‘डॉक्टरेट’ पदवी देण्यात आली होती. ‘वेदस्वरूप होऊन ते काळाच्या पडद्याआड गेले’, अशा शब्दांत ‘शुक्ल यजुर्वेदीय माध्य. ब्राह्मण संघा’चे अध्यक्ष प्रदीप जोशीगुरुजींसह संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

असे प्रसिद्धीपराङमुख व्यक्तित्व दुर्मिळच ! – श्री. रमेश शिंदे, राष्ट्र्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे

वेदमूर्ती डॉ. भीमराव सदाशिव कुलकर्णी यांची आम्ही भेट घेतली होती. ‘ते संत प्रवृत्तीचे विद्वान गृहस्थ आहेत’, असे जाणवत होते. प्रसिद्ध आधुनिक वैद्य म्हणून के.ई.एम् रुग्णालयातून निवृत्त झाल्यावर त्यांना वेदकार्य करण्याचे आतून स्फुरले. वेदांच्या कार्यासाठी त्यांनी सर्व ऐश्वर्याचा त्याग केला. कोणतेही अडथळे येऊ नयेत, यासाठी डोंबिवली येथे एका लहान घरात पती-पत्नी दोघेच संन्यस्त वृत्तीने रहात होते. वेदांच्या मराठी अनुवादासाठी आणि त्यातील विज्ञान सांगण्यासाठी त्यांनी उर्वरित सर्व आयुष्य खर्ची घातले.

त्यांच्या हस्तलिखिताच्या वह्या पाहिल्यावर त्यांचे अक्षर मोत्यासारखे सुंदर असल्याचे लक्षात आले. विशेष म्हणजे त्यांच्या १० ते १५ वह्यांमध्ये एकही खाडाखोड किंवा दुरुस्ती नव्हती. त्यावर त्यांनी सांगितले, ‘‘मी पहाटे ४ वाजता सर्व आटोपून लिखाण करायला बसतो. भगवंतच माझ्याकडून अखंड लिहून घेतो. तो जे सांगत असतो, ते मी केवळ कागदावर उतरवतो. त्यामुळे एकही शब्द किंवा कानामात्रा चुकत नाही. त्या तुलनेत हे हस्तलिखित छपाईसाठी दिल्यावर मात्र ३-३ वेळा ते पडताळावे लागते. इतर लोक पैशांसाठी काम करत असल्याने पुनःपुन्हा सुधारणा कराव्या लागतात.’’ असे हे प्रसिद्धीपराङमुख व्यक्तित्व दुर्मिळच होय.

 

एका ज्ञानतपस्वीचा अस्त ! – दुर्गेश परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक

श्री. दुर्गेश परुळकर

डॉ. कुलकर्णी यांचे संस्कृतचे शिक्षक ल.वि. गोडखिंडीकर शास्त्री यांच्याकडून त्यांना संस्कृत भाषेचे उत्तम ज्ञान मिळाले. त्यांच्या मुखातून वेदांचा होणारा आदरयुक्त उल्लेख डॉ. कुलकर्णी यांच्या कानावर सतत पडत राहिला. ‘भावी आयुष्यात ज्या विद्यार्थ्याला जमेल तेव्हा त्याने वेदांचा अभ्यास करून त्यातील विज्ञान आपल्या मातृभाषेत अनुवादित करून जगासमोर ठेवावे’, असे डॉ. कुलकर्णी यांचे शिक्षक सांगत. आपल्या गुरूंचे हे शब्द त्यांना वेदांचा मातृभाषेत अनुवाद करण्यासाठी प्रेरणा देत राहिले. पुढे प्रत्यक्ष वेदांच्या अनुवादाला त्यांनी आरंभ केला. त्यांनी वेदांचा पारंपरिक नव्हे, तर वेदात असलेले विज्ञान साध्या-सरळ आणि सोप्या भाषेत जनसामान्यांना कळेल अशा पद्धतीने त्यांचा अनुवाद केला.

अनंत अडचणी येऊनही वर्षानुवर्षे वेदांचा अनुवाद करण्यात कार्यरत !

हल्लीच्या पिढीला वेदांची भाषा कळण्यास अवघड जाते. हे लक्षात घेऊन डॉ. कुलकर्णी यांनी वेदांचा सुलभ अनुवाद केला. ऋग्वेदाचा अनुवाद करण्यासाठी त्यांना १२ वर्षे लागली, तर यजुर्वेदाचा अनुवाद करण्यासाठी २ वर्षांचा कालावधी लागला. यांत अनेक अडचणी आल्या. त्यांची प्रकृती बिघडली. ते व्याधीग्रस्त झाले; पण त्यावर मात करून त्यांनी वेदांचा अनुवाद पूर्ण केला.

वेदांचे संस्कार भावी पिढीवर करणे, हीच डॉ. कुलकर्णी यांना श्रद्धांजली !

डॉ. कुलकर्णी यांनी भावी पिढ्यांना वेदांतील ज्ञान-विज्ञान सहजपणे कळावे; म्हणून अखंड ज्ञानसाधना केली. वेद साहित्याचा अमूल्य ठेवा त्यांनी येणार्‍या पुढील पिढ्यांसाठी मातृभाषेत उपलब्ध करून ठेवला आहे. त्यांचे हे कार्य अनन्यसाधारण आहे. येणार्‍या भावी पिढ्या डॉ. कुलकर्णी यांच्या ऋणात रहातील, याविषयी शंका नाही. येणार्‍या पिढ्यांवर या ग्रंथांचे संस्कार करण्याचे दायित्व आपल्या सर्वांचे आहे. ते दायित्व आपण अत्यंत निष्ठेने स्वीकारले पाहिजे. तीच या संस्कृतीनिष्ठ, ज्ञानयुक्त, कर्मयोगी वेदोपासकाला आदरयुक्त अंत:करणाने अर्पण केलेली श्रद्धांजली ठरेल !