मुनावर फारुखी याचे समर्थन करणारे माझे समर्थन करत नाहीत ! – बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

याविषयी भारतातील तथाकथित निधर्मीवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आदी राजकीय पक्ष तोंड का उघडत नाहीत ? मुनावर फारुखी याला एक न्याय आणि तस्लिमा नसरीन यांना दुसरा न्याय असे का ? – संपादक

मुनावर फारुखी

नवी देहली – विनोदी कलाकार मुनावर फारुखी त्याच्या कार्यक्रमातून हिंदु धर्म आणि हिंदू यांच्याविषयी अवमानकारक विधाने अन् विनोद करत असल्याने हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आंदोलन करून त्याचे देशभरातील कार्यक्रम रहित करण्यास भाग पाडले. त्यामुळे फारुखी याने ‘मी विनोदी कलाकार म्हणून माझा प्रवास संपवत आहे’, असे म्हटले. त्यानंतर त्याच्या समर्थनार्थ भारतातील पुरोगामी, निधर्मीवादी नेते, अभिनेते आदी पुढे आले आहेत. यावर बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ट्वीट केले आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘मी सामाजिक माध्यमांवर मुनावर फारुखी यांच्या भाषणस्वातंत्र्याचे रक्षण करणारे लेख आणि विधाने लिहिली; पण मुनावर फारुखी यांच्या भाषण स्वातंत्र्याचे समर्थन करणारे बहुतांश लोक माझ्या भाषण स्वातंत्र्याचे समर्थन करत नाहीत.’ तस्लिमा नसरीन यांनी त्यांच्या ‘लज्जा’ या कादंबरीतून बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांविषयी लिहिले आहे. या कादंबरीमुळे धर्मांधांनी तस्लिमा नसरीन यांना ठार मारण्याचा फतवा काढल्याने त्यांनी देश सोडून विदेशात आसरा घ्यावा लागला आहे. गेल्या २० वर्षांहून अधिक काळात तस्लिमा नसरीन यांना पुरोगामी, निधर्मीवादी लोकांकडून साहाय्य किंवा समर्थन मिळालेले नाही. याविषयी त्यांनी या ट्वीटमध्ये लिहिले आहे.