गोव्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नोकरभरतीमध्ये महाघोटाळा झाल्याची सत्ताधारी पक्षातीलच काही आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

पणजी, १३ डिसेंबर (वार्ता.) – सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कनिष्ठ अभियंता आणि तांत्रिक साहाय्यक या ३६८ पदांच्या निवडीमध्ये प्रचंड घोटाळा झाला आहे. या नोकरभरतीसाठी सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक प्रभु पाऊसकर आणि त्यांचे मुख्य अभियंता यांनी प्रत्येक नोकरीसाठी २५ ते ३० लक्ष रुपये लाच घेतली. हा ७० कोटी रुपयांचा महाघोटाळा आहे. याविषयी मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे तक्रार केली आहे. ही पदे त्वरित रहित करावी अन्यथा मी न्यायालयात जाईन, अशी चेतावणी भाजपचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली आहे.

नोकरभरती नियमानुसारच ! दीपक प्रभु पाऊसकर, सार्वजनिक बांधकाममंत्री

या आरोपाला उत्तर देतांना सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक प्रभु पाऊसकर म्हणाले, ‘‘माझ्या विरोधात केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. आमदार बाबूश मोन्सेरात यांनी त्यांच्या उमेदवारांची नावे मला नोकभरतीसाठी सुचवली होती. नोकरभरतीची प्रक्रिया नियमांनुसार करण्यात आली आहे आणि नोकरभरती प्रक्रियेत मी हस्तक्षेप केलेला नाही.’’

दीपक प्रभु पाऊसकर, सार्वजनिक बांधकाममंत्री

भाजपचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी ११ डिसेंबर या दिवशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांच्याकडे सा.बां. खात्यातील नोकरभरतीत महाघोटाळा झाल्याची तक्रार मांडली होती. या वेळी त्यांच्या समवेत भाजपचे आमदार टोनी फर्नांडिस आणि आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांचा समावेश होता. मुख्यमंत्र्यांना भेटून आल्यानंतर आमदार बाबूश मोन्सेरात यांनी पत्रकारांकडे बोलतांना हा आरोप केला.

आमदार बाबूश मोन्सेरात यंनी मांडलेली सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत.

१. सा.बां. खात्याचे कनिष्ठ अभियंता आणि तांत्रिक साहाय्यक या पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये अनेक हुशार मुले सहभागी झाली; मात्र प्रत्यक्षात अनेक हुशार मुलांना केवळ २ ते ३ गुण देण्यात आले.

२. याचे सखोल अन्वेषण केल्यावर मला समजले की, सा.बां.खात्यातील प्रत्येक पदासाठी २५ ते ३५ लक्ष रुपये लाच घेण्यात आली. सा.बां. मंत्री दीपक प्रभु पाऊसकर यांनी किमान २०० जणांकडून तरी प्रत्येकी २५ ते ३० लक्ष रुपये लाच घेतली आहे. यामध्ये ७० कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे.

३. काही मुलांची निवड होऊनही प्रत्यक्षात निकाल त्यांच्या विरोधात लागल्याने ही मुले आत्महत्या करू शकतात. ही पदे तातडीने रहित करून या प्रकरणाचे अन्वेषण करावे. या पदांसाठी नव्याने ‘कर्मचारी निवड आयोगा’मार्फत मुलाखती घ्याव्यात.

४. मुख्यमंत्र्यांनी माझ्या मागणीला सौम्य प्रतिसाद दिला आहे. ही पदे रहित न केल्यास सरकारला लोकांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागणार आहे.

५. या विषयावर मी गप्प बसणार नाही, तर न्यायालयात दाद मागणार.

६. सुदिन ढवळीकर हे अनेक वर्षे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते; मात्र त्यांनी असा प्रकार कधीही केला नाही. सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक प्रभु पाऊसकर यांनी खाते विकून टाकले आहे.

७. सा.बां. मंत्र्याच्या स्वीय सचिवाची बांधकाम खाते आणि मल:निस्सारण विभाग, अशी दोन्ही ठिकाणी नोकरीसाठी निवड झाली आहे. हापण मोठा घोटाळा आहे.

८. सा.बां. मंत्र्याने या प्रकरणी एका ज्येष्ठ मंत्र्याचीही फसवणूक केली आहे. या ज्येष्ठ मंत्र्याने २० पदे मागितली; परंतु १० पदांवर तडजोड झाली. उर्वरित १० उमेदवारांना उत्तरपत्रिका रिक्त सोडण्यास सांगण्यात आले; परंतु त्यांना ४ ते ५ गुणच देण्यात आले. या उमेदवारांची निवड न झाल्याने ते संबंधित ज्येष्ठ मंत्र्याला आता दोष देत आहेत. अभियंता बनलेले उमेदवारांना सा.बां. खात्याच्या परीक्षेत १ किंवा ४ एवढे अल्प गुण कसे पडू शकतात ?