तुळजाभवानी ट्रस्टच्या माध्यमातून जुन्नर (पुणे) येथील हबशी महालाचा विकास !

वास्तविक हिंदूंच्या मंदिरांचा निधी हा हिंदु धर्माच्या कार्यासाठीच व्यय व्हायला हवा. असे असतांना स्वातंत्र्यानंतरच्या ७२ वर्षांतील सरकारांनी केवळ हिंदूंच्या असंख्य मंदिरांचे सरकारीकरण करून मंदिरांची संपत्ती विकासकामे, देणग्या, अन्य पंथियांना साहाय्य, अशा अधार्मिक गोष्टींवर उधळली आहे. यावरून सरकारीकरण केलेल्या मंदिरांची लूट रोखण्यासाठी मंदिरे भक्तांच्या कह्यात देणे अत्यंत आवश्यक आहे. – संपादक 

जुन्नर (पुणे) येथील हबशी महाल

जुन्नर (जिल्हा पुणे) – किल्ले शिवनेरीच्या पायथ्यापासून ५ कि.मी. अंतरावर हापूसबाग आगार खोरे येथे असलेल्या इतिहासकालीन हबशी महालाचा (मोगलकालीन स्थापत्य असलेला) विकास तुळजाभवानी ट्रस्टच्या माध्यमातून करणार असल्याचे ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सुजित मेहेर यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने इतिहासकालीन सौदागर घुमट आणि मोगल स्थापत्याचा हबशी महल वास्तूंचे जतन अन् संवर्धन या विषयावर वार्तालाप कार्यक्रमाचे हबशी महल हापूसबाग आगार या ठिकाणी आयोजन करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते.

निजामाचा प्रधान मलिक अंबर याने हा महाल उभारल्याचे सांगितले जाते. सध्या महालाची दुरवस्था झाली असून त्याची देखभाल ट्रस्ट पहात आहे. या ठिकाणी काही विकासकामे करण्यात आली; मात्र निधी अपुरा पडत असून दानशूरांनी साहाय्य करावे, असे आवाहन मेहेर यांनी केले.

या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र परेरा यांनी सांगितले की, या इतिहासकालीन वास्तूचे जतन करणे हेच ध्येय आहे. या वास्तूमध्ये औरंगजेब यांचा इतिहास असल्यामुळे येथील वास्तूला महत्त्व प्राप्त झाले आहे. (भारतातील सहस्रो हिंदु मंदिरे पाडून तेथे मशिदी उभारणार्‍या, भारतभरातील हिंदूंवर अत्याचार करणार्‍या क्रूरकर्मा औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्यासाठी मंदिराचा निधी वापरणे, हे लज्जास्पद आहे ! – संपादक)