स्वरक्षण प्रशिक्षणवर्गाच्या माध्यमातून राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सिद्ध व्हा ! – श्रेयस पिसोळकर, हिंदु जनजागृती समिती

पुणे आणि चिंचवड येथे होणार्‍या धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींनी स्वरक्षण प्रशिक्षणवर्गाच्या माध्यमातून सक्षम होण्याचा केला निर्धार !

श्री. श्रेयस पिसोळकर

पुणे – भारताला शौर्यशाली इतिहासाची परंपरा आहे; मात्र इतिहासातून प्रेरणा घेऊन अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला हवा, हे न शिकवल्यामुळे आपल्याला त्याचा विसर पडला आहे. अहिंसेच्या नावाखाली समस्त हिंदु बांधवांमध्ये असणार्‍या शौर्याची गळचेपी होत आहे. अन्यायाविरुद्ध प्रतिकार करणे आणि दुष्प्रवृत्तीच्या विरोधात लढणे याचा सर्वांना विसर पडला आहे. त्यामुळे अन्यायाला, अत्याचाराला सामोरे जाण्यासाठी आपल्याला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर सक्षम होण्याची आवश्यकता आहे. हिंदु महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी, हिंदु बांधवांवर होणार्‍या अन्यायाला रोखण्यासाठी हिंदूंनी एकत्र येऊन स्वरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. त्या माध्यमातून हिंदूंनी राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सिद्ध व्हावे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रेयस पिसोळकर यांनी केले. पुणे आणि चिंचवड येथे होणार्‍या धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी श्री. श्रेयस पिसोळकर बोलत होते. या व्याख्यानाचा लाभ पुणे आणि चिंचवड येथील अनेक धर्मप्रेमींनी घेतला. या प्रसंगी शौर्य जागवणारी स्वरक्षणाच्या प्रात्यक्षिकांची ध्वनीचित्रफित दाखवण्यात आली. व्याख्यानाचा उद्देश कु. प्राची शिंत्रे यांनी सांगितला, तर सूत्रसंचालन धर्मप्रेमी कु. मानसी दहिवडकर यांनी केले.

धर्मप्रेमींचे अभिप्राय

१. सौ. सुषमा नरावडे – प्रशिक्षणाचा भाग चांगला सांगितला. माझे प्रशिक्षण चालू असून हे प्रशिक्षण प्रत्येकाने शिकण्याची आवश्यकता आहे, असे मनापासून वाटते.

२. श्री. हिंमत पाटील – सर्वांनी त्यांच्या पाल्यांनाही हे प्रशिक्षण शिकवले पाहिजे.

वैशिष्ट्यपूर्ण

१. ‘शौर्यजागृती’ व्याख्यानाचा लाभ संपर्कातील अधिकाधिक हिंदूंना व्हावा, यासाठी धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींनी तळमळीने प्रयत्न केले.

२. धर्मशिक्षणवर्गातील कृतीशील धर्मप्रेमी कु. मानसी दहिवडकर हिने व्याख्यानाच्या सूत्रसंचालनाची सेवा प्रभावीपणे केली.

३. व्याख्यानामध्ये धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. वक्त्यांचे मार्गदर्शन आणि स्वरक्षणाची प्रात्यक्षिके झाल्यावर धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे घोषणा दिल्या.

व्याख्यानाला जोडलेल्या बहुतांश धर्मप्रेमींनी ‘आम्ही स्वरक्षण प्रशिक्षण शिकण्यास इच्छुक आहोत’, असे सांगितले. त्यामुळे व्याख्यानानंतर युवक आणि युवती यांच्यासाठी ७ दिवसांच्या शौर्यवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.