तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख बिपिन रावत यांच्या निधनावर गोव्यातील अविनाश तावारिस याची आक्षेपार्ह ‘पोस्ट’ !

पोलिसांत तक्रार प्रविष्ट

  • तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांविषयी आक्षेपार्ह विधान करणे हा राष्ट्रद्रोहच ! यालाही आता काही अतीशहाणे बुद्धीवादी ‘विचार स्वातंत्र्य’ ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ वगैरे गोंडस नावाने पाठीशी घालतील !
  • यातून भारतात बाह्य शत्रूंपेक्षा अंतर्गत शत्रूच अधिक आहेत, हे सिद्ध होते !
भारताच्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख असलेले जनरल बिपिन रावत

केपे (गोवा) : भारताच्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख असलेले जनरल बिपिन रावत यांचे ८ डिसेंबर या दिवशी अपघाती निधन झाल्यानंतर अविनाश तावारिस या ख्रिस्त्याने त्याच्या ‘फेसबूक टाईम लाईन’वर आक्षेपार्ह ‘पोस्ट’ प्रसारित केल्याच्या प्रकरणी कावरे, केपे येथील मयूर देविदास यांनी केपे पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. अविनाश तावारिस यांनी प्रसारित केलेली ‘पोस्ट’ स्वीकारार्ह नाही आणि यांमुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येऊ शकते. या ‘पोस्ट’मुळे देशप्रेमी भारतियांच्या भावना दुखावल्या जाऊन गोव्यात दंगली घडू शकतात. या प्रकरणी संशयितावर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार मयूर देविदास यांनी केली आहे.

मयूर देविदास तक्रारीत म्हणतात, ‘‘अविनाश तावारिस या व्यक्तीने ८ डिसेंबर या दिवशी त्याच्या ‘फेसबूक टाईम लाईन’वर जनरल बिपिन रावत यांच्या निधनावरून ‘मिस्टर ‘वॉरमाँगर’ आता तरी शांत रहा (रेस्ट ईन पीस)’, असे म्हटले. ‘हे तू कुणाला उद्देशून म्हटतो’, असे एका व्यक्तीने अविनाश तावारिस यांना प्रतिक्रिया देतांना विचारले असता अविनाश तावारिस म्हणतात, ‘‘हे मी जनरल बिपिन रावत यांना उद्देशून म्हटले आहे.’’ एवढेच बोलून अविनाश तावारिस गप्प राहिले नाहीत, तर त्यांनी ९ डिसेंबर या दिवशी नागालँड येथील नागरिकांच्या मृत्यूवरून नवीन एक ‘पोस्ट’ प्रसारित केली. यामध्ये अविनाश तावारिस म्हणतात, ‘‘नागालँड येथील निष्पाप नागरिकांची हत्या करणार्‍या सेनादलांचे प्रमुख कोण होते ? हा व्यक्ती शूर नक्कीच नव्हता. नागालँड येथील भाजपच्या अध्यक्षांनीही नागालँड येथील निष्पाप नागरिकांची हत्या हा वंशविच्छेद असल्याचे म्हटले आहे. ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’च्या (सीएएच्या) विरोधात झालेल्या आंदोलनाच्या वेळी या व्यक्तीने या आंदोलनाचे नेतृत्व विद्यार्थी करत असल्याचे खोटेच सांगितले. ‘विद्यार्थी शहरांमध्ये हिंसक आंदोलन करण्यासाठी लोकांना भडकावतात’, असा आरोप त्यांनी केला. यावरून ही व्यक्ती गणवेश धारण केलेली एक राजकारणी असल्याचे दर्शवते. त्याच्या कार्याभोवती विनाकारण वलय निर्माण करण्याची आवश्यकता नाही.’’

त्यामुळे अविनाश तावारिस यांच्या विरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायदा, शांती भंग केल्याच्या प्रकरणी भारतीय दंड संहितेचे कलम ५०४, दंगल घडवण्यासाठी उत्तेजन दिल्याच्या प्रकरणी भारतीय दंड संहितेचे कलम १५३, नागालँड येथील घटनेवरून ‘सी.डी.एस्.’ जनरल बिपिन रावत यांची प्रतिमा मलीन केल्याच्या प्रकरणी भारतीय दंड संहितेचे कलम ४९९ अंतर्गत आणि देशद्रोह केल्याच्या प्रकरणी भारतीय दंड संहितेचे कलम १२४ (अ) अंतर्गत गुन्हा प्रविष्ट करावा.’’