भाजपचे आमदार आशिष शेलार यांना जामीन संमत, शिवसेना-भाजप यांचे एकमेकांवर प्रत्यारोप !

मुंबईच्या महापौरांविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्याचे प्रकरण

आशिष शेलार

मुंबई – मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांच्याविषयी पत्रकार परिषदेत आक्षेपार्ह वर्तन केल्याप्रकरणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्या विरोधात मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. याविषयी शेलार यांचे म्हणणे पोलिसांनी लिहून घेतले असून त्यांना तात्काळ १ लाख रुपयांचा जामीन संमत करून काही अटींवर त्यांची मुक्तता करण्यात आली आहे.

आशिष शेलार यांच्यासमवेत पोलीस ठाण्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार अतुल भातखळकर, भाजपचे मुंबई शहराध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा हे उपस्थित होते. या प्रकरणात राजकीय सूडबुद्धीने गुन्हा नोंदवण्यात आला असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. या प्रकरणावरून शिवसेना आणि भाजप यांच्याकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत.

माझ्या बोलण्याचा विपर्यास ! – आमदार आशिष शेलार, भाजप

मी जे बोललोच नाही आणि जे बोललो, त्याचा विपर्यास करून जो बागुलबुवा उभा करण्यात आला आहे, त्या विरोधात माझी बाजू सक्षमपणे न्यायालयात मांडणार आहे. ज्या पत्रकार परिषदेवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे, त्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ आजही यु ट्यूबवर उपलब्ध आहे. त्यातील सत्य आम्ही न्यायालयासमोर मांडू. त्यातून सत्य समोर येईल.