|
मुंबई – वाराणसी येथील विविध विकास प्रकल्पांचे १३ डिसेंबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून भाजपच्या वतीने देशभरात ‘दिव्य काशी, भव्य काशी’ या उपक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. या अंतर्गत महाराष्ट्रात ४ ज्योर्तिलिंगांसह २ सहस्र १०० ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष कृपाशंकर सिंग यांनी ८ डिसेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे संयोजक आचार्य तुषार भोसले या वेळी उपस्थित होते.
कृपाशंकर सिंग म्हणाले, ‘‘१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या काशी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी, तसेच सौंदर्यीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील ७ वर्षांत अनेक योजना प्रत्यक्षात आणल्या आहेत. या कार्यक्रमात देशभरातील धर्माचार्य, साधू-संत, विद्वान-विचारवंत, तसेच उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य असलेल्या सामाजिक समरसता, एकता आणि अखंडता यांचे अनोखे दर्शन या कार्यक्रमातून घडेल. राज्यातील ५० साधू-संत या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. हे कार्यक्रम मकरसंक्रांतीपर्यंत म्हणजे १४ डिसेंबर २०२२ पर्यंत चालतील. १३ डिसेंबर या दिवशी सर्व ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी भव्य कार्यक्रम होणार आहेत. देशभरात ५१ सहस्र ठिकाणी ‘दिव्य काशी-भव्य काशी’ या कार्यक्रमाचे भव्य पडद्यावरून थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. १० ते १२ डिसेंबर या कालावधीत संपूर्ण देशभरात सर्व मंदिरे, मठ, आश्रम यांसह विविध ठिकाणी स्वच्छता अभियानाचे आयोजन केले जाणार आहे. या सर्व कार्यक्रमांत धर्माचार्य, साधू-संत यांचा गौरव केला जाईल. महाराष्ट्रात विविध होणार्या कार्यक्रमांमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह पक्षाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, लोकप्रतिनिधी सहभागी होतील.’’