रस्ता तात्पुरता दुरुस्त न करता कायमस्वरूपी उपाययोजना काढण्याची नागरिकांची मागणी !
|
वढू-तुळापुर (पुणे) – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या शिरूर तालुक्यातील वढू – बुद्रुक येथील नागरिकांनी समाधीस्थळाकडे जाणार्या रस्त्याविषयी रोष व्यक्त केला आहे. कोरेगाव भीमा येथून ३ कि.मी. एवढे अंतर असलेल्या या रस्त्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून प्रवास करणार्या नागरिकांना छोटे-मोठे अपघात, चिखलाचे साम्राज्य अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वढू बुद्रुक मार्गे आळंदी, थेऊर, रांजणगाव अशा अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांना जाता येते. यामुळेही या रस्त्याचे महत्त्व अधिक वाढते. रस्त्याच्या दुरुस्तीविषयी मागणी करण्यात आल्यानंतर तात्पुरते खड्डे बुजवणे अशी उपाययोजना केली जात असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. यापूर्वीही अनेक आंदोलने, मागण्या झाल्या असून अपेक्षित काम झालेले नाही, असा सूर संतप्त नागरिकांनी धरला आहे.
शिरूर मतदारसंघातील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी पुणे विमानतळावरील पेशव्यांच्या छायाचित्राविषयी एक ट्वीट केले होते. त्याला उत्तर देत अनेक शंभूभक्तांनी त्यांच्या ट्विटर खात्यावरही रस्त्याच्या दुरवस्थेविषयी रोष व्यक्त केला आहे. ‘मागील २० वर्षात झाले नाही ते २ वर्षांत करण्याचा माझा प्रयत्न आहे. रस्ता बांधकामासाठी केंद्रीय रस्ता निधीकडे पाठपुरावा करत आहे. या संदर्भात लवकरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटणार आहे’, असे खासदार अमोल कोल्हे यांनी ऑक्टोबरमध्ये शिक्रापूर येथील एका कार्यक्रमात सांगितले होते. (छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा अपलाभ घेऊन अनेक व्यक्ती, तथाकथित संघटना यांनी राजकारण करत ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद निर्माण करून हिंदूंमध्ये दुही माजवण्याचा प्रयत्न केला. आता हिंदू स्वधर्माभिमानी आणि जागृत झाले असून ते हिंदुहिताचे प्रश्न विचारत आहेत. हीच हिंदूंच्या हिंदु राष्ट्राकडील वाटचालीची नांदी आहे ! हिंदु राष्ट्रात हिंदूंचा ऐतिहासिक, आध्यात्मिक वारसा अन्य कोणी नव्हे, तर हिंदूच स्वाभिमानाने जपतील ! – संपादक)