तुम्ही हिंदूंना ठार का मारत नाहीत ? – पाकमधील पत्रकाराला त्याच्या मुलाचा प्रश्‍न

पाकमधील शाळांमध्ये शिकवला जातो हिंदुद्वेष !

पाकमध्ये गेल्या अनेक दशकांपासून शाळांमध्ये हिंदुद्वेष शिकवला जात असूनही  हिंदूबहुल भारतातील आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी तो रोखण्यासाठी काहीही केले नाही, हे सत्य जाणा ! आता पाकमधीलच कुणी जर त्याविषयी बोलत असेल, तर ते दुर्मिळच म्हणावे लागले ! तरीही यात पालट होण्याची शक्यताही अल्पच आहे, ही वस्तूस्थिती आहे ! – संपादक

ईशनिंदेवरून जिवंत जाळण्यात आलेले प्रियांथा कुमारा

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकमध्ये श्रीलंकेच्या एका नागरिकाला ईशनिंदेवरून जिवंत जाळल्याच्या प्रकरणी दूरचित्रवाहिनीवरील एका कार्यक्रमात सरकारी आणि खासगी शाळांतून विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या शिक्षणाविषयी प्रश्‍न उपस्थित करण्यात आला. कार्यक्रमात सहभागी झालेल्या एका पत्रकाराने म्हटले की, पाकिस्तानमध्ये मुलांना शाळेत काय शिकवले जाते ? जेव्हा माझा मुलगा शाळेतून घरी येतो, तेव्हा मला विचारतो ‘पाकमध्ये हिंदूही रहातात का ?’ त्यावर मी त्याला ‘हो. माझे काही मित्रही हिंदू आहेत’, असे उत्तर दिले. यावर त्याने मला ‘आपण सिंधमध्ये रहातो, तर आपण हिंदूंना ठार का मारत नाही ?’, असा धक्कादायक प्रश्‍न विचारला. हे ऐकल्यानंतर मी स्तब्ध झालो. मी नंतर शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटलो. तो पत्रकार पुढे म्हणाला की, शाळेत देण्यात येणारे शिक्षण द्वेषयुक्त आहे. अशा शाळेत मुले दुसरे काय शिकणार ? शाळेत काय शिकवले जाते, यावर आता पालकांनाच लक्ष ठेवावे लागेल. गेल्या ४०-५० वर्षांपासून शाळांत अशी द्वेषयुक्त शिकवण दिली जात आहे. यावर कुणीही उघडपणे बोलत नाही.