(‘सूमोटो’ म्हणजे न्यायालयाने स्वतःहून नोंद घेतलेली याचिका)
पणजी, ३ डिसेंबर (वार्ता.) – कुंभारजुवे येथील आमदार पांडुरंग मडकईकर यांनी गैरवाजवी संपत्ती बाळगल्याच्या प्रकरणी प्रविष्ट केलेल्या खटल्यामध्ये भ्रष्टाचारविरोधी विभागाच्या माजी अधीक्षक प्रियांका कश्यप यांच्या विरोधात ‘सूमोटो’ (न्यायालयाने स्वतःहून नोंद घेतलेली) याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. ही याचिका रहित करण्यात यावी, अशी विनंती करणारा अर्ज अधीक्षक प्रियांका कश्यप यांनी लोकायुक्तांकडे सादर केला आहे. २२ डिसेंबर २०२१ या दिवशी लोकायुक्त न्यायमूर्ती अंबादास जोशी यांच्यासमोर या अर्जाविषयी सुनावणी होणार आहे. प्रियांका कश्यप सध्या देहली येथे पोलीस उपआयुक्त म्हणून काम करत आहेत. यापूर्वी १५ सप्टेंबर २०२० या दिवशी माजी लोकायुक्त न्यायाधीश पी.के. मिश्रा यांनी भ्रष्टाचारविरोधी विभागाला पांडुरंग मडकईकर यांच्या विरोधात प्रथमदर्शी अहवाल प्रविष्ट करण्याचा आदेश दिला होता, तसेच याविषयी कायद्यानुसार प्रियांका कश्यप त्यांचे कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरल्या असल्याने त्यांच्या विरोधात ‘सूमोटो’ याचिका प्रविष्ट करण्यात यावी, असे म्हटले होते. ७ जून २०१८ या दिवशी अधिवक्ता आयरिश रॉड्रीग्स यांनी ‘मी पांडुरंग मडकईकर यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीविषयी भ्रष्टाचारविरोधी विभागाने कोणतीही कारवाई केली नाही’, अशी तक्रार लोकायुक्तांकडे प्रविष्ट केली होती.