भारताच्या तीव्र विरोधानंतर श्रीलंकेकडून चीनच्या आस्थापनाला दिलेला सौरऊर्जा प्रकल्प रहित

नवी देहली – श्रीलंकेकडून एका चिनी आस्थापनाला सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे कंत्राट सोपवल्यावरून भारताने जानेवारीमध्ये श्रीलंकेचा निषेध केला होता. आता श्रीलंकेतील चीनच्या दूतावासाने केलेल्या ट्वीटनुसार, ‘तिसर्‍या देशाकडून सुरक्षेविषयी चिंता व्यक्त करण्यात आल्यानंतर उत्तरेकडील बेटांवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रकल्प श्रीलंकेकडून रहित करण्यात आला आहे.’ ‘तिसरा देश’ म्हणतांना चीनने भारताचा उल्लेख टाळला आहे. याच आस्थापनाने मालदीवमध्येही कंत्राट मिळवल्याचा उल्लेख चिनी दूतावासाने या ट्वीटमध्ये केला आहे. हा सौरऊर्जा प्रकल्प उत्तर भागातील ३ बेटांवर उभारले जाणार होते आणि हा भाग भारताच्या तमिळनाडूच्या अगदी जवळ असल्याने भारताने याला विरोध केला होता.

यापूर्वी, श्रीलंकेने निकृष्ट दर्जाचे कारण देत चीनकडून २० सहस्र टन सेंद्रिय खतांची पहिली खेप स्वीकारण्यास नकार दिला होता. यानंतर संतापलेल्या चीनने श्रीलंकेतील एका बँकेला काळ्या सूचीमध्ये टाकले होते. यानंतर श्रीलंकेने चीनऐवजी भारताकडून सेंद्रीय खतांचा करार केला होता.