५७ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला तळेगाव दाभाडे, जिल्हा पुणे येथील कु. नलिन श्रेय टोंपे (वय ११ वर्षे) !

उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. नलिन श्रेय टोंपे हा या पिढीतील एक आहे !

‘वर्ष २०१६ मध्ये ‘कु. नलिन श्रेय टोंपे उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ५१ टक्के पातळीचा’, असे घोषित करण्यात आले होते. आता त्याची पातळी ५७ टक्के झाली आहे. आता त्याच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे त्याची साधनेत प्रगती होत आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कु. नलिन टोंपे

कु. नलिन श्रेय टोंपे यास वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

‘कार्तिक कृष्ण पक्ष चतुर्दशी (३.१२.२०२१) या दिवशी चि. नलिन श्रेय टोंपे याचा ११ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

(‘वर्ष २०१६ मध्ये चि. नलिन याची ५१ टक्के आध्यात्मिक पातळी होती.’ – संकलक)

१. लहान वयातही स्वयंपाकाची आवड असणे

चि. नलिन सर्व स्वयंपाक करतो आणि इतर पदार्थही बनवतो. ते पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटते. लहानपणापासून त्याला स्वतः पदार्थ बनवून दुसर्‍याला खाऊ घालण्यास आवडते. तो त्याच्या लहान भावालाही (चि. मननलाही) त्याच्या आवडीचे पदार्थ करून खायला देतो.

डॉ. (सौ.) कृपा टोंपे

२. तो लहान भावाची पुष्कळ काळजी घेतो.

३. मनमिळाऊ

कोरोना महामारीच्या संसर्गामुळे झालेल्या दळणवळण बंदीच्या कालावधीत आम्ही टाकवे येथून तळेगाव दाभाडे येथे (‘Floracity’ या सोसायटीत) रहाण्यास आलो. नलिनने ही जागा नवीन असूनही ६ ते ८ मासांत येथील पुष्कळ जणांच्या ओळखी करून घेतल्या.

४. आवड-निवड नसणे

लहानपणापासून त्याला कपड्यांची आवड-निवड नाही. तो ११ वर्षांचा झाला, तरीही त्याला मी जे कपडे विकत घेते, तेच तो घालतो.

५. राग अल्प असणे

नलिनला राग अल्प येतो आणि कधी आलाच, तर तो १ – २ मिनिटांच्या वर टिकत नाही. मी कधी रागवले, तर तो एकाच मिनिटात माझ्याजवळ येतो आणि ‘‘आई, तू माझ्या चांगल्यासाठीच रागवतेस ना ?’’ असे म्हणून माझ्या गळ्यात पडतो.

६. स्वतःत पालट करण्याची तळमळ असणे

त्याला मोठी माणसे रागावली, तर वाईट वाटत नाही; पण ‘ते का रागवले ?’ हे मात्र तो जाणून घेतो आणि त्यानुसार स्वतःत पालट करण्याचा प्रयत्न करतो.

७. धर्माचरणी

तो बसून नामजप करतो. त्याला धर्माचरण करायला आवडते. मी त्याला सनातन संस्थेचे ‘ऑनलाईन’ सत्संग ऐकण्यास सांगितले. तेव्हापासून तो सत्संग ऐकतो आणि सत्संगात सांगितल्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करतो.

८. भाव

८ अ. शिवाची पिंडी बनवून तिची भावपूर्ण पूजा करणे

१. चि. नलिनने ‘दळणवळण बंदी’च्या काही दिवस आधी (पांढर्‍या सिमेंटची) शिवाची पिंडी बनवली. तो प्रतिदिन तिची मनोभावे पूजा करतो. पूजेत त्याचा एकही दिवस खंड पडला नाही. अगदी दूध, दही, तूप, साखर आणि मध या सगळ्यांनी तो शिव पिंडीला भावपूर्ण अभिषेक करतो. त्याचे पाहून त्याचा लहान भाऊ चि. मननसुद्धा पूजा करू लागला. ते दोघे सकाळी उठून आणि सोवळे नेसून पूजा करतात.

२. प्रदोषाच्या दिवशी तो सकाळी उठून शिवाला अभिषेक करून पूजा करतो आणि स्वतः भात शिजवून दही-भाताचा नेवैद्यही दाखवतो.

३. एकदा तो मला म्हणाला, ‘‘आई, मला पूजा करतांना प्रत्यक्ष शिव दिसतो आणि माझा भाव जागृत होतो.’’

८ आ. चि. नलिनने आषाढी एकादशीच्या दिवशी श्रीकृष्णाच्या चित्रासाठी तुळशीचा सुंदर हार केला होता.

८ इ. शाडूची माती गोळा करून गणपतीची मूर्ती सिद्ध करणे : त्याला मातीची गणपतीची मूर्ती बनवायला आवडते. त्यासाठी तो सर्व कष्ट घ्यायला सिद्ध असतो. त्याने शाळेतून येतांना थोडी थोडी शाडूची माती आणून ती गोळा केली आणि यावर्षी माझ्या (आईच्या) आणि मनन यांच्या साहाय्याने गणपतीची मूर्ती बनवली.

कु. नलिन याने बनवलेली गणपतीची शाडूची मूर्ती

९. शेजारच्या काकूंना शिवपिंडी बनवून देणे आणि सत्संगात ऐकून त्यांना ‘शिवाची उपासना कशी करायची ?’, हे सांगणे

श्रावण मासात आमच्या शेजारील सौ. देशपांडे (त्या दुबई येथे निवासास असतात.) यांना नलिन आणि मनन यांनी शिवपिंडी बनवून दिली. त्या काळात सद्गुरु जाधवकाकांनी ‘ऑनलाईन’ सत्संगात ‘शिवाची उपासना कशी करायची ?’, हे सांगितले. ते सर्व त्याने सौ. देशपांडेकाकूंना समजावून सांगितले.काकूंच्या घरी गणपति आणि गौरी येतात. त्या वेळी त्याने स्वतः काकूंना फुलांचे हार सिद्ध करून दिले.

१०. नलिन कोणतीही कृती करतांना नामजप करतो. काही चूक झाल्यास ‘देवाची क्षमा माग’, असे सांगितल्यावर तो लगेच क्षमा मागतो.

११. अनुभूती

११ अ. शिवाच्या पिंडीची पूजा करतांना आलेल्या अनुभूती

१. नलिन शिवाच्या पिंडीची पूजा करतो, तेथे एक बेलाचे झाड आहे. तो प्रतिदिन शिवाच्या पिंडीला त्या बेलाच्या झाडाची पाने वहातो. ‘या वर्षी त्या बेलाच्या झाडाला पुष्कळ पालवी फुटली आहे’, असे लक्षात आले.

२. तो पूजा करतो, त्या ठिकाणी कुंडीत एक तुळशीचे रोपही आले आहे आणि ते चांगले डेरेदार झाले आहे.

३. ‘तुळशीच्या कुंडीच्या ठिकाणी लावलेला दिवा वारा आला, तरी विझत नाही’, असे लक्षात आले.

१२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा आणि भाव

अ. त्याची परात्पर गुरु डॉक्टरांवर पुष्कळ श्रद्धा आहे. त्याला त्यांच्याविषयी पुष्कळ आदर आणि प्रेमही आहे. त्याला त्यांचे सत्संग ऐकायला आवडतात.

आ. ९.७.२०२० या दिवशी त्याला एक स्वप्न पडले. स्वप्नात त्याला परात्पर गुरु डॉक्टर घरी आलेले दिसले. ते पूर्ण घरात फिरले. त्यांनी घरातील सर्वांना आशीर्वाद दिला. नंतर सर्वांनी त्यांची पूजा केली. ‘ते निघतांना मी रडलो’, असे त्याने मला सांगितले.

१३. स्वभावदोष

अ. उतावळेपणा

आ. अस्थिर असणे

– डॉ. (सौ.) कृपा श्रेय टोंपे, तळेगाव दाभाडे, जि. पुणे. (१३.७.२०२०)


यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.


येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक