बिहार विधानसभेच्या आवारात सापडल्या दारूच्या रिकाम्या बाटल्या !

बिहारमधील दारूबंदीचे तीन तेरा !

विधानसभेच्या परिसरात कडक सुरक्षाव्यवस्था असतांना तेथे दारूच्या रिकामी बाटल्या सापडतातच कशा ? कुंपणच शेत खात असेल, तर याची कसून चौकशी करून संबंधितांना शिक्षा झाली पाहिजे. आज दारूच्या बाटल्या येऊ शकतात, तर उद्या आतंकवादी आणि गुन्हेगारही येऊन काहीही करू शकतात ! – संपादक

डावीकडे राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव

पाटलीपुत्र (बिहार) – येथील राज्याच्या विधानसभेच्या आवारात दारूच्या रिकाम्या बाटल्या सापडल्याल्याने राज्यातील दारूबंदीचा फज्जा उडाल्याचे समार आले आहे, तसेच विधानसभेच्या सुरक्षेविषयीही प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. राज्यात यापूर्वीच दारूबंदी असतांनाही गावठी दारू प्यायल्याने अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत.

विधानसभेच्या आवारात दारूच्या बाटल्या सापडल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या त्यागपत्राची मागणी केली आहे. तसेच विधानसभेत हा प्रश्‍न उपस्थित केल्यावर अध्यक्षांनी ‘उद्यापासून विधानसभेची सुरक्षा वाढवली जाईल’, असे सांगितले. (मुळात सुरक्षेत कुठे चूक झाली आणि त्याला कोण उत्तरदायी आहे, हेही शोधले पाहिजे ! – संपादक)

दारूबंदीवरून दोन आमदारांची विधानसभेच्या सभागृहातच एकमेकांना शिवीगाळ

अशा नीतीमत्ताहिन लोकप्रतिनिधींची आमदारकी रहित केली पाहिजे ! वास्तविक अशा लोकप्रतिनिधींना निवडून देणारे नागरिकही याला उत्तरदायी आहेत ! – संपादक

हिवाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी दारूबंदीचे सूत्र विधानसभेत चर्चेला आल्यावर राष्ट्रीय जनता दलाचे आमदार भाई वीरेंद्र आणि भाजपचे आमदार संजय सरावगी यांच्यात बाचाबाची झाली. ते सभागृहातच एकमेकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करू लागले.