शेतकर्‍यांना दिवसा वीज द्या !

जळगाव जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांत शेतीसाठी आठवड्यातून ३ दिवस सकाळी ८ ते सायंकाळी ४ आणि उर्वरित ४ दिवस रात्री ११ ते सकाळी ७ असा ८ घंटे वीजपुरवठा केला जातो. खरीप हंगामात अतीवृष्टी आणि वादळ यांचा शेतकर्‍यांना मोठा फटका बसला होता. त्यातून बाहेर पडत शेतकरी रब्बी हंगामाची सिद्धता करत आहेत. त्यातच सरकारने वीजपुरवठ्याविषयी घेतलेल्या अनाकलनीय निर्णयामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

सर्वच शासकीय कार्यालये, न्यायालये, मंत्रालय ही सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत चालतात; मात्र शेतकर्‍यांना रात्री वीजपुरवठा करण्याच्या सरकारच्या धोरणामुळे शेतकर्‍याला ‘दिवसरात्र’ काम करावे लागणार आहे. पिकांना पाणी देण्यासाठी कडाक्याच्या थंडीतही शेतात जाण्याविना पर्याय नाही. दिवसभर शेतात काबाडकष्ट करून रात्री वीज येणार म्हणून शेतकर्‍याने पुन्हा शेतात जायचे. हा कुठला न्याय ? रात्री जंगलातील वन्य प्राणी, साप, विंचू अशा प्राण्यांचाही त्रास होण्याची शक्यता असते. एकाच वेळी सर्व शेतकर्‍यांनी शेतीचे पंप चालू केल्याने रोहित्रावरील भार वाढतो. त्यामुळे रोहित्र, वीजवाहिन्या नादुरुस्त होतात. परिणामी समस्या सोडवण्यासाठी रात्री-अपरात्री जंगलात
फिरावे लागते.

समस्या सुटण्यासाठी वीजवितरण आस्थापनाकडे पाळधी (जिल्हा जळगाव) येथील ग्रामपंचायतीने निवेदन दिले. त्यावर तेथील अधिकार्‍यांनी ‘सर्व महाराष्ट्रात भारनियमनाचे जे धोरण आहे, त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे’, असे उत्तर देऊन दायित्व झटकले. शेतकरी नेहमीच अडचणीत सापडतो. मग शेतकर्‍यांविषयी कळवळा दाखवणारे गप्प का ? असा प्रश्न त्यांच्या मनात आल्यावाचून रहात नाही कि ‘शेतकर्‍याचा कळवळा कुणालाच नाही ?’, असेही मनात येते. ‘एक दिवस राज्यातील आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांना रात्री शेतात पाणी भरण्यास बोलवायला हवे, म्हणजे समस्या कळेल’, असे संतापजनक लिखाण सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित होत आहे. वीजपुरवठ्याच्या समस्येवर उपाययोजना निघाली नाही, तर शेतकरी त्यांचा संताप कोणत्या प्रकारे व्यक्त करतील, हे येणारा काळच ठरवेल. तरी ‘महावितरणने दिवसाचे ८ घंटे शेतकर्‍यांना वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा’, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे.

– श्री. नीलेश पाटील, जळगाव