ताप आलेल्या पुतणीची तुरटीने दृष्ट काढल्यानंतर तिचा त्रास न्यून होऊन तिला शांत झोप लागणे

१. पुतणीच्या अंगावर पुरळ येऊन तिला ताप येणे, आधुनिक वैद्यांनी संसर्ग (इन्फेक्शन) झाला असल्याचे सांगून औषधे देणे आणि औषधे घेऊनही तिला दोन रात्र झोप न लागणे : ‘माझी पुतणी कु. सई सचिन कोचरेकर (वय २ वर्षे) हिच्या अंगावर रात्री अकस्मात् पुरळ येऊन तिला ताप आला. तिच्या संपूर्ण अंगाला सूज आली होती. दुसर्‍या दिवशी अंगावरचे डाग अधिक वाढले होते. आम्ही तिला घेऊन आधुनिक वैद्यांकडे गेलो. तेव्हा त्यांनी संसर्ग (इन्फेक्शन) झाला असल्याचे निदान केले आणि औषधे दिली. औषधे घेऊनही तिला दोन रात्र झोप लागली नाही. ती रात्रभर रडत होती.

२. कुलदेवतेला प्रार्थना करून पुतणीची तुरटीने दृष्ट काढणे, दृष्ट काढलेली तुरटी तापलेल्या तव्यावर टाकल्यावर तिचा आकार कुत्र्यासारखा होणे, त्या आकृतीकडे पाहून मळमळणे आणि दृष्ट काढून झाल्यावर पुतणीचा त्रास न्यून होऊन तिला शांत झोप लागणे : त्या वेळी ‘तिची तुरटीने दृष्ट काढावी’, असा मी विचार केला आणि कुलदेवतेला प्रार्थना करून तिची तुरटीने दृष्ट काढली. दृष्ट काढलेली तापलेल्या तव्यावर तुरटी टाकली, तर ती तुरटी वितळून तिचा आकार कुत्र्यासारखा झाला होता. त्या आकृतीतील डोक्याचा भाग स्थिर होता; परंतु छाती आणि पोट यांचा भाग मोठमोठ्याने श्वासोच्छ्वास केल्यासारखा हलत होता. ‘एखाद्या प्राण्याचा मृत्यू होतांना त्याला जशी धाप लागते, तशी धाप त्या कुत्र्याला लागली आहे’, असे आकृतीत दिसत होते. त्या आकृतीकडे पाहून मला मळमळत होते. तिची दृष्ट काढून झाल्यावर तिचा त्रास न्यून झाला आणि त्या रात्री तिला शांत झोप लागली.’

– श्री. सतीश कोचरेकर, मुलुंड, मुंबई. (३१.१.२०२०)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.