१. साधकांमध्ये साधनेचे गांभीर्य निर्माण करणे
१ अ. साधकांना अत्यंत प्रेमाने सेवेला उद्युक्त करणे : ‘एकदा पू. (सौ.) जाधवकाकू सकाळी गावाहून मुंबईला आल्या. त्या दिवशी सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांचा वाढदिवस होता. तेव्हा त्यांनी प्रवासाहून आल्यावर लगेच सेवाकेंद्रातील आम्हा सर्व साधकांना खाऊ दिला आणि चहा करून दिला. तेव्हा आम्ही आईची माया अनुभवली. नंतर त्या म्हणाल्या, ‘‘सद्गुरु अनुताई यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना साधकांनी सेवा केलेलीच आवडेल.’’ त्यांनी आम्हाला समष्टी सेवेला जाण्यास प्रोत्साहन दिले.
१ आ. साधकांमध्ये चुकांविषयी खंत निर्माण करणे : त्या ‘आमच्यात चुकांची खंत आणि साधनेचे गांभीर्य निर्माण व्हावे’, यासाठी आमच्याकडून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवून घ्यायच्या. एखादी मोहीम किंवा एखादा उपक्रम असल्यास पू. (सौ.) जाधवकाकू सत्संग घेऊन आमच्यात गांभीर्य निर्माण करायच्या आणि ‘त्यातून साधना कशी होईल ?’, याविषयी आम्हाला सांगायच्या.
१ इ. साधिकेला मायेतून सोडवून तिच्याकडून साधना करवून घेणे : पू. (सौ.) जाधवकाकूंनी मला साधनेची दिशा दिली. त्यांच्यामुळेच मी सेवा करू शकले. माझी मुलगी २ वर्षांची होती. तेव्हा मला सेवेला वेळ देता येत नव्हता; पण पू. (सौ.) जाधवकाकूंमुळेच माझी सेवा होऊ लागली. त्या मला अखंड प्रोत्साहन द्यायच्या, ‘‘मुलीची काळजी न करता सर्व काही देवावर सोपवले, तर देव काळजी घेतो. आपण अखंड सेवेतच रहायला हवे.’’ पू. (सौ.) जाधवकाकूंनी हे स्वतःच्या उदाहरणावरून मला शिकवले. ‘मी मनापासून आणि झोकून देऊन सेवा करावी’, यासाठी त्या मला साहाय्य करायच्या. त्यांनी माझ्याकडून गुरुपौर्णिमेच्या प्रवचनाची सिद्धता करवून घेतली. ती सेवा देवाला अपेक्षित अशी होईपर्यंत त्यांनी माझ्याकडून सराव करवून घेतला.
१ ई. पू. (सौ.) जाधवकाकूंमुळे साधकांना सेवेतील आनंद आणि सेवाकेंद्रातील चैतन्य अनुभवता येणे : वर्ष २०१७ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या वेळी आमच्याकडून झोकून देऊन सेवा व्हावी; म्हणून त्यांनी आम्हाला दादर सेवाकेंद्रात रहायला येऊन धर्मप्रसाराच्या सेवा करण्यास सुचवले. त्यांच्यामुळे आम्हाला सेवेतील आनंद आणि सेवाकेंद्रातील चैतन्य अनुभवायला मिळाले. अन्यथा माझ्यासाठी मुलीला सोडून रहाणे कठीणच होते. पू. (सौ.) जाधवकाकूंमुळेच मला ते शक्य झाले आणि त्यातील आनंद अनुभवता आला.
२. ‘साधकांची साधना व्हावी’, यासाठी दिवस-रात्र प्रयत्नरत असणे
२ अ. ‘प्रत्येक साधकाची साधना व्हावी’, अशी तळमळ : ‘पू. (सौ.) जाधवकाकू मुंबई येथे आल्यापासून ‘त्या ठिकठिकाणच्या साधकांच्या साधनेची घडी बसवण्यासाठी ठिकठिकाणी जाऊन तेथील साधकांना भेटणे, ‘प्रत्येक साधक सेवेत सहभागी होत आहे ना?’, याकडे लक्ष देणे, त्याच्या व्यष्टी साधनेची घडी बसण्यासाठी वेगवेगळ्या आढावा पद्धती चालू करणे, साधकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणे, साधकांना त्रास होत असल्यास त्यावर लगेच नामजपादी उपाय सांगणे’, असे प्रयत्न अखंड करत आहेत. त्या उत्तरदायी साधकांमध्ये त्यागाची वृत्ती आणि भाव निर्माण होण्यासाठी अन् त्यांच्या व्यष्टी साधनेची घडी बसण्यासाठी सतत प्रयत्न करतात.
२ आ. साधकांकडून भावजागृतीचे प्रयत्न करवून घेणे : त्या प्रत्येक सत्संगात भावजागृतीसाठी वेगवेगळे भावप्रयोग करवून घ्यायच्या. परात्पर गुरुमाऊलींना अनुभवण्यासाठी त्या आम्हाला गुरुदेवांच्या खोलीत सूक्ष्मातून घेऊन जायच्या आणि आम्हाला गुरुदेवांना अनुभवता येईपर्यंत त्या आमच्याकडून प्रयत्न करून घेत असत. त्यांनी आम्हाला ‘दिवसभरात १०० वेळा परात्पर गुरुमाऊलींना अनुभवण्याचे प्रयत्न करायचे’, असे ध्येय दिले होते. पू. (सौ.) जाधवकाकूंमुळेच हा भावप्रयोग आम्हाला अनुभवता यायचा.
२ इ. तीव्र शारीरिक त्रासातही घंटोन्घंटे अविश्रांत सत्संग घेणे : पू. काकूंना तीव्र शारीरिक त्रास होत असूनही त्या घंटोन्घंटे सत्संग घेतात. त्या गुरुपौर्णिमा, कार्यशाळा, अधिवेशन, अशा उपक्रमांच्या वेळी अनेक सत्संग जराही विश्रांती न घेता घेतात. एक सत्संग झाल्यावर लगेच दुसरा, असे कित्येक दिवस होत असते.
३. परात्पर गुरुमाऊली आणि सद्गुरु अनुताई यांच्यावर दृढ श्रद्धा असणे
३ अ. गुरुमाऊलीच्या नामघोषात प्रत्येक कृती करणार्या पू. काकू ! : पू. (सौ.) जाधवकाकूंच्या प्रत्येक वाक्याच्या आरंभी परात्पर गुरुमाऊलीचे नाव असते आणि परात्पर गुरुमाऊलीच्या चरणी कृतज्ञता अर्पण करून त्यांचे बोलणे थांबते. त्यांचे हात नेहमी कृतज्ञताभावाने जोडलेले असतात. एकदा मला त्यांच्या खोलीत झोपण्याची संधी मिळाली. तेव्हा पू. काकू झोपण्यापूर्वी प्रार्थना करत असतांना ‘त्यांच्या समोर साक्षात् गुरुमाऊली उभी आहे’, असे मला जाणवत होते. पू. (सौ.) जाधवकाकू नमस्काराच्या मुद्रेतच झोपी गेल्या. तेव्हा त्यांच्याकडे पाहून माझी भावजागृती होत होती.
३ आ. सद्गुरु अनुताईंना कर्तेपणा अर्पण करणे : पू. (सौ.) जाधवकाकू नेहमी सांगायच्या, ‘‘मी केवळ सद्गुरु (कु.) अनुताईंमुळे उभी आहे. त्या मला आध्यात्मिक बळ देतात. त्या माझ्याकडून सर्व काही करवून घेतात. मी काहीच करत नाही.’’ त्या कर्तेपणा देवाला अर्पण करतात.
३ इ. सद्गुरु (कु.) अनुताई आणि पू. (सौ.) जाधवकाकू एकमेकींशी एकरूप झाल्याचे जाणवणे : ‘सद्गुरु (कु.) अनुताई आणि पू. (सौ.) जाधवकाकू या दोघी एकमेकींशी एवढ्या एकरूप झाल्या आहेत की, दोघींमध्ये एकमेकींचा भास होतो. कधी कधी त्या दोघींनी सांगितलेल्या सूत्रांचा आशय समान असतो. ‘सद्गुरु (कु.) अनुताईंना आमच्याकडून ज्या पद्धतीने साधना होणे अपेक्षित आहे, तशी साधना आमच्याकडून व्हावी’, यासाठी पू. (सौ.) जाधवकाकू आम्हाला सतत मार्गदर्शन करत असतात.
४. पूर्णवेळ साधना करण्यासाठी साहाय्य करणे
मला आणि माझ्या यजमानांना पूर्णवेळ साधना करण्यासाठी सद्गुरु (कु.) अनुताई आणि पू. (सौ.) जाधवकाकू यांनी पुष्कळ बळ दिले. त्यांनी आम्हाला या निर्णयप्रक्रियेत अनमोल मार्गदर्शन केले आणि सर्वतोपरी साहाय्य केले; म्हणूनच आम्हाला या प्रक्रियेतील आनंद घेता आला.
५. कठीण प्रसंगातही देवावरची श्रद्धा डळमळू न देता स्थिर रहाणे
एकदा दुपारी पू. (सौ.) जाधवकाकू जेवत असतांना अकस्मात् त्यांची प्रकृती बिघडली. त्यांचा तोंडवळा वाकडा झाला आणि त्यांची हालचाल बंद झाली. हे पाहून आम्ही घाबरलो. आम्ही त्यांना उचलून त्यांच्या खोलीत आणले. आम्ही आधुनिक वैद्यांना बोलावले आणि सद्गुरु (कु.) अनुताईंना भ्रमणभाष लावला. पू. (सौ.) जाधवकाकू या कालावधीत स्थिर होत्या. ‘गुरुमाऊली त्यांच्या समवेत आहे’, असे त्यांना जाणवत होते. त्यांच्याकडे पाहून ‘त्यांना काही होत आहे’, असे आम्हाला वाटत नव्हते. त्यांचा नामजप चालू होता.
६. पू. (सौ.) जाधवकाकू म्हणजे मूर्तीमंत त्याग !
७. कृतज्ञता आणि प्रार्थना
सद्गुरु (कु.) अनुताई आणि पू. (सौ.) जाधवकाकू यांची माया शब्दांत वर्णन करणे कठीण आहे. परात्पर गुरुमाऊलींमुळे आम्हाला सद्गुरूंच्या सान्निध्यात आणि पू. (सौ.) जाधवकाकूंच्या समवेत रहाण्याची अन् शिकण्याची संधी मिळाली. त्यांनीच ही सर्व सूत्रे लिहून घेतली. त्याबद्दल गुरुमाऊलीच्या चरणी कोटीशः ! ‘देवा, हे सर्व माझ्या आचरणात येऊन मला लवकरात लवकर आपल्या चरणी विलीन होता येऊ दे’, अशी शरणागतीने प्रार्थना आहे.’
– सौ. तन्वी सरमळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.७.२०१८)