सांगली येथून गोवा येथे स्थलांतरित होतांना पू. सदाशिव परांजपेआजोबा (वय ७८ वर्षे) आणि पू. (सौ.) शैलजा परांजपेआजी (वय ७३ वर्षे) यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

सनातनचे ८९ वे संत पू. सदाशिव परांजपेआजोबा आणि ९० व्या संत पू. (सौ.) शैलजा परांजपेआजी हे मूळचे सांगली येथील आहेत. ते श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे माता-पिता आहेत. सांगली येथून गोवा येथे स्थलांतरित होतांना त्यांनी ‘अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले अन् श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता’, यांविषयीची सूत्रे येथे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘समर्थ रामदासस्वामी यांच्या ‘दासबोध’ या ग्रंथात ‘गुरुमहिमा’ वर्णन केला आहे. त्यात समर्थ म्हणतात, ‘गुरु इतके थोर असतात की, आपण त्यांना कशाचीच उपमा देऊ शकत नाही. त्यांच्या कार्याची आपण कशाशीच बरोबरी करू शकत नाही.’ त्याप्रमाणे ‘ज्यांच्या महानतेची तुलना कशाशीच करता येणार नाही’, असे आम्हा सर्व साधकांना परमेश्वरकृपेने लाभलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटी कोटी वंदन !

– (पू.) सौ. शैलजा परांजपे

पू. सदाशिव परांजपे

१. वर्ष २०१९ मध्ये सांगली येथे आलेल्या महापुरामुळे घर आणि दुकान यांची पुष्कळ हानी होणे

माझे यजमान पू. सदाशिव नारायण परांजपे यांचा जन्म सांगलीतच झाला. माझ्या लग्नानंतर गेली ५४ वर्षे आम्ही सांगली येथे रहात होतो. ते वयाच्या १६ व्या वर्षापासून सांगली येथे ‘डी.पी. परांजपे कोल्ड्रिंक हाऊस’ हे दुकान चालवत होते. वर्ष २०१९ मध्ये सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीला महापूर आला. या महापुरात आमचे घर आणि दुकान यांची पुष्कळ हानी झाली. या महापुराच्या वेळी परात्पर गुरुदेवांच्या कृपेनेच आम्ही जिवंत राहू शकलो.

पू. (सौ.) शैलजा परांजपे

२. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी ‘सांगली येथील घर विका आणि गोवा येथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी येऊन साधना करा’, असे सांगणे

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (माझी मोठी कन्या) यांनी आम्हाला सांगितले, ‘‘आई-बाबा, तुम्ही आता मायेत अडकू नका. सांगलीत राहू नका. यापुढील आपत्काळात अशी संकटे वारंवार येतील. आताच आपली इतकी वित्तहानी झाली आणि तुम्हाला शारीरिक अन् मानसिक त्रासही झाला. आता तुमचे वयही झाले आहे. तुम्ही हे घर विका आणि गोवा येथे परात्पर गुरुदेवांच्या चरणी या अन् तिथे साधना करा. उर्वरित आयुष्य देवाच्या चरणी सार्थकी लागू दे.’’

श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

३. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगली येथे आमच्या घराशेजारी रहाणारी आमची द्वितीय कन्या आणि जावई यांनाही गोवा येथे स्थलांतरित होण्याविषयी सांगणे

आमची द्वितीय कन्या सौ. मधुरा (माहेरचे नाव ‘कल्पना’ असल्यामुळे सौ. कल्पना असा उल्लेख आहे.) सहस्रबुद्धे (श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची धाकटी बहीण) आणि जावई श्री. मनोज सहस्रबुद्धे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) हे सांगली येथे आमच्या घराच्या शेजारीच रहात होते. वर्ष २००० पासून ते आमचे ‘डी.पी. परांजपे कोल्ड्रिंक्स हाऊस’ हे दुकान चालवत होते. श्री. मनोज यांना संगीत कलेची आवड आहे. ते सतार छान वाजवतात. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्री. मनोज यांना सांगितले, ‘‘ तुम्हाला अध्यात्माची आवड आहे; म्हणून तुमच्यात असलेली कला तुम्ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी समर्पित करा. तुम्ही ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ येथे संगीताच्या माध्यमातून सेवा करा आणि संगीतातून ईश्वरप्राप्ती करून घ्या. तिथे तुमचे कल्याण होईल. तुमचे आयुष्य सार्थकी लागेल.’’ पुढे आमच्याबरोबर तेही गोव्याला आले.

४. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी गोवा येथे स्थलांतरित व्हायला सांगितल्यावर ‘त्यांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले बोलावत आहेत’, असा विचार येणे

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी गोवा येथे स्थलांतरित होण्यास सांगितल्यानंतर माझ्या मनात गुरुचरणी जाण्याची ओढ निर्माण झाली. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘परात्पर गुरुदेवांच्या कृपेने आतापर्यंत आमचा प्रपंच व्यवस्थित झाला. परात्पर गुरुदेवांच्या कृपाशीर्वादाने आम्हाला श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यासारखे कन्यारत्न लाभले, तसेच सौ. कल्पना सहस्रबुद्धे आणि सौ. शीतल गोगटे (धाकटी कन्या, ६५ टक्के आध्यात्मिक पातळी) याही दोन गुणी अन् साधनारत असणाऱ्या मुली लाभल्या. आता आपले काय राहिले आहे ? उर्वरित आयुष्य गोवा येथे साधकांच्या समवेत साधनेत घालवूया. आता प्रपंचात अडकून पडायला नको. ही माया न संपणारी आहे. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून परात्पर गुरुदेवच आम्हाला बोलावत आहेत.’ त्यानंतर ‘श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ सांगत आहेत, त्याप्रमाणेच करूया’, असे माझे मन मला सारखे सांगत होते.

श्री. मनोज सहस्रबुद्धे

५. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्यानुसार सांगली येथील घर आणि दुकान विकून गोवा येथे स्थलांतरित होण्याचा निर्णय घेणे

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितल्यानंतर आमच्या मनाची सिद्धता झाली आणि आम्ही (मी, माझे यजमान, माझी मुलगी आणि जावई यांनी) रहाते घर आणि दुकान विकून गोवा येथे स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला.

५ अ. वयोमान आणि घर विकण्याची प्रक्रिया मोठी असल्याने आम्हा उभयतांची दगदग होणे : आमच्यासाठी ‘या वयात घर विकणे’ ही सोपी गोष्ट नव्हती. ‘घर विकणार हे सगळ्यांना सांगायचे, वृत्तपत्रात विज्ञापन द्यायचे, गिर्हाकईक आले की, त्यांना सगळे घर दाखवायचे, किंमत सांगायची’, या गोष्टींमुळे माझ्या यजमानांची दगदग होऊ लागली. त्यांना वयाच्या ७८ व्या वर्षी हा व्याप करणे कठीण होऊ लागले. लोक घराच्या किमतीविषयी पुष्कळ त्रास द्यायचे. आमचे घर असलेल्या भागात २ वेळा महापूर येऊन गेल्याने तो भाग ‘रेड झोन’ म्हणून घोषित केला होता. त्यामुळे आम्हाला घराची अपेक्षिश्रीसत्‌शक्‍तित असलेली किंमत द्यायला कुणीही सिद्ध नव्हते. आमचे नातेवाईक आणि शेजारी यांना आमचा घर विकण्याचा निर्णय मान्य नव्हता. त्यामुळे ते आम्हाला नावे ठेवायचे. या सर्व गोष्टींमध्ये आमचे ५ मास गेले.

५ आ. घर विकले जात नसल्याची अडचण श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना सांगितल्यावर त्यांनी ‘तुम्ही सामान घेऊन आश्रमात या, तुम्ही आधी एक पाऊल टाका, म्हणजे देव तुमच्या समवेत १० पावले येईल, ईश्वरी इच्छेनेच सर्व घडेल’, असे सांगणे : आम्ही ही अडचण श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली यांना सांगितली. त्या वेळी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली आम्हाला म्हणाल्या, ‘‘आई-बाबा, तुम्ही घर विकण्यासाठी गिऱ्हाईक येण्याची वाट पाहू नका. तुम्ही साहित्य घेऊन घराला कुलूप लावून आश्रमात या. तुम्ही आधी एक पाऊल टाका, म्हणजे देव तुमच्या समवेत १० पावले येईल. त्याच्या नियोजनाप्रमाणेच घराचे मूल्य येईल आणि त्याच्या मनात येईल, तेव्हाच घर विकले जाईल. तुम्ही पैशांची अपेक्षा ठेवू नका. ईश्वरी इच्छेनेच सर्व घडेल.’’ त्यानंतर माझ्या मनात विचार आला, ‘परात्पर गुरुदेवच श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली यांच्या माध्यमातून आम्हाला हे सर्व सांगत आहेत. परात्पर गुरुदेव त्रिकालज्ञानी आहेत. त्यांना आमची काळजी आहे. त्यामुळे आपणही त्यांचे आज्ञापालन करायलाच हवे.’ नंतर आम्ही घर विकले जाण्याचा विचार न करता गोवा येथे जाण्याचा निर्णय घेतला. ‘श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली यांचा शब्द म्हणजे गुरुआज्ञा’, असे मानून जावयांनीही (श्री. मनोज सहस्रबुद्धे यांनी) गोवा येथे जाण्याचा निर्णय घेतला. गुरुकृपेने आमचे दुकान आधीच विकले गेले होते.

सौ. मधुरा सहस्रबुद्धे

५ इ. घरातील साहित्याची बांधाबांध करण्याविषयी चिंता वाटणे; परंतु ‘परात्पर गुरुदेव पाठीशी असल्यावर काळजी कशाला करायची ?’, हा विचार दृढ असल्याने स्थिर रहाता येणे : त्यानंतर आम्हाला ‘घरातील साहित्याची बांधाबांध कशी करायची ? ते गोव्याला कसे न्यायचे ?’, याची थोडी चिंता वाटू लागली; पण ‘परात्पर गुरुदेव पाठीशी असल्यावर काळजी कशाला करायची ?’, हा विचार दृढ असल्याने आम्ही परात्पर गुरुदेवांवर सर्व भार सोपवून स्थिर राहिलो.

५ ई. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ‘तुम्ही लवकर इकडे या’, असे सांगितल्यावर परात्पर गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होणे : श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी आमची नात सौ. सायली करंदीकर (श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची मुलगी) हिला आमच्या साहाय्यासाठी सांगली येथे पाठवले. तिने आम्हाला पुष्कळ साहाय्य केले. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी आम्हाला भ्रमणभाषद्वारे संपर्क करून सांगितले, ‘‘आई-बाबा, तुम्ही साहित्य इकडे आणण्याची मुळीच काळजी करू नका. आपले साधक सर्वकाही करतील. तुम्ही लवकर इकडे या.’’ श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे बोलणे ऐकल्यावर माझी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

५ उ. साधकांनी कुशलतेने दोन्ही घरांतील साहित्य धर्मरथात ठेवणे आणि ते पाहून परात्पर गुरुदेवांनी साधकांना सर्व गोष्टींमध्ये सिद्ध केल्याविषयी कृतज्ञता व्यक्त होणे : २०.१.२०२१ या दिवशी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी आम्हाला सांगली येथून निघायला सांगितले. साधकांनी आमच्या आणि श्री. मनोज सहस्रबुद्धे यांच्या घरातील साहित्य इतक्या कुशलतेने धर्मरथात (सनातन संस्थेचे प्रसारसाहित्य विविध राज्यांमध्ये पाठवण्यासाठी असलेला मोठ्या ट्रकमध्ये) भरले की, एवढे साहित्य भरूनही धर्मरथात जागा शेष होती. त्या वेळी आम्हाला वाटले, ‘धर्मरथ मोठा होत चालला आहे कि काय ? इतके सामान धर्मरथात कसे बसले ?’ तेव्हा आम्हाला धर्मरथात परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व जाणवले. ‘परात्पर गुरुदेवांनी साधकांना सर्व कला शिकवून सर्व गोष्टींमध्ये सिद्ध केले आहे’, याची जाणीव होऊन आमची त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

६. रामनाथी आश्रमात येणे

६ अ. रामनाथी आश्रमात आल्यानंतर एका मासाच्या आत भ्रमणभाषद्वारे घराचा व्यवहार होऊन घर विकले जाणे आणि त्या वेळी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली यांनी सांगितलेले ‘तुम्ही एक पाऊल पुढे टाका..’, हे शब्द आठवणे : २०.१.२०२१ या दिवशी आम्ही रामनाथी आश्रमात आलो. आम्ही आश्रमात आल्यानंतर एक मासाच्या आतच भ्रमणभाषद्वारे आमच्या सांगली येथील घराचा व्यवहार ठरला आणि घर विकले गेले. त्या वेळी मला श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली यांचे ‘तुम्ही एक पाऊल पुढे टाका, म्हणजे देव १० पावले तुमच्या समवेत येईल’, हे शब्द आठवले. खरोखरच ‘श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली यांच्या माध्यमातून परात्पर गुरुदेव तुम्हीच बोललात’, याची आम्हाला प्रचीती आली.

६ आ. जुलै २०२१ मध्ये सांगली येथे आलेल्या महापुराविषयी समजल्यानंतर गुरुआज्ञापालनाचे महत्त्व लक्षात येणे आणि परात्पर गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होणे : ‘गुरुदेवा, श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे आज्ञापालन करून आम्ही आपल्या चरणी आलो; म्हणून या वर्षी २३.७.२०२१ या दिवशी सांगली येथे आलेल्या महापुरापासून आमचे रक्षण झाले. आम्ही सांगलीत ज्या ठिकाणी रहात होतो, तिथे सर्वांच्या घरात ५ फुटांपर्यंत पाणी आले होते. त्यामुळे अनेक जणांची पुष्कळ हानी झाली.’ हे सर्व पाहिल्यावर ‘गुरुआज्ञापालनाचे महत्त्व’ आमच्या लक्षात आले आणि आमची परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त झाली. आम्ही गोवा येथे जाण्याचा निर्णय घेल्यानंतर जे लोक आम्हाला नावे ठेवत होते, ते आता आम्हाला म्हणतात, ‘‘बरे झाले. तुम्ही तिकडे गेलात.’’

७. परात्पर गुरुदेवांच्या कृपाशीर्वादाने नातीच्या (सौ. सायली करंदीकर हिच्या) सदनिकेजवळच सदनिका मिळणे

गुरुदेवा, तुमच्या कृपाशीर्वादाने माझी मुलगी सौ. कल्पना सहस्रबुद्धे हिला आणि आम्हाला माझ्या नातीच्या सौ. सायली करंदीकर हिच्या सदनिकेजवळच स्वतंत्र सदनिका मिळाल्या. केवढी ही तुमची कृपा ! देवा, तुम्ही आम्हाला काळजीमुक्त केलेत. तुम्ही आमची साधना आणि सेवा यांचेही नियोजन केले. आम्ही प्रतिदिन सकाळी १० वाजता आश्रमात येतो आणि सायंकाळी ६ वाजता घरी जातो.

८. कृतज्ञता आणि प्रार्थना

‘गुरुदेवा, तुम्ही आम्हाला मायाजालातून अलगद बाहेर काढलेत आणि आपल्या चरणांशी सुखरूप घेऊन आलात. ‘तुम्ही आमच्यासाठी सर्वकाही केलेत’, या गोष्टीची आम्हाला सतत जाणीव राहू दे. आमच्याकडून समष्टीसाठी सतत नामजप आणि सेवा घडू दे. आमच्या उर्वरित आयुष्यातील क्षणन्क्षण आम्हाला समष्टी सेवेसाठी व्यतीत करता येऊ दे’, ही तुमच्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे.’

– (पू.) सौ. शैलजा परांजपे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.७.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक