आनंद गिरी यानेच महंत नरेंद्र गिरी यांना आत्महत्येस प्रवृत्त केले ! – सीबीआयचा आरोपपत्रात दावा  

डावीकडून आनंद गिरी आणि दिवंगत महंत नरेंद्र गिरी

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – अखिल भारतीय आखाडा परिषदेचे माजी अध्यक्ष दिवंगत महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) जिल्हा न्यायालयात आरोपी आनंद गिरी याच्यासह ३ जणांविरुद्ध आरोपपत्र प्रविष्ट केले. महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यू ही आत्महत्याच असल्याचे सीबीआयने सांगितले. त्यासाठी महंतांना आनंद गिरी, आध्या तिवारी आणि त्याचा मुलगा संदीप तिवारी यांनी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. या तिघांवर ३०६ अन् १२० ब कलमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आनंद गिरी याने वर्ष २००८ मध्ये गंगा सेनेची स्थापना केल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. कुंभमेळ्यात त्याने स्वतंत्र छावणी उभी केली होती. येथूनच महंत नरेंद्र गिरी आणि आनंद गिरी यांच्यातील अंतर वाढू लागले. महंत नरेंद्र गिरी यांनी गंगा सेनेवर आक्षेप घेतला होता. मठात रहात असतांना आनंद गिरी याने गंगा सेनेची स्थापना करण्यासाठी अनुमती घेतली नसल्याचे महंत नरेंद्र गिरी यांनी सांगितले होते.