भारतापासून नव्हे, तर अंतर्गत धार्मिक कट्टरतावाद्यांपासून पाकला धोका ! – पाकच्या मंत्र्याचे सुतोवाच

पाकला उशिरा का होईना हे लक्षात आले; मात्र पाक या धार्मिक कट्टरतावादावर कारवाई करू शकत नाही, हेही तितकेच सत्य आहे ! – संपादक

पाकचे सूचनामंत्री फवाद चौधरी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – आपल्याला भारताकडून आक्रमण होण्याचा कोणताही धोका नाही. आपल्याकडे जगातील ६ वे सर्वांत मोठे सैन्य आहे. आपल्याकडे अणूबाँब आहे. भारत आपला सामना करू शकत नाही. आपल्याला युरोपपासूनही धोका नाही. आज आपण सर्वांत मोठ्या धोक्याचा सामना करत आहोत. तो आपल्या आतमध्ये, म्हणजे पाकिस्तानमध्येच असून तो म्हणजे धार्मिक कट्टरतावाद आहे, असे विधान पाकचे सूचनामंत्री फवाद चौधरी यांनी केले.

फवाद चौधरी पुढे म्हणाले की, देशातील मदरशांतील विद्यार्थ्यांना नाही, तर शाळा आणि महाविद्यालये येथील विद्यार्थ्यांना धार्मिक कट्टरतावादासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. १९८० आणि ९० च्या दशकांमध्ये ज्या शिक्षकांना नियुक्त करण्यात आले होते, ते एक षड्यंत्र होते. ‘याद्वारे विद्यार्थ्यांना कट्टरतावादाचे शिक्षण दिले जाईल’, असा प्रयत्न होता. सामान्य शाळा आणि महाविद्यालये येथील विद्यार्थी कट्टरतावादाच्या काही चर्चित घटनांमद्ये सहभागी झाल्याचे दिसून आले. कट्टरतावादावर नियंत्रण मिळवण्यासाठी जी पावले उचलण्यात आली, ती पुरेशी नाहीत. केंद्र आणि राज्य सरकार या संकटाचा सामना करण्यासाठी सिद्ध नाही. तहरीक-ए-लब्बैक या संघटनेशी झालेल्या वादामुळे सरकारला एक पाऊल मागे यावे लागले. कट्टरतावाद एक ‘टाइम बाँब’ सारखा आहे. इस्लाम किंवा अन्य कोणत्याही धर्माचा कट्टरतावाशी संबंध नाही.