‘पू. विनय भावेकाका यांनी (२५.६.२०२१ या दिवशी) देहत्याग केला’, हे ऐकून मला फार धक्का बसला. मला बराच वेळ काही सुचत नव्हते. त्यांच्या देहत्यागाचे वृत्त ऐकल्यानंतर त्यांची गुणवैशिष्ट्ये लगेच माझ्या डोळ्यांसमोर आली. ती येथे देत आहे.
१. पहिल्या भेटीतच समोरच्या व्यक्तीला आपलेसे करणे
पू. (कै.) भावेकाका यांची आणि आमच्या कुटुंबियांची पहिली ओळख वर्ष १९९७ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पुणे येथे झालेल्या सार्वजनिक सभेपूर्वी झाली. पू. काकांनी प्रथम भेटीतच आम्हाला आपलेसे केले. त्या वेळी ‘ते कुणी वेगळे आहेत’, असे आम्हाला वाटले नाही. पू. काका म्हणजे अतिशय साधे आणि निरागस व्यक्तीमत्त्व होते. आम्ही तेव्हाही त्यांना संतच मानत असू.
२. पू. भावेकाका घरी आल्यावर चिंचवडचे अनेक साधक त्यांना भेटायला येऊन घरी मोठा सत्संग होणे अन् पू. भावेकाकांनी सर्वांची प्रेमाने विचारपूस करणे
पू. काका चिंचवड येथे आमच्या घरी आल्यावर चिंचवडचे अनेक साधक त्यांना भेटायला यायचे. ते आल्यावर आमच्या घरी मोठा सत्संग व्हायचा. पू. काका सर्वांशी अतिशय प्रेमाने आणि आपुलकीने बोलायचे. ‘कुणाची प्रकृती कशी आहे ?’, याची ते प्रेमाने विचारपूस करायचे. ते प्रत्येकाला स्वतःच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणेच वाटायचे. पू. काका चिंचवडहून वरसई (तालुका पेण) येथे त्यांच्या घरी जातांना माझ्या मुली सौ. श्रेया प्रभु (पूर्वाश्रमीची कु. प्राजक्ता कुलकर्णी) आणि कु. लीना कुलकर्णी यांना समवेत घेऊन जायचे. ते म्हणायचे, ‘‘या मुलींना कुठेच जायला मिळत नाही.’’ सौ. भावेकाकूही नेहमी मुलींना त्यांच्या घरी न्यायला आनंदाने सिद्ध असायच्या. आमचे सख्खे काका करतील, त्यापेक्षा अधिक पू. काकांनी आमच्यासाठी केले आहे. माझा मुलगा श्री. नीलेश कुलकर्णी याचा विवाह वर्ष २०१९ मध्ये झाला. तेव्हा पू. काकांना बरे नव्हते; म्हणून ते विवाहाला येऊ शकले नाहीत; मात्र त्यांना बरे वाटल्यावर ते देवद आश्रमात आम्हाला भेटण्यासाठी आले.
३. नवीन पदार्थ बनवण्यासाठी साहाय्य करणे
पू. काका घरी आल्यावर थेट स्वयंपाकघरात येऊन ‘आज जेवायला काय केले ?’, असे विचारत. ते आम्हाला कधी एखादा नवीन पदार्थ सांगत आणि तो करूही लागत. त्यांनी आम्हाला कधी वेगळे मानले नाही.
४. औषधांचे मूल्य न घेणे
आमची प्रकृती ठीक नसल्यास ते आम्हाला औषध द्यायचे. आम्ही त्यांना औषधाचे मूल्य विचारल्यावर ते ‘नंतर पाहू’, असे सांगत. पू. काकांनी आम्हाला मूल्यवान असे सुवर्णभस्म दिले; परंतु त्यांनी आमच्याकडून त्याचे मूल्य घेतले नाही.
केवढे हे प्रेम ! पू. भावेकाकांविषयी लिहावे, तेवढे थोडेच आहे. पू. भावेकाका म्हणजे एकमेवाद्वितीय विभूती होते. त्यांचे संपूर्ण जीवन दुसर्यांसाठीच होते. त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. सुषमा कुलकर्णी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१३.७.२०२१)