यजमानांच्या गंभीर आजारपणाच्या कठीण प्रसंगांना गुरुकृपेच्या बळावर शांत आणि स्थिर राहून सामोर्‍या जाणार्‍या देवद (पनवेल) येथील सौ. समिधा संजय पालशेतकर !

एप्रिल २०२० मध्ये देवद (पनवेल) येथील सौ. समिधा पालशेतकर यांचे यजमान श्री. संजय पालशेतकर यांच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याने त्यांच्या मेंदूचे शस्त्रकर्म करावे लागले. त्यानंतर ६ मासांनी त्यांच्या मेंदूची आणखी २ शस्त्रकर्मे करावी लागली. त्या कालावधीत सौ. समिधा यांनी शांत आणि शिकण्याच्या स्थितीत राहून यजमानांची सेवा केली. या कठीण प्रसंगाला त्या धिराने सामोर्‍या गेल्या. त्या वेळी त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१७.११.२०२१ या दिवशीच्या अंकात लेखातील काही सूत्रे पाहिली. आज उर्वरित सूत्रे पाहूया. (भाग २)


या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा :  https://sanatanprabhat.org/marathi/528088.html


श्री. संजय आणि सौ. समीधा पालशेतकर

६. श्री. संजय यांना रुग्णालयातून आश्रमात आणल्यावर त्यांच्या शारीरिक स्थितीत झपाट्याने झालेली सुधारणा !

‘रुग्णालयात भरती केल्यानंतर १९ व्या दिवशी, म्हणजे ६.५.२०२० या दिवशी श्री. संजय यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. त्यानंतर आम्ही त्यांना सनातनच्या देवद येथील आश्रमात आणले. तेव्हा ते ५ दिवस शांत आणि पुष्कळ झोपले. रुग्णालयात त्यांची दृष्टी अस्थिर असायची आणि तिच्यात भीती जाणवायची. आश्रमात आल्यावर तेथील चैतन्य आणि गुरुकृपा यांमुळे १० दिवसांतच यजमानांमध्ये पालट होऊन त्यांच्या शारीरिक स्थितीत चांगली सुधारणा होऊ लागली.

अ. रुग्णालयातून घरी सोडण्याच्या आदल्या दिवशी, म्हणजे ५.६.२०२० या दिवशी त्यांच्या नाकातील नळी काढली. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी स्वतःच्या डाव्या हाताने खिचडी खाल्ली. नाकातील नळी काढल्यावर ७ दिवसांनंतर त्यांनी ‘हो’ हा शब्द उच्चारला.

आ. ‘आता यजमानांचे मन खंबीर झाले आहे’, हे लक्षात आल्यावर मी त्यांना ‘त्यांच्या रुग्णाईत स्थितीत काय झाले ?’, हे सांगितले. त्या वेळी ‘कुणी आणि कसे साहाय्य केले अन् परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने यजमानांचा पुनर्जन्म कसा झाला ?’, हे ऐकतांना त्यांना कृतज्ञता वाटत होती.

इ. मी संजय यांना साधकांच्या साहाय्याने ‘वॉकर’ घेऊन चालवायला आरंभ केला. (‘वॉकर’ म्हणजे आधार घेऊन चालण्यासाठी वापरण्यात येणारे साधन) ते स्वतः त्यांचा एक पाय उचलायचे आणि त्यांचा दुसरा पाय आम्ही उचलून पुढे ठेवायचो. असे १५ दिवस प्रतिदिन अर्धा घंटा चालल्यावर ३०.७.२०२० या दिवशी त्यांना स्वतःला चालता येऊ लागले.

ई. ‘संजय यांची स्थिती बघता त्यांना यामधून बाहेर पडायला ६ मास किंवा त्याहून अधिक कालावधी लागेल’, असा माझा अंदाज होता; पण ‘ते यातून लवकर बाहेर पडतील’, असे मला मनापासून वाटायचे. आश्रमात आल्यावर ३ मासांत त्यांनी चालायला आरंभ केला. तेव्हा माझा विश्वासच बसत नव्हता. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटून माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू येत होते.

७. अनूभूती

साधिकेच्या आईने श्री गजानन महाराजांना ‘मला जावयांचा आवाज ऐकायचाच आहे’, असा टाहो फोडणे आणि त्याच दिवशी जावयांना बोलता येऊ लागणे : माझ्या आईची श्री गजानन महाराज यांच्यावर पुष्कळ श्रद्धा आहे. माझे बाबा गेल्यावर आम्ही तिला सर्व उपवास सोडायला सांगितले होते. तिने संजय यांच्यासाठी पुन्हा गुरुवारचा उपवास चालू केला आणि ती प्रत्येक गुरुवारी झुणका-भाकरी करून महाराजांना नैवेद्य दाखवायची. एका गुरुवारी तिने ‘महाराज, मला संजय यांचा आवाज ऐकायचाच आहे’, असा टाहो फोडला. त्याच दिवशी संजय यांना बोलता येऊ लागल्याने मी आईला भ्रमणभाष करून त्यांचा आवाज ऐकवला. तेव्हा तिच्या डोळ्यांतून भावाश्रू येऊ लागले आणि तिने तिची ही अनुभूती मला सांगितली.

८. यजमानांच्या मेंदूचे झालेले दुसरे शस्त्रकर्म !

८ अ. मेंदूवर दुसरे शस्त्रकर्म झाल्यावर पुष्कळ वेदना होत असूनही श्री. संजय यांचा तोंडवळा शांत असणे : संजय यांच्या मेंदूवर आणखी एक शस्त्रकर्म करायचे असल्याने ७.१०.२०२० या दिवशी त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. त्याच दिवशी दुपारी ३ वाजता त्यांचे शस्त्रकर्म चालू झाले आणि सायंकाळी ६ वाजता संपले. त्यांना शस्त्रक्रियागारातून बाहेर आणल्यावर ते शुद्धीवर होते. त्या वेळी त्यांना पुष्कळ वेदना होत असूनही त्यांचा तोंडवळा शांत होता. त्यांच्या डोक्यात एक ‘ड्रेन’ बसवला होता. (‘ड्रेन’ म्हणजे दूषित रक्त आणि अन्य द्रव वाहून नेण्यासाठी बसवण्यात आलेली नळी) चौथ्या दिवशी दुपारी १२ वाजता तो ‘ड्रेन’ काढला आणि त्याच दिवशी त्यांना रुग्णालयातून सोडले. केवळ गुरुकृपेमुळेच हे सर्व एवढ्या लवकर शक्य झाले.

८ आ. जंतूसंसर्ग झाल्याने टाक्यांतून पू येऊ लागणे : १० दिवसांनी त्यांचे टाके काढायला रुग्णालयात जायचे होते; पण जाण्याच्या १ दिवस आधीच संजय यांच्या टाक्यांमधून पू येऊ लागला. आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘इन्फेक्शन’ (जंतूसंसर्ग) झाले आहे. ही कवटी जरी संजय यांची स्वतःची असली, तरी ६ मासांमध्ये तिचा शरिराशी संपर्क नसल्याने शरिराने ती स्वीकारली नाही.’’ त्यांनी ७ दिवसांची औषधे लिहून दिली आणि टाके काढले; पण काही केल्या पू वहाणे पूर्णपणे थांबत नव्हते. दुखणे वाढत असल्याने आधुनिक वैद्यांना संपर्क केल्यावर ते म्हणाले, ‘‘आता ७ दिवस थांबण्यात अर्थ नाही; कारण ‘इन्फेक्शन’ वाढत जाऊन मेंदूपर्यंत पोचेल.’’

९. यजमानांच्या मेंदूचे झालेले तिसरे शस्त्रकर्म !

९ अ. आधुनिक वैद्यांनी यजमानांचा जंतूसंसर्ग झालेला मेंदूच्या कवटीचा भाग काढून टाकणे आणि ती जागा स्वच्छ करून टाके घालून ‘ड्रेन’ बसवणे : श्री. संजय यांच्या मेंदूचे दुसरे शस्त्रकर्म होऊन केवळ २० दिवस झाले होते आणि पुन्हा त्याच ठिकाणी शस्त्रकर्म करावे लागत असल्याने माझ्या मनाची सिद्धता होत नव्हती. त्या वेळी मी अस्थिर झाले होते. मी पू. (सौ.) अश्विनी पवार यांना भ्रमणभाष केल्यावर त्यांनी मला आधार दिला. दुसर्‍या दिवशी सकाळी ९.३० वाजता संजय यांना शस्त्रकर्मासाठी रुग्णालयात नेण्यात आले. दुपारी २ वाजता संजय यांना शस्त्रकर्म करून शस्त्रक्रियागारातून बाहेर आणले. आधुनिक वैद्यांनी संजय यांचा जंतुसंसर्ग झालेला मेंदूच्या कवटीचा भाग काढून टाकल्याचे आणि ती जागा स्वच्छ करून टाके घालून ‘ड्रेन’ बसवल्याचे सांगितले. एका मासातच दोन शस्त्रकर्मे झाल्याने संजय यांना पुष्कळ थकवा आला होता.

९ आ. यजमानांच्या शस्त्रकर्मांसाठी गुरुकृपेने समाजातील व्यक्तींकडून पुष्कळ मोठ्या प्रमाणात आर्थिक साहाय्य मिळणे : यजमानांना खासगी रुग्णालयात भरती केल्याने त्यांच्या शस्त्रकर्मांसाठी पुष्कळ व्यय आला. त्यातच ‘कोरोना’मुळे शासकीय योजनांची रक्कम ‘कोरोना’च्या उपचारांसाठी दिली जात असल्याने त्यांच्याकडून साहाय्य मिळत नव्हते. माझ्या परिचितांनी सामाजिक माध्यमांवर (सोशल मिडियावर) संदेश पाठवल्याने केवळ गुरुकृपेने या कालावधीत समाजातील व्यक्तींकडून पुष्कळ मोठ्या प्रमाणात आर्थिक साहाय्य झाले.

१०. या प्रसंगानंतर यजमानांमध्ये झालेले पालट !

अ. संजय यांना पूर्वी साधा ताप जरी आला, तरी त्यांना कुणीतरी जवळ लागायचे. ते लगेच घाबरून जायचे; पण या वेळी त्यांना ‘मेंदूचे शस्त्रकर्म करायचे आहे’, असे सांगितल्यावर त्यांनी ते सहजपणे स्वीकारले. तेव्हा त्यांच्या मनात भीतीचा लवलेशही नव्हता.

आ. ‘सतत विचार करत रहाणे, नकारात्मक विचार करणे’, अशी त्यांची प्रकृती आहे. आता मात्र गुरुकृपेमुळे त्यांचा स्वभाव पूर्णपणे पालटला आहे. त्यांच्यातील लढाऊ वृत्ती वाढली असून ते मनाच्या या संघर्षामधून बाहेर पडत आहेत.

इ. ‘एवढ्या लहान वयात त्यांच्या शरिराची एवढी मोठी हानी झाली’, हे त्यांनी एक मासामध्येच स्वीकारले.

ई. आता ते सतत आनंदात असतात. त्यांचे मन लहान मुलाप्रमाणे निरागस झाले आहे.

११. गुरुकृपेची क्षणोक्षणी घेतलेली अनुभूती !

११ अ. तीव्र प्रारब्ध भोगण्याची क्षमता देऊन ती परिस्थिती स्वीकारायला शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले ! : आता विचार करतांना माझ्या लक्षात आले, ‘हे सर्व स्वीकारून आज मी स्थिर आणि आनंदात आहे’, हे माझ्यासाठी पुष्कळ मोठे आश्चर्यच आहे. हे सर्व माझे मन, बुद्धी आणि क्षमता यांच्या पलीकडचे आहे. माझा स्वभाव भावनाशील आहे. ‘मी या प्रसंगातून बाहेर पडू शकले’, ही केवळ गुरुकृपाच आहे. गुरूंनीच आमचे तीव्र प्रारब्ध मंद करून सुसह्य केले.’

११ आ. केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या कृपेच्या बळावरच सकारात्मक आणि खंबीर राहून परिस्थितीवर मात करता येणे : आम्हा दोघांसाठी या काळ्याकुट्ट अंधारातील आशेचा किरण, म्हणजे केवळ परात्पर गुरु डॉक्टर होते. त्यांनीच या कठीण प्रसंगात संत आणि सद्गुरु यांच्या माध्यमातून मायेचा हात देऊन आम्हाला बाहेर पडायला शिकवले. कितीतरी जन्मांची पुण्याई असल्याने प.पू. गुरुदेवांचे कृपाछत्र आम्हाला लाभले आहे !

मी साधना करत नसतांना असा प्रसंग घडला असता, तर मला ही परिस्थिती स्वीकारता आली नसती. मीच स्थिर आणि खंबीर राहिले नसते, तर यजमानांना सांभाळू शकले नसते. त्यांचे मनोबल वाढवू शकले नसते आणि त्यांना त्या परिस्थितीमधून बाहेर पडायला साहाय्य करू शकले नसते.

१२. कृतज्ञता

अकस्मात् आलेल्या या प्रसंगामुळे देवाने मला मोठे दायित्व दिले आणि ते पेलण्याची शक्तीही दिली. परात्पर गुरु डॉक्टर सूक्ष्मातून माझ्याजवळ होतेच; पण स्थुलातूनही त्यांनी वेगवेगळ्या माध्यमांतून आमची काळजी घेतली. यासाठी कृतज्ञता तरी कशी व्यक्त करू ? ‘जे कधी कुणी ना केले, ते तू प्रेम मज दिधले ।’, हे मी प्रत्यक्ष अनुभवले. ‘गुरुदेव, आपल्या चरणांवर मस्तक ठेवण्याचीही आमची पात्रता नसतांना तुम्ही आमचा हात धरून ठेवला आहे आणि तो कधीही न सोडण्यासाठी ….!’

– सौ. समिधा संजय पालशेतकर, देवद, पनवेल. (नोव्हेंबर २०२०)

(समाप्त)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक