यजमानांच्या गंभीर आजारपणाच्या कठीण प्रसंगाला गुरुकृपेच्या बळावर शांत आणि स्थिर राहून सामोर्‍या जाणार्‍या देवद (पनवेल) येथील सौ. समीधा संजय पालशेतकर !

एप्रिल २०२० मध्ये देवद (पनवेल) येथील सौ. समिधा पालशेतकर यांचे यजमान श्री. संजय पालशेतकर यांच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याने त्यांच्या मेंदूचे शस्त्रकर्म करावे लागले. त्यानंतर ६ मासांनी त्यांच्या मेंदूची आणखी २ शस्त्रकर्मे करावी लागली. त्या कालावधीत सौ. समिधा यांनी शांत आणि शिकण्याच्या स्थितीत राहून यजमानांची सेवा केली. त्यांनी यजमानांना मानसिक आधार देऊन सावरले. या कठीण प्रसंगाला त्या धिराने सामोर्‍या गेल्या. त्या वेळी त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.  

(भाग १)

श्री. संजय आणि सौ. समीधा पालशेतकर

१. यजमानांची प्रकृती अकस्मात् बिघडणे

१ अ. यजमानांना अकस्मात् उलट्या होऊ लागल्यामुळे खासगी रुग्णालयात नेणे आणि त्यांच्या मेंदूमध्ये पुष्कळ रक्तस्राव झाला असल्याचे समजणे : ‘१८.४.२०२० या दिवशी माझे यजमान श्री. संजय पालशेतकर यांना अकस्मात् उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे आम्ही त्यांना आश्रमातील साधकांच्या साहाय्याने खासगी रुग्णालयात घेऊन गेलो. तेथे आधुनिक वैद्यांनी यजमानांचा ‘एम्.आर्.आय.’ काढला आणि स्पष्टपणे सांगितले, ‘‘त्यांच्या मेंदूमध्ये पुष्कळ रक्तस्राव झाला असल्याने त्यांना अतीदक्षता विभागात ठेवावे लागेल. येथील अतीदक्षता विभागाचा व्यय प्रतिदिन १० सहस्र रुपये एवढा आहे. त्यामुळे तुम्ही त्यांना शासकीय रुग्णालयात नेऊ शकता.’’ तेव्हा मी म्हणाले, ‘‘मला याच रुग्णालयात उपचार करवून घ्यायचे आहेत. तुम्ही पुढील प्रक्रिया लवकरात लवकर चालू करा.’’

१ आ. आधुनिक वैद्यांनी ‘यजमानांच्या जिवाला धोका असून आवश्यकता भासली, तर त्यांच्या मेंदूचे शस्त्रकर्म करावे लागेल’, असे सांगणे : आधुनिक वैद्यांनी मला सांगितले, ‘‘संजय यांच्या मेंदूच्या डाव्या बाजूमध्ये पुष्कळ रक्तस्राव झाल्याने त्यांचा मेंदू आणि शरिराची उजवी बाजू पूर्णपणे निकामी झाली आहे, तसेच त्यांच्या जिवालाही धोका आहे. त्यांच्या मेंदूची पुष्कळ हानी झाली आहे आणि तेथील पेशी मृत झाल्या आहेत. एकदा पेशी मृत झाल्यावर त्या पुन्हा जिवंत होत नाहीत. आम्ही उपचार चालू केले आहेत; पण आवश्यकता भासली, तर मेंदूचे शस्त्रकर्मही करावे लागेल.’’

२. यजमानांची स्थिती गंभीर असतांनाही देवाच्या कृपेने शांत आणि स्थिर रहाता येणे अन् त्या वेळी संत आणि साधक यांनी आधार देणे

आधुनिक वैद्य मला हे सर्व सांगत असतांना मी ‘केवळ बघणे अन् ऐकणे’, यांपलीकडे काहीच करू शकत नव्हते. तेव्हा मला दुःख करायलाही वेळ नव्हता. त्या स्थितीतही देवाने मला शांत आणि स्थिर ठेवले. नंतर मी माझे दीर आणि भाऊ यांना सर्व कळवले. आश्रमात गेल्यावर मला सद्गुरु राजेंद्र शिंदे, पू. अश्विनीताई (पू. (सौ.) अश्विनी पवार) आणि सहसाधक यांनी आधार दिला अन् योग्य दृष्टीकोन देऊन या प्रसंगातून बाहेर पडण्यास साहाय्य केले.

३. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने यजमानांना मिळालेला पुनर्जन्म !

३ अ. आधुनिक वैद्यांनी ‘शस्त्रकर्म न केल्यास रुग्ण ‘कोमा’मध्ये जाईल’, असे सांगितल्याने त्यांना शस्त्रकर्मासाठीची प्रक्रिया लवकर चालू करण्यास सांगणे : दुसर्‍या दिवशी सकाळी रुग्णालयात गेल्यावर आधुनिक वैद्यांनी ‘शस्त्रकर्म करावे लागेल’, असे सांगितले. ते म्हणाले, ‘‘मेंदूच्या डाव्या बाजूला सूज आल्याने त्याचा ताण मेंदूच्या उजव्या बाजूवर येऊन रुग्ण बेशुद्ध पडत आहे. शस्त्रकर्म केले नाही, तर रुग्ण ‘कोमा’मध्ये (बेशुद्धावस्थेत) जाईल.’’ तेव्हा मी त्यांना ‘तुम्ही शस्त्रकर्मासाठीची प्रक्रिया लवकर चालू करा’, असे सांगितले.

३ आ. शस्त्रकर्माच्या वेळी तेथे परात्पर गुरु डॉक्टर आणि सर्व संत यांचे अस्तित्व जाणवणे अन् शस्त्रकर्म निर्विघ्नपणे होणे : सकाळी ११.३० वाजता शस्त्रकर्म चालू झाले. तेव्हा ‘परात्पर गुरु डॉक्टर आणि सर्व संत शस्त्रक्रियागारात आहेत आणि तेथे पुष्कळ चैतन्य पसरले आहे’, असे मला जाणवले. शस्त्रकर्म पूर्ण व्हायला २ घंटे लागले. त्यानंतर आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘शस्त्रकर्म किचकट असूनही ते निर्विघ्नपणे झाले.’’

३ इ. रात्री देवद आश्रमात गेल्यावर पू. अश्विनीताईंनी सांगितले, ‘‘सर्व संत श्री. संजय यांच्यासाठी नामजप करत होते.’’

३ ई. शस्त्रकर्म झाल्यानंतर २४ घंट्यांनी यजमानांना हाक मारल्यावर त्यांनी परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने डोळे उघडून प्रतिसाद देणे : शस्त्रकर्म झाल्यावर २४ घंट्यांनी श्री. संजय यांना हाक मारल्यावर त्यांनी डोळे उघडून प्रतिसाद दिला. १८.४.२०२० या दिवशी संजय यांची विझू पहाणारी प्राणज्योत परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने १९.४.२०२० या दिवशी पुन्हा तेवू लागली. जणू परात्पर गुरु डॉक्टरांनी श्री. संजय यांना पुनर्जन्मच दिला !

४. संतांनी दिलेले सकारात्मक दृष्टीकोन आणि आधार !

४ अ. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी दिलेला दृष्टीकोन

४ अ १. यजमानांची पूर्वीची स्थिती आणि आताची स्थिती यांमध्ये तुलना होऊन पुष्कळ रडू येणे : तणावाच्या स्थितीमधून बाहेर पडण्यासाठी मी वेळ मिळेल, तेव्हा सूचनासत्र करत होते; पण ‘सर्वांचे भ्रमणभाष घेणे आणि त्यांना सर्व परिस्थिती सांगणे’, यांमुळे पुन्हा तेच प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर यायचे. यजमानांची पूर्वीची स्थिती आणि आताची स्थिती यांमध्ये तुलना होऊन मी शांत बसल्यावर मला पुष्कळ रडायला यायचे.

४ अ २. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी ‘तुमच्या मनात यजमानांविषयी सद्भावना असायला हव्यात’, असे सांगितल्यावर ‘काळजी करायला नको’, हे लक्षात येऊन तसे प्रयत्न करणे : संजय यांच्या नाकातून जठरापर्यंत पोचेल, एवढी नळी घातली होती आणि तिच्यामधून त्यांना पातळ पदार्थ दिले जात होते. एकदा सकाळी अल्पाहार करतांना सद्गुरु राजेंद्रदादा मला म्हणाले, ‘‘संजय जेवायला लागल्यावर आपण त्याला पहिला घास म्हणून परात्पर गुरु डॉक्टरांचा प्रसाद देऊया.’’ हे ऐकल्यावर मला रडू आले. तेव्हा सद्गुरु दादा म्हणाले, ‘‘तुमच्या मनात संजय यांच्याविषयी सद्भावना असायला हव्यात.’’ ते न कळल्याने मी त्यांना विचारले, ‘‘सद्भावना म्हणजे काय ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुम्ही जो विचार कराल, तोच विचार संजयपर्यंत पोचणार आहे !’’ तेव्हा ‘माझ्या काळजी करण्यामुळे श्री. संजय यांना त्रास होईल. त्यामुळे ‘काळजी करायची नाही’, असे माझ्या लक्षात आले. त्यानंतर माझ्या मनात कधी काळजीचे विचार आले, तर मला सद्गुरु राजेंद्रदादांचा वरील दृष्टीकोन आठवायचा आणि त्या स्थितीतून बाहेर पडायला साहाय्य होत होते.

४ आ. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी दिलेले दृष्टीकोन : चौथ्या दिवशी मला श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा भ्रमणभाष आला. त्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष परात्पर गुरु डॉक्टरांचाच संकल्प झाल्याने त्यांनी मला सांगितलेली सूत्रे आणि दृष्टीकोन आपोआपच टप्प्याटप्प्याने माझ्या कृतीमध्ये येत गेले.

४ आ १. स्वयंसूचना देण्यास सांगणे

अ. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सांगितले, ‘‘सध्या ‘नामजप आणि प्रार्थना’ हेच तुझे क्रियमाण असायला हवे. त्यासाठी तू स्वयंसूचना द्यायला हवी.

आ. देव जी परिस्थिती समोर आणतो, ती आनंदाने स्वीकारून तिला सामोरे जायचे आहे. त्यासाठी स्वतःला दोष देऊ नकोस. स्वयंसूचना घेऊन मनावर नियंत्रण ठेव.

४ आ २. सासूबाईंच्या मनाची सिद्धता हळूहळू होईल. त्यासाठी दिरांचे साहाय्य घे. (आम्ही माझ्या सासूबाईंना ‘संजय यांना ताप आल्याने रुग्णालयात भरती केले आहे’, एवढेच सांगितले होते.)

४ आ ३. प्रारब्धभोग भोगणे ही साधना आहे ! : प्रारब्धभोग भोगणे कुणालाही चुकले नाही. ते संपल्यावरच आपण साधनेत पुढे जातो. आपण साधना म्हणून हे सर्व स्वीकारायचे आहे. तुम्ही दोघे गुरुछत्राखाली आहात. त्यामुळे भाग्यवान आहात. तू शांत आणि स्थिर राहिलीस, तर तुला देव अनुभवता येईल. देवाने तुमचे प्रारब्ध सुसह्य केले आहे. ते स्वीकारण्यासाठी तुम्हाला बळही दिले आहे. यजमानांचे प्रारब्ध बघतांना शांत आणि स्थिर रहायचे. वर्तमानकाळात राहून पुढे जायचे. देव साहाय्य करणारच आहे.

४ आ ४. यजमानांची सेवा करतांना ठेवावयाचा दृष्टीकोन : ते तुझे यजमान असले, तरी तो एक वेगळा जीव आहे आणि तू एक वेगळा जीव आहेस. भावनिक स्तरावर राहिल्याने सेवा मनापासून होत नाही. तू ‘समवेत सतत भगवंत आहे’, हे अनुभव आणि सतत कृतज्ञताभावामध्ये रहा. यजमानांची सेवा करतांना ‘भगवंताची किंवा श्री गुरूंची सेवा करत आहोत’, असा भाव ठेवायचा. श्री गुरूंचे लक्ष आहेच. परिस्थिती स्वीकारायला शिकायचे आहे.’’

५. ‘यजमानांचे मनोधैर्य वाढावे’, यासाठी केलेले प्रयत्न !

५ अ. यजमानांकडून भावजागृतीचे प्रयत्न करवून घेणे : श्री. संजय अतीदक्षता विभागात असतांना ‘श्री. संजय यांनी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांवर त्यांचे डोके ठेवले आहे’, ‘ते संजय यांच्या डोक्यावरून हात फिरवत आहेत’, असे भावजागृतीचे प्रयोग मी त्यांच्याकडून करवून घेत होते. मी त्यांना परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र दाखवून ‘ते सतत समवेत आहेत’, हा विचार त्यांच्या मनावर बिंबवत होते.

५ आ. बोलता येत नसल्यामुळे यजमानांना वाईट वाटणे आणि त्यावर सांकेतिक खुणा वापरण्याचा उपाय सुचवल्यावर त्यांची निराशा न्यून होणे : १० दिवसांनंतर संजय यांना अतीदक्षता विभागातून बाहेर आणण्यात आले. त्यानंतर हळूहळू ‘काय झाले आहे ?’, ते त्यांच्या लक्षात येऊ लागले. त्यांना बोलता येत नसल्याने ते भावना व्यक्त करू शकत नव्हते. तेव्हा त्यांना रडू यायचे. त्यांचा स्वभाव ठाऊक असल्याने आणि त्यांच्या मनाची स्थिती लक्षात येत असल्याने मला त्यांची काळजी वाटत होती. त्यावर देवानेच मला उपाय सुचवला. हाताचे १ बोट दाखवले की, ‘हो’ आणि २ बोटे दाखवली, की ‘नाही’, ही सांकेतिक भाषा शिकवल्यावर त्यांना माझ्याशी अन् इतर साधकांशी संवाद साधता येऊ लागला. त्यामुळे त्यांची निराशा न्यून झाली.

५ इ. सद्गुरु राजेंद्रदादा यांनी सुचवल्याप्रमाणे हळूहळू मी श्री. संजय यांच्याकडून २ ओळींचे सूचनासत्र करवून घ्यायला आरंभ केला.

या सर्वांचा परिणाम लवकरच दिसायला लागून त्यांची निराशा, रडणे आणि काळजी करणे बंद झाले. त्यांनी आहे ती स्थिती स्वीकारायला आरंभ केला आणि ‘मी बरा होणार आहे’, हा सकारात्मक विचार वाढल्याने त्यांच्यातील उत्साह वाढला.

५ ई. ‘यू ट्यूब’ वाहिनीवरून व्यायामाचे प्रकार शोधून ते यजमानांकडून करवून घेणे : मी ‘यू ट्यूब’ वाहिनीवर ‘तोंड आणि जीभ यांचे व्यायाम कसे करायचे ?’, हे शोधले. तेव्हा मला काही चलचित्रे (‘व्हिडीओज्’) मिळाली. मी श्री. संजय यांच्याकडून तसे व्यायाम करवून घेऊ लागले. त्याच समवेत मी हात आणि पाय यांचेही वेगवेगळे व्यायाम शोधले अन् त्यांच्याकडून करवून घेतले.

५ उ. यजमानांना चालण्यासाठी प्रेरणा देणारे चलचित्र दाखवणे : ‘बुटाटी धाम’ हे एक धार्मिक स्थळ आहे. ‘ज्यांना चालता येत नाही, असे रुग्ण तेथे गेल्यावर त्यांतील काही जण चालू शकतात’, यामागील शास्त्रीय कारण सांगणारे एक चलचित्र मिळाले. तेथे रुग्णाला ७ दिवस स्वतःच्या पायांनी चालत मंदिराला ३ प्रदक्षिणा घालायला सांगतात. त्यामुळे त्याला चालावेच लागत असल्याने तेथे गेल्यावर रुग्ण चालायला लागतो. हे चलचित्र प्रेरणा देणारे असल्यामुळे मी ते संजय यांना दाखवले.

– सौ. समिधा संजय पालशेतकर, देवद, पनवेल. (नोव्हेंबर २०२०)


या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा :  https://sanatanprabhat.org/marathi/528258.html


येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक