माझ्या मृत्यूनंतर माझ्या पार्थिवाचे हिंदु पद्धतीनुसार दहन करण्यात यावे ! – वसीम रिझवी, माजी अध्यक्ष, शिया वक्फ बोर्ड

शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी मृत्यूपत्रात ‘माझा मृत्यू झाला, तर माझे पार्थिव दफन करण्याऐवजी ते हिंदु पद्धतीनुसार दहन करावे’, असे म्हटले आहे. ‘अंत्यसंस्काराच्या वेळी गाझियाबाद येथील डासना मंदिराचे महंत यती नरसिंहानंद यांच्या हस्ते मुखाग्नी देण्यात यावा’, असेही त्यांनी म्हटले आहे.

वसीम रिझवी यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून म्हटले आहे की, देश आणि जगात माझा शिरच्छेद करून हत्या करण्याचा कट रचला जात आहे. असे करणार्‍यांना पारितोषिक देण्याचीही घोषणा करण्यात आली आहे; कारण मी कुराणातील २६ आयते हटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. या आयतांद्वारे मानवतेविषयी द्वेष पसरवला जात आहे. माझा अपराध आहे की मी, महंमद पैगंबर यांच्यावर एक पुस्तक लिहिले आहे. त्यामुळे मुसलमान मला ठार मारू इच्छित आहेत. त्यांनी कोणत्याही कब्रस्तानमध्ये मला दफन करण्यास जागा देणार नाही’, असे घोषित केले आहे. त्यामुळेच मी माझे मृत्यूपत्र लिहून ते प्रशासनाला पाठवले आहे.