१. साधकाचा मोक्षप्राप्तीचा प्रवास आणि देवाने त्याला दिलेली मोक्षप्राप्तीची संधी !
‘मनुष्याचा मोक्षाच्या प्राप्तीसाठी चालू झालेला जीवनप्रवास अत्युच्च पातळीवर पोचण्यामध्ये अनेक घटना घडत असतात. त्यातून व्यक्तीने पुढे जाऊन प्रगती करून घ्यायची असते. या जीवनप्रवासामध्ये घटना, निमित्त, कारण, प्रसंग आणि परिस्थिती घटित होत असते. साधनारत व्यक्ती साधनेचे पुण्यबळ आणि कर्म यांद्वारे या सर्वांवर मात करण्याचा सतत प्रयत्न करत असते. अशा वेळी देव तिला या स्थितीतून पुढे मोक्षापर्यंत जाण्याची संधी उपलब्ध करून देत असतो.
२. ‘देवाने मोक्षापर्यंत जाण्याची संधी दिली आहे’, हे लक्षात येण्याचे महत्त्व !
‘आपल्याला मोक्षापर्यंत जाण्याची संधी मिळाली आहे’, हेच मुळात व्यक्तीच्या लक्षात येणे अवघड असते. असे लक्षात आले, तरच ती व्यक्ती संधीचा लाभ करून घेत पुढे जाऊ शकते; मात्र ‘देवाने ही संधी दिली आहे’, हेच तिच्या लक्षात आले नाही, तर ती संधी घालवून बसते आणि त्यामुळे पुढे जाण्याचा मार्गच खुंटतो. अशा वेळी व्यक्तीच्या लक्षात येत नाही आणि ती म्हणत रहाते, ‘मी इतकी साधना करते, तरी देवाची माझ्यावर कृपा का होत नाही ?’ खरेतर प्रत्यक्ष देवच कृपा करत असतो, म्हणजे संधी देत असतो. असे असले, तरी साधनारत व्यक्ती कर्म करत प्रयत्न करत रहाते.
३. कर्म करत रहाण्याचे महत्त्व
३ अ. नियमित आचरणाद्वारे साधला जाणारा योग व्यक्तीचे पालनपोषण करत असणे : श्रीमद्भगवद्गीतेत ‘योगक्षेमं वहाम्यहम् ।’ असे म्हटले आहे. याचा अर्थ ‘माझे नित्य चिंतन करणार्या माणसांचा योगक्षेम मी स्वतः त्यांना प्राप्त करून देतो.’ येथे ‘योग’ याचा अर्थ ‘सूर्य’ असा घेतला, तर आपल्याला सूर्याप्रमाणे वागता आले, तर योग साधता येतो, उदा. सूर्य त्याच्या नियमानुसार वेळेत उगवतो आणि मावळतो. असे तो नियमित करत असतो. त्यात कधीही खंड पडत नाही. आपण असे वागतो का ? आपले आचरण नियमांत आणि नियमित असते का ? नसेल, तर आपण ‘योग’ साधू शकत नाही. जर आपण योग साधला, तर योगच आपले ‘क्षेम’ वहातो, म्हणजे पालनपोषण करतो.
३ आ. व्यक्तीने शक्य होईल, तितके कर्म करत रहायला हवे !
‘गहना कर्मणो गतिः ।’
– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ४, श्लोक १७
अर्थ : कर्माचे तात्त्विक स्वरूप समजण्यास कठीण आहे.
आपण आपल्या कर्माच्या गतीशी स्वतःचा मेळ घालू शकत नाही, तरीही आपल्याला जितके शक्य होते, तितके कर्म करत राहिले पाहिजे.
३ इ. ‘स्व’धर्मानुसार कर्म करणे सर्वथा योग्य !
स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्माे भयावहः ।
– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ३, श्लोक ३५
अर्थ : ‘आपल्या धर्मातच मरणे’, हेही कल्याणकारक आहे; पण दुसर्याचा धर्म भयावह आहे.
स्वतःच्या धर्मानुसार आचरण करणेच सर्वथा योग्य असते. अन्य धर्मांनुसार कर्म करणे भयावह आहे. येथे स्वतःच्या धर्मानुसार, म्हणजे ‘स्व’धर्मानुसार होय. ‘स्व’ म्हणजे मी. ‘माझा धर्म काय आहे ?’, याचा शोध घेतला पाहिजे आणि तो जाणून त्यानुसार प्रत्येक कर्म केले पाहिजे.
४. साधना करण्यासाठी आरोग्य चांगले असणे आवश्यक !
‘आरोग्यं धनसम्पदा ।’ म्हणजे ‘आरोग्य हेच व्यक्तीचे खरे धन आहे.’ व्यक्तीचे आरोग्यच चांगले नसेल, तर तिच्याकडे कोट्यवधी रुपये असले, तरी तिला त्याचा लाभ घेता येत नाही. साधना करण्यासाठीही आरोग्य चांगले असणे आवश्यक असते.
५. ‘संचित आणि प्रारब्ध संपल्याविना मोक्ष मिळणे अशक्य आहे’, हे सांगणारी राजा मुचकुंदाची कथा !
५ अ. स्वर्गात जाऊन देवासुर युद्धात देवांना साहाय्य करणार्या राजा मुचकुंदाने इंद्राकडे मागितलेला वर ! : राजा मुचकुंद याने स्वर्गात जाऊन देवासुर युद्धात देवांना साहाय्य केले होते. युद्ध संपल्यावर राजा मुचकुंद पुन्हा पृथ्वीवर जाऊ इच्छित होता. तेव्हा राजा इंद्राने त्याला सांगितले, ‘‘तू स्वर्गात एक वर्ष राहिल्यामुळे पृथ्वीवर या काळात एक युग संपले आहे. त्यामुळे तेथे आता तुझ्या परिवारातील कुणीच जिवंत नाही.’’ हे ऐकल्यावर राजा मुचकुंद दुःखी झाला आणि त्याने शांतपणे झोपण्याची इच्छा व्यक्त केली. त्याने ‘मला शांत झोपण्याचे आणि कुणीही मधे न उठवण्याचे वरदान द्या’, अशी मागणी केली. त्यानुसार इंद्राने त्याला तसा वर दिला आणि सांगितले, ‘‘तुला कुणी मधे उठवले, तर तो भस्म होऊन जाईल !’’
५ आ. इंद्राने दिलेल्या वरामुळे राजा कालयवन जळून राख होण्याचा प्रसंग : त्यानंतर राजा मुचकुंद झोपला. तेव्हा त्रेतायुग होते. पुढे द्वापरयुगात कालयवन राजा भगवान श्रीकृष्णाच्या मागे लागल्याने श्रीकृष्ण राजा मुचकुंद झोपलेल्या गुहेत येऊन लपला. त्याने लपतांना अंगावरील शेला झोपलेल्या राजा मुचकुंदाच्या अंगावर टाकला. पाठलाग करत आलेल्या कालयवनाने श्रीकृष्णाचा शेला पाहून राजा मुचकुंदाला श्रीकृष्ण समजून उठवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मुचकुंदाला जाग आली आणि त्याची दृष्टी पडताच कालयवन जळून राख झाला.
५ इ. श्रीकृष्णाने राजा मुचकुंदाला चतुर्भुज श्रीविष्णूच्या रूपात दर्शन देणे आणि संचित अन् प्रारब्ध संपवण्यासाठी श्रीकृष्णाच्या सांगण्यानुसार राजा मुचकुंदाने तपश्चर्या केल्यावर त्याला मोक्ष मिळणे : त्यानंतर भगवान श्रीकृष्ण राजा मुचकुंदाच्या समोर आला; पण राजा मुचकुंद त्याला ओळखू शकला नाही. तेव्हा श्रीकृष्णाने राजाला चतुर्भुज श्रीविष्णूच्या रूपात दर्शन दिले. श्रीविष्णूचे दर्शन घेतल्यावर राजा मुचकुंदाने विचारले, ‘‘आता माझे कार्य संपले आहे, तर मी मोक्षाला जाऊ शकतो ना ?’’ तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाला, ‘‘नाही. तुमच्या हातून युद्धात अनेकांच्या हत्या झाल्याने काही संचित आणि प्रारब्ध शिल्लक राहिले आहे. ते संपल्याविना मोक्ष मिळू शकत नाही. ते संपण्यासाठी तुम्हाला नदीकिनारी जाऊन काही वर्षे तपश्चर्या करावी लागेल आणि त्यानंतर मोक्ष मिळेल.’’
त्यानुसार राजा मुचकुंदाने अनेक वर्षे तपश्चर्या केली आणि त्यानंतर त्याला मोक्ष मिळाला.
५ ई. तात्पर्य : साक्षात् भगवान श्रीविष्णूने चतुर्भुज रूपात दर्शन दिले, तरी संचित आणि प्रारब्ध संपवल्याविना मोक्ष मिळू शकत नाही.’
– सोमयाजी प्रकाश आपटेगुरुजी, गोवा (२०.१.२०२१)