वर्ष २०२० मध्ये देशात आत्महत्या करणार्‍यांच्या संख्येत वाढ !

बेरोजगारी आणि गरिबी यांमुळे सर्वाधिक आत्महत्या

  • स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही भारतियांना बेरोजगारी आणि गरीबी यांमुळे आत्महत्या करावी लागते, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! यावरून भारताने गेल्या ७४ वर्षांत प्रगती साधली नाही, हे लक्षात येते ! – संपादक
  • जनतेला साधना न शिकवल्याचाच हा परिणाम आहे ! आरंभीपासूनच जनतेला साधना शिकवली असती, तर जीवनातील प्रत्येक संकटाकडे कोणत्या दृष्टीने पहावे ? आणि त्यातही कसे आनंदी रहावे ? हे जनतेला कळले असते ! – संपादक
प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – ‘राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागा’च्या आकडेवारीनुसार वर्ष २०२० मध्ये १ लाख ५३ सहस्र लोकांनी आत्महत्या केली. ही संख्या मागील वर्षापेक्षा अधिक आहे. विशेष म्हणजे गरिबीमुळे जीव देणार्‍यांची संख्या ७० टक्क्यांपर्यंत वाढली. वर्ष २०२० मध्ये गरिबीमुळे १ सहस्र ९०१ जणांनी आत्महत्या केली. वर्ष २०१९ मध्ये हा आकडा १ सहस्र १२२ होता. बेरोजगारीमुळे आत्महत्या करणार्‍यांची संख्या २ सहस्र ८५१ वरून ३ सहस्र ५४८, म्हणजे २४ टक्के इतकी वाढली. या दोन्ही कारणांमुळे सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या.

वर्ष २०२० मध्ये एकूण १ लाख ५३ सहस्र ५२ लोकांनी आत्महत्या केली. गरिबीमुळे आसाम, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये मिळून एकाच वर्षात आत्महत्या करणार्‍यांची एकूण संख्या ५७१ वरून १ सहस्र ११४ पर्यंत वाढली. याच राज्यांत बेरोजगारीमुळे वर्ष २०१९ मध्ये १ सहस्र ३७९ लोकांनी आत्महत्या केली, तर वर्ष २०२० मध्ये या संख्येत वाढ होऊन ती १ सहस्र ८०८ वर पोचली. झारखंडमध्ये गरिबीमुळे आत्महत्या करणार्‍यांची संख्या वर्ष २०१९ मधील २४ जणांच्या तुलनेत वर्ष २०२० मध्ये घटून १२ वर आली.