पाक नव्हे, तर चीन भारताचा प्रथम क्रमांकाचा शत्रू ! – सी.डी.एस्. बिपीन रावत

‘चीफ ऑफ डिसेन्स स्टाफ’ जनरल बिपीन रावत

टीप : सी.डी.एस्. म्हणजे चीफ ऑफ डिसेन्स स्टाफ (तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख)

नवी देहली – प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळच्या परिसरात दूरपर्यंत सैनिकांची नेमणूक करणे, हा आमचा उद्देश आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे पाकिस्तान नव्हे, तर चीन भारताचा प्रथम क्रमांकाचा शत्रू आहे, असे विधान ‘चीफ ऑफ डिसेन्स स्टाफ’ जनरल बिपीन रावत यांनी केले. ते एका वृत्तवाहिनीच्या संमेलनात बोलत होते. ‘भविष्यात एकाच वेळी भारताला दोन्ही आघाड्यांवर (पाक आणि चीन) या शत्रूंना तोंड द्यावे लागू शकते, असेही रावत यांनी सांगितले.

१. अरुणाचल प्रदेशच्या  सीमेजवळ चीनने गाव वसवले असल्याच्या बातम्यांच्या संदर्भात रावत म्हणाले की, चीन त्याच्या बाजूच्या सीमाभागांत विकासकामे करत आहे. चीनच्या सैन्याने पूर्वीचे बांधकाम पाडून नवीन बांधकाम केले आहे. आजच्या काळामध्ये लोकांना उपग्रह किंवा गूगल यांच्या माध्यमांतून छायाचित्रे मिळतात. यापूर्वी अशा पद्धतीचे तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते. असेच एखादे छायाचित्र समोर आल्यानंतर घुसखोरी केल्याच्या किंवा कुठल्या भूभागावर नियंत्रण मिळवल्याच्या चर्चा होतात.

२. रावत पुढे म्हणाले की, चीनप्रमाणे भारतही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळच्या भागांत मोठ्याप्रमाणात विकासकामे करत आहे. आधी आपण सीमेच्या आजूबाजूच्या परिसरात रस्ते बांधत नव्हतो. पूर्वी ‘चिनी सैनिक येऊन रस्त्यांची हानी करतील’, अशी भीती होती; मात्र आता तसे वातावरण राहिलेले नाही.

३. गलवानविषयी रावत म्हणाले की, गलवान खोर्‍यातील संघर्षानंतर भारत आणि चीन यांचे सैन्य अनेकदा एकमेकांसमोर उभे ठाकले होते. सैनिकांनी एकमेकांच्या एवढ्या जवळ येऊन संघर्ष निर्माण होऊ नये, यासाठी दोन्ही देश प्रयत्न करत आहेत. एप्रिल २०२०च्या पूर्वी जी परिस्थिती होती, ती निर्माण करण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न आहेत.