स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा द्वेष आणि अवमान करणारे साहित्यिक अन् राजकारणी यांचा सहभाग असलेल्या साहित्य संमेलनावर हिंदूंना बहिष्कार घालावासा वाटला, तर चूक ते काय ?
नाशिक – मराठी साहित्यात आपल्या प्रतिभेच्या तेजाने तळपणार्या स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांचा येथे होणार्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या गीतामध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे अनेक साहित्यप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.
पालकमंत्री छगन भुजबळ याच्या हस्ते ८ नोव्हेंबर या दिवशी संमेलनगीताचे अनावरण करण्यात आले. गीतकार मिलिंद गांधी यांनी रचलेल्या या गीतात नाशिकच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक विश्वाच्या इतिहासाचा आढावा घेण्यात आला आहे. या गीतामध्ये थोर क्रांतीकारक, नाशिकचे भूमिपुत्र, साहित्यिक आणि मुंबई येथे वर्ष १९३८ मध्ये झालेल्या २३ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वि.दा. सावरकर यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख नाही.
सावरकर यांचा जन्म २८ मे १८८३ या दिवशी नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे झाला. त्यांनी जवळपास पन्नास पुस्तके लिहिली. त्यात वर्ष १८५७ चे स्वातंत्र्यसमर, अंदमानच्या अंधेरीतून, संगीत उत्तरक्रिया, काळे पाणी, क्रांतीघोष, गांधी आणि गोंधळ, जात्युच्छेदक निबंध, जोसेफ मॅझिनी, नागरी लिपीशुद्धीचे आंदोलन, महाकाव्य कमला, महाकाव्य गोमांतक, माझी जन्मठेप, मोपल्यांचे बंड, शत्रूच्या शिबिरात, संन्यस्त खङ्ग आणि बोधिवृक्ष, सावरकरांच्या कविता, हिंदुत्व, हिंदुत्वाचे पंचप्राण, हिंदुपदपादशाही, हिंदुराष्ट्र दर्शन, क्ष-किरणें अशा अनेक पुस्तकांचा समावेश आहे; मात्र असे असूनही सावरकरांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख साहित्य संमेलनाच्या गीतात नाही. विशेष म्हणजे संमेलनगीतामध्ये साम्यवादापासून ते थेट ‘भुजाभुजातील समता करते स्वागत शब्दप्रभूंचे’ असा उल्लेख आढळतो. नाशिकमधील इतर सर्वच साहित्यिकांचा नावासह उल्लेख आला आहे. तथापि सावरकरांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख टाळला आहे.
सावरकर हिंदुत्वनिष्ठ होते म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख टाळणे, हा खोडसाळपणा आहे !
याविषयी सावरकर अभ्यासक पार्थ बावस्कर म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मराठी साहित्यात मोठे योगदान आहे. ‘सागरा प्राण तळमळला’ असो कि त्यांच्या इतर कविता. ‘काळे पाणी’, ‘माझी जन्मठेप’ अशी पुष्कळ अजरामर साहित्यसंपदा त्यांनी निर्माण केली. विज्ञाननिष्ठ म्हणून त्यांची ओळख होती. खरे तर त्यांना प्रसिद्धीची वगैरे आवश्यकता नाही; मात्र केवळ ते हिंदुत्वनिष्ठ होते म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख टाळणे हा खोडसाळपणा आहे. भगूर आणि नाशिक येथील अनेक सावरकरप्रेमींनी साहित्य संमेलनात सावरकरांच्या नावाचे एखादे व्यासपीठ उभारावे, त्यांचे नाव एखाद्या संमेलनस्थळाला द्यावे, अशी मागणी केली आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर हे स्वतः विज्ञाननिष्ठ आहेत. ते नक्की आमच्या भावना समजून घेतील. ते स्वतःच्या भाषणात सावरकरांचा उल्लेख करतील.’’
(म्हणे) ‘गीत लिहितांना थोडे स्वातंत्र्य घेतले जाते !’ – गीतकार मिलिंद गांधीस्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाशिक येथील साहित्यिकांमधील स्थान सर्वाेच्च आहे. असे असतांना त्यांचा असा अप्रत्यक्ष नव्हे, तर ठोस उल्लेख हवा असतांना गीतकार गांधी यांच्या अशा थातूरमातूर स्पष्टीकरणावर कोण विश्वास ठेवणार ? गीतात स्वातंत्र्य घेणे म्हणजे धडधडीत ऐतिहासिक सत्याचा अपलाप करणे नव्हे ! साहित्य संमेलनासाठी नाशिकच्या साहित्यिकांच्या इतिहासाचे गीत लिहून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्पष्ट उल्लेख टाळणार्या गीताचे गीतकार मिलिंद गांधी म्हणाले, ‘‘कविता आणि गीत लिहितांना थोडे स्वातंत्र्य घेतले जाते. त्यामुळे गाण्यामध्ये ‘स्वातंत्र्याचे सूर्य’ असा उल्लेख आहे. तो एकट्या सावरकरांसाठीच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबियांच्या योगदानासाठीही आहे. मी स्वतः सावरकरप्रेमी आहे. मला सावरकरांविषयी नितांत आदर आहे.’’ |