बैठकीत मांडलेल्या सूत्रांशी आम्ही सहमत आहोत  ! – तालिबान

अफगाणिस्तानप्रश्‍नी आयोजित भारतासह ८ देशांची बैठक

काबुल (अफगाणिस्तान) – भारताच्या पुढाकाराने १० नोव्हेंबर या दिवशी देहली येथे भारतासह ८ आशियाई देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अफगाणिस्तानच्या प्रश्‍नावर बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर ‘अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर जागतिक आतंकवादासाठी होता कामा नये, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच त्या देशात सर्वसमावेशक सरकार स्थापन होणे आवश्यक आहे’, असे घोषणापत्रात म्हटले आहे. याविषयी तालिबानचा प्रवक्ता सुहेल शाहीन म्हणाला की, तालिबान या बैठकीकडे सकारात्मक घडामोडी म्हणून पहात असून आम्ही आशा करतो की, या बैठकीद्वारे अफगाणिस्तानात शांतता आणि स्थिरता आणण्यास साहाय्य होईल. आमच्या देशात शांतता आणि स्थिरता आणण्यासह नागरिकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणार्‍या आणि देशातील गरिबी हटवण्यात साहाय्य करणार्‍या कोणत्याही उपक्रमाला आम्ही पाठिंबा देऊ. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरील बैठकीत जी सूत्रे मांडण्यात आली, त्यांच्याशी आम्ही सहमत आहोत.

या बैठकीत भारत, इराण, रशिया, कझाकिस्तान, किरगिझस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान या ८ राष्ट्रांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सहभागी झाले होते. या बैठकीसाठी भारताने चीन आणि पाकिस्तानलाही निमंत्रित केले होते; परंतु दोन्ही देशांनी बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला.