दोडामार्गमधील रस्त्यांच्या कामाचा कार्यारंभ आदेश निघाल्याने भाजपचे आंदोलन स्थगित

प्रशासनाला आंदोलनाचीच भाषा समजते का ? – संपादक

दोडामार्ग – बांदा-दोडामार्ग-आयी, तसेच दोडामार्ग ते वीजघर या रस्त्यांच्या दुरवस्थेविषयी प्रशासनाचे लक्ष वेधूनही आतापर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्याच्या विरोधात भाजपने ८ नोव्हेंबरपासून चालू केलेले आंदोलन संबंधित कामांचा कार्यारंभ आदेश प्रशासनाकडून निघाल्यानंतर स्थगित केले. या वेळी आमदार नितेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना चेतावणी देताना सांगितले की, ‘उपोषण स्थगित केले म्हणजे सुटलो, असा समज करून घेऊ नका. आमच्याकडे लोकशाहीने दिलेले अन्य मार्गही आहेत’, याची जाणीव ठेवा.

सार्वजनिक बांधकाम विभाग जाणीवपूर्वक या रस्त्यांच्या कामांकडे दुर्लक्ष करत आहे. या रस्त्यांच्या कामाची निविदा काढणे आणि कार्यारंभ आदेश काढणे यांस विलंब होण्यास उत्तरदायी कोण ? हे समजले पाहिजे. याविषयी वरिष्ठ अधिकार्‍यांची भेट घेऊनही आश्‍वासन देण्यापलीकडे काहीही झालेले नाही, असा आरोप करत भाजपने आंदोलन चालू केले होते.

१० नोव्हेंबरला आमदार नितेश राणे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. या वेळी आमदार राणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता अनामिका जाधव यांच्यावर प्रश्‍नांचा भडीमार केला.