रामनाथी (गोवा) – रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ८ नोव्हेंबरपासून ‘युवा साधना शिबिरा’ला प्रारंभ झाला. शिबिराच्या आरंभी सनातनचे पुरोहित श्री. ईशान जोशी यांनी शंखनाद केला, तसेच पुरोहित श्री. ईशान जोशी आणि श्री. चैतन्य दीक्षित यांनी वेदमंत्रपठण केले. यानंतर भगवान श्रीकृष्णाचा श्लोक म्हणून प्रार्थना करण्यात आली. सनातनचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी शिबिरार्थींशी संवाद साधून शिबिराचा उद्देश सांगितला. सनातनच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनीही शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. कु. प्रणिता भोर यांनी शिबिराचे सूत्रसंचालन केले.
या ३ दिवसीय शिबिरात ‘सनातनच्या ग्रंथांचा अभ्यास कसा करावा ?’, ‘समष्टी सेवेला अनुसरून गुणकौशल्यांचा विकास कसा करावा ?’, ‘वेळेचे नियोजन कसे करावे ?’, तसेच ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठीचे प्रयत्न’ आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
ईश्वरप्राप्ती आणि हिंदु राष्ट्रासाठी घडणे, हे ध्येय ठेवून युवा साधकांनी प्रयत्नरत रहायला हवे ! – चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था
साधकांना साधनेची योग्य दिशा मिळावी, यासाठी शिबिरांचे आयोजन केले जाते. शिबिरांतून मार्गदर्शन मिळाल्याने साधकांची साधना अधिक परिणामकारक होते. हे शिबिर म्हणजे भगवंताने गुणवृद्धीसाठी दिलेली अमूल्य संधी आहे. प.पू. भक्तराज महाराज यांनी म्हटले आहे, ‘जिज्ञासू हाच ज्ञानाचा अधिकारी आहे’, हे लक्षात घेऊन या शिबिरात साधकांनी अधिकाधिक शिकण्याचा प्रयत्न करायला हवा. मनुष्यजन्म दुर्लभ असून मोक्षप्राप्ती म्हणजे ईश्वरप्राप्ती करण्यातच मनुष्यजन्माचे सार्थक आहे. युवा साधक ही भावी हिंदु राष्ट्र पुढे चालवणारी पिढी आहेत. त्यामुळे ईश्वरप्राप्ती आणि हिंदु राष्ट्राचे कार्य करण्यासाठी घडणे, हे ध्येय समोर ठेवून युवा साधकांनी प्रयत्नरत रहायला हवे !