हर्षदा रेडकर यांच्यावरील खटल्याशी माझा काहीही संबंध नाही !

अमली पदार्थविरोधी पथकाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे प्रत्युत्तर

समीर वानखेडे

मुंबई – क्रांती रेडकर हिची बहीण हर्षदा रेडकर यांच्यावरचा खटला वर्ष २००८ मधील आहे. त्या वेळी मी नोकरीतही नव्हतो. क्रांती हिच्याशी माझा विवाह वर्ष २०१७ मध्ये झाला, मग माझा या प्रकरणाशी काही संबंध कसा असेल ? असा प्रश्न अमली पदार्थविरोधी पथकाचे मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी उपस्थित केला आहे. अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती यांची बहीण हर्षदा रेडकर यांवरील अमली पदार्थांच्या विषयीच्या एका खटल्याची माहिती ‘ट्विटर’वरून प्रसारित केली आहे. यासमवेत ‘समीर वानखेडे यांचा याच्याशी काय संबंध आहे ?’, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला समीर वानखेडे यांनी वरील उत्तर दिले आहे.