राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य सुनील पाटील हे जहाजावरील अमली पदार्थांच्या मेजवानीचे मुख्य सूत्रधार ! – भाजपचे मोहित कंबोज यांचा आरोप

अमली पदार्थविरोधी पथकाने मुंबईत जहाजातील अमली पदार्थांच्या मेजवानीवर धाड टाकल्याचे प्रकरण

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य सुनील पाटील व भाजपचे मोहित कंबोज

मुंबई – अमली पदार्थविरोधी पथकाने जहाजावरील ज्या अमली पदार्थांच्या मेजवानीवर धाड टाकली, त्या मेजवानीचे मुख्य सूत्रधार राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य सुनील पाटील हे आहेत, असा आरोप भाजपचे मोहित कंबोज यांनी ६ नोव्हेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत केला. मागील २० वर्षांपासून सुनील पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंध आहे. कंबोज यांच्या या आरोपामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

मोहित कंबोज पुढे म्हणाले, ‘‘राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांचे सुनील पाटील हे चांगले मित्र आहेत. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री आणि सर्व नेते यांच्याशी सुनील पाटील यांचे घरचे संबंध आहेत. अनिल देशमुख गृहमंत्री असतांना गृहविभागात अधिकार्‍यांचे स्थानांतर करण्यासाठी सुनील पाटील पैसे घेत होते. याविषयी अन्वेषण झाले पाहिजे. सुनील पाटील यांनी ‘सॅम डिसोझा’ यांना ‘व्हॉट्स अप चॅट’ आणि संपर्क केला आहे. मागील एक मासात या प्रकरणाविषयी खोटे कथानक सिद्ध करण्यात आले. नवाब मलिक यांचे अमली पदार्थांच्या माफियांशी संबंध उघड आहेत. त्यामुळे त्यांना पदावर रहाण्याचा अधिकार नाही. मलिक यांनी मला धमकी दिली आहे; मी घाबरणार नाही. या पत्रकार परिषदेनंतर माझ्या जिवाला धोका आहे.’’