फोंडा – बांदोडा येथील ‘माधवराव ढवळीकर ट्रस्ट’च्या वतीने बांदोडा पंचायतीच्या सहकार्याने ६ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी काशीमठ येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानात ‘दीपोत्सव २०२१’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ‘माधवराव ढवळीकर ट्रस्ट’चे श्री. मिथिल ढवळीकर यांनी बांदोडा पंचायतीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला बांदोडा पंचायतीचे सरपंच राजेश नाईक, उपसरपंच सलोनी गावडे, पंचसदस्य वामन नाईक आणि साईशा नाईक यांची उपस्थिती होती.
पत्रकार परिषदेत श्री. मिथिल ढवळीकर पुढे म्हणाले,‘‘दीपोत्सव २०२१’ या कार्यक्रमाला ६ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता प्रारंभ होणार आहे. या वेळी श्रीकृष्ण पूजन, पाडवा आणि भाऊबीज साजरा केली जाणार आहे. त्यानंतर ‘सारेगम’ कार्यक्रमात पूर्वी सहभाग घेतलेले अभिजीत कोसंबे आणि त्यांचे सहकारी संगीत, नृत्य आणि नाटिका, असे करमणुकीचे कार्यक्रम करणार आहेत. यानंतर पं. प्रल्हाद फडफडकर आणि श्रद्धा जोशी हे संगीत ‘मानापमान’ नाटकातील एका प्रवेशाचे सादरीकरण करणार आहेत. उपस्थित श्रोत्यांना पोह्यांचा फराळ देऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे’’. कोरोना महामारीसंबंधी सर्व नियमांचे पालन करून सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन श्री. मिथिल ढवळीकर आणि सरपंच राजेश नाईक यांनी केले आहे.