परात्पर गुरु डॉ आठवले यांच्याशी श्री महालक्ष्मीस्वरूप असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ एकरूप झाल्याचे जाणवणे

‘२७.१०.२०१९ या दिवशी दुपारपर्यंत नरक चतुर्दशी होती आणि संध्याकाळी अमावास्या चालू झाली. रात्री परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी आणि श्री महालक्ष्मीदेवीच्या अवतारस्वरूप असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ (सद्गुरु बिंदाताई) या रामनाथी आश्रमात ‘श्री लक्ष्मीपूजन’ करत होत्या. त्याच वेळी तमिळनाडूतील ‘मेलमलयनूर’ येथील कपाली काली स्वरूपिणी ‘अंगाल परमेश्वरी’ देवीच्या मंदिरात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी आणि श्री महालक्ष्मीदेवीचे अवतारस्वरूप असलेल्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (सद्गुरु गाडगीळकाकू) ‘काली पूजा’ करत होत्या. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती येथे देत आहे.

१. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू या दोघी लाल रंगाच्या नऊवारी साडीत आणि जगत्जननीच्या विराट स्वरूपात दिसणे अन् त्या दोघी वेगळ्या नसून एकच असल्याचे जाणवणे

या दिवशी सकाळपासून सतत ‘आज दीपावली आणि लक्ष्मीपूजन आहे’, असे विचार मनात येत होते. त्या वेळी ‘मी काय भाव ठेवू ?’, अशी श्री गुरुचरणी प्रार्थना केली. तेव्हा मला पुढील दृश्य दिसले – ‘सद्गुरुद्वयी लाल रंगाच्या नऊवारी साडीमध्ये जगत्जननीच्या विराट रूपात आहेत. त्यांचा उजवा पाय पाताळात आणि डावा पाय वर आकाशात उचलला गेला आहे. संपूर्ण ब्रह्मांड श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी व्यापले आहे. ‘सद्गुरुद्वयी वेगवेगळ्या नसून एकच आहेत’, असे दिसत होते. ‘एका नाण्याला २ बाजू असतात आणि ते नाणे फिरवल्यावर जसे दिसावे’, तसे मला दिसत होते. दोन्ही सद्गुरूंचे तोंडवळे मला आलटून-पालटून त्या विराट रूपात दिसत होते. सद्गुरुद्वयी पृथ्वीवरील आपल्या छाया रूपांकडे साक्षीभावाने बघत होत्या. त्या दोघींची छायारूपे वेगवेगळ्या पूजेचा आनंद घेत होती.

२. श्रीमन्नारायणाच्या तोंडवळ्यावरील मोहक हास्य पाहून धर्मसंस्थापनेसाठी काही विशेष चांगली घटना घडणार असल्याचे जाणवणे

या वेळी श्रीमन्नारायण वैकुंठ लोकात शेषशय्येवर पहुडले होते आणि ते या घटनेचा आनंद घेत होते. ते सतत गोड हसत होते. नारायणाचे हास्य अतिशय मोहक होते. त्याचा केवळ आनंद घेणे एवढेच आपण करू शकत असून त्याच्या पलीकडे जाऊन ‘त्याचा कार्यकारणभाव जाणून घेणे आपल्यासाठी अशक्य आहे’, असे माझ्या लक्षात आले. ‘या दिवशी ब्रह्मांडात धर्मसंस्थापनेच्या दृष्टीने काही विशेष निराळी घटना घडत आहे’, असे मला जाणवले.

३. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू या दोघीही सूक्ष्मातून परात्पर गुरुदेवांशी एकरूप झाल्याचे जाणवणे

या दीपावलीत एक वेगळाच आनंद होत होता आणि दोन्ही श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू यांचे दर्शन सारखे श्री दुर्गादेवीच्या रूपात होत होते. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी एकरूप झाल्या आहेत आणि ‘हीच ती धर्मसंस्थापनेच्या दृष्टीने ब्रह्मांडात घडलेली निराळी घटना असावी’, असे मला जाणवले.

४. पाताळातील मोठ्या वाईट शक्ती शांत बसणे आणि हा धर्मसंस्थापनेचा काळ वर्ष २०२५ चा असल्याचे जाणवणे

हे सगळे घडत असतांना एरवी आरडा-ओरडा करणार्‍या पाताळातील मोठ्या वाईट शक्ती आज शांत होत्या. तेव्हा मला ‘एखादे मूल रुसून कोपर्‍यात जाऊन बसले आहे’, असे वाटत होते. ‘एकप्रकारे वर्ष २०१९ च्या दीपावलीत सूक्ष्मातून धर्मसंस्थापनेचा ‘आकाश कंदिल’च लावण्यात आला आहे’, असे वाटत होते. ‘स्थुलातून तो काळ वर्ष २०२५ असू शकतो’, असे वाटले.

५. सनातनच्या साधकांना लाभलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या जगत्जननी असल्याच्या जाणिवेने त्यांना त्रिवार वंदन करणे

‘हे श्रीमन्नारायणा, साक्षात श्री महालक्ष्मी असलेल्या दोन्ही सद्गुरु म्हणजे तुझी विष्णुमायाच आहे !’ ज्या श्रीविष्णुमायेमुळे विश्वाची उत्पत्ती होऊन सर्व सृष्टीचक्र चालू होते आणि अनंत असा ‘काल’ही ज्या योगमायेच्या अधीन रहातो, ती श्रीविष्णूची शक्ती म्हणजे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू ! ‘गुरुदेवा, तुमची विष्णुमाया म्हणजे प्रकृतीस्वरूपिणी महालक्ष्मीस्वरूप असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू, म्हणजेच त्या सुर-असुर, देव-दानव, ॠषि-सिद्ध, मनुष्य आणि जीवराशी, पंचमहाभूते अन् त्रिगुण यांच्या जननी आहेत’, यात संशय नाही ! अशा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू यांच्या चरणी आम्हा सर्व साधकांचे त्रिवार वंदन !

६. सनातनच्या तीन गुरूंच्या अवतारत्वाची अनुभूती साधकांना मिळणार असल्याची श्रद्धा असणे

‘हे श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवा, मी एक सर्वसामान्य जीव आहे. तुम्ही मला दिलेल्या या आनंदासाठी मी कितीही वेळा कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अपुरीच आहे. हे श्रीमन्नारायणा, आजपर्यंत तुम्ही आम्हा साधकांना सर्व काही दिले आहे. एक दिवस तुमच्या कृपेने सनातनच्या ३ गुरूंच्या अवतारत्वाची अनुभूतीही साधकांना देणार आहात. केवळ आता आम्ही त्या दिवसाची वाट पहात आहोत.’

७. सनातनच्या सर्व साधकांच्या वतीने श्रीगुरुचरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !

७ अ. परात्पर गुरुदेवांविषयी असलेला साधकांचा भाव श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याविषयीही निर्माण होणे आणि सनातनचे तीन गुरु हे वेगळे नसून एकच असल्याची अनुभूती आल्याबद्दल कृतज्ञता वाटणे : ‘हे गुरुदेव, आम्हा साधकांच्या मनात विचारांचे स्फुरण करणारे तुम्हीच आहात. इतके दिवस आम्हा साधकांच्या मनामध्ये ‘तुमच्याविषयी येणारे भावाचे विचार, मनाला वाटणारा तुमचा आधार, तुमच्यासाठी सर्वस्व अर्पण करून तुमच्या चरणी शरण येण्याची प्रेरणा आणि तुम्हीच ‘ईश्वर’ आहात’, अशी श्रद्धा हे आता श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याविषयी वाटणे’, ही केवळ तुमचीच लीला आहे. आम्हा साधकांच्या मनात कधी ‘असे विचार येतील’, असे याआधी आम्हाला वाटले नव्हते, ना कधी ‘तुमच्या नंतर कोण असेल ?’, असे विचार आमच्या मनात आले. दोन्ही सद्गुरु आणि तुम्ही एकच आहात अन् ‘तुम्ही तीन गुरु असूनही ‘एक गुरु’ आहात’, याची पदोपदी अनुभूती येते. अशी अनुभूती अनुभवण्यास दिल्याबद्दल आम्ही सनातनचे सर्व साधक तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत !’

७ आ. भक्तीच्या भावबंधनात ईश्वराला बांधून ठेवण्याचे रहस्य उमजू दिल्याबद्दल कृतज्ञता वाटणे : ‘हे श्री जयंतरूपी नारायण देवा, ‘सद्गुरुद्वयींच्या माध्यमातून आम्हा साधक जिवांना तुझ्या भक्तीचे रहस्य सांगण्यासाठी तुझा हा अवतार आहे’, हे निर्विवाद सत्य आहे. आम्हा साधकांची भक्ती वाढावी’ आणि भक्तीच्या भावबंधनात तुला बांधून ठेवण्याचे रहस्य आम्हा कलियुगातील जिवांना उमगावे’, हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे.

७ ई. सनातनच्या साधकांना ‘परात्पर गुरुदेव हेच ईश्वर आहेत’, अशी अनुभूती दिल्यासाठी कृतज्ञता वाटणे : हे ईश्वरा, पृथ्वीवरील लोक मनुष्यरूपातील भगवंताच्या अवताराची वाट बघत असतांना आम्हाला तू विनासायास भेटलास, आमच्याकडून भक्ती करवून घेतलीस आणि ‘तो भगवंत ‘तूच’ (परात्पर गुरु डॉ. आठवले) आहेस’, याची प्रचीतीही आम्हाला दिलीस’, यासाठी आम्ही सर्व सनातनचे साधक तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत !

८. प्रार्थना

‘हे गुरुदेव, आम्हा सर्व साधकांना तुमच्यासमवेत जन्म घेऊन तुमची सेवा करण्याचा जो आनंद मिळत आहे, तो अन्य कशातही नाही. हे गुरुदेव, आजपर्यंत आमच्याकडून झालेल्या अनंत अपराधांना क्षमा करावी आणि आम्हाला तुमचे दास मानून आम्हा साधकांची सेवा स्वीकारावी. आमच्यावर अखंड कृपा करावी आणि तुमच्या इच्छेतच आमची स्वेच्छा गळून पडावी’, हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’

– श्री. विनायक शानभाग, तिरुवण्णामलै, तमिळनाडू. (२८.१०.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक