उटणे हे रजोगुणी तेजोमय असल्याने ते अंगाला लावतांना घड्याळाच्या काट्याच्या दिशेने बोटांच्या अग्रभागाचा अंगाला स्पर्श करून थोडेसे दाबून लावावे. प्रत्येक ठिकाणी दिलेली उटणे लावण्याची पद्धत ही त्या त्या पोकळीत असणार्या त्रासदायक वायूंच्या गतीला अनुसरून दिली आहे.
१. स्वतःला उटणे लावणे
अ. कपाळ
कपाळावर लावतांना मधल्या तीन बोटांचा उपयोग करून स्वतः लावतांना डावीकडून उजवीकडे या पद्धतीने लावावे. परत उलट्या दिशेने त्यावरून हात फिरवू नये. उलट्या दिशेने हात फिरवल्याने त्रासदायक स्पंदनांची निर्मिती होेते. उटणे लावतांना थांबून परत डावीकडून उजवीकडे यावे. कपाळाच्या पोकळीत साठलेल्या त्रासदायक स्पंदनांची गती ही डावीकडून उजवीकडे असल्याने त्याच पद्धतीने या स्पंदनांना कार्यरत करून उटण्यातील तेजोमय स्पर्शाने त्यांचे विघटन केले जाते.
आ. कपाळाच्या दोन्ही टोकांना बाजूला भुवईजवळ
येथे लावतांना ते बोटांच्या अग्रभागांनी डावीकडून उजवीकडे (खालून वरच्या दिशेने), तसेच उजवीकडून डावीकडे (वरून खालच्या दिशेने) चोळून लावावे. या भागात सुप्त असणार्या त्रासदायक लहरींचे वहन दोन्ही बाजूंनी होत असल्याने दोन्ही बाजूंनी घर्षण करून त्यांच्यातील त्रासदायक स्पंदनांना नष्ट करावे.
इ. डोळ्यांच्या पापण्या
यांवर लावतांना नाकाकडून कानाकडे हात फिरवावा.
ई. नाक
याला लावतांना उजव्या हाताच्या अंगठा आणि तर्जनी यांनी नाकाच्या दोन्ही बाजूंनी खालच्या दिशेने उतरत यावे अन् खाली आल्यावर उटण्याचा वास घ्यावा. उटण्याच्या वासातून प्रक्षेपित होणारा तेजाशी संबंधित गंध फफ्फुसांतील वायूकोषात गेल्याने तेथील त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट होण्यास साहाय्य होते.
उ. मुखाचा वरचा भाग
या भागातून, म्हणजेच नाकाच्या खालून मधली तीन बोटे ठेवून आरंभ करून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने मुखाभोवती गोल, म्हणजेच हनुवटीच्या खड्ड्यातून वर स्वतःच्या डावीकडे जाऊन मुखाभोवतीचा गोल पूर्ण करावा.
ऊ. गालांच्या पोकळी
यांत केंद्रबिंदूशी अनेक टाकाऊ वायू घनीभूत झालेले असल्याने उटणे गालाला लावतांना गालाच्या मध्यभागातून प्रारंभ करून घड्याळाच्या काट्याप्रमाणे बोटांची अग्रे गोल गोल फिरवून लावावे. यामुळे गालातील मध्यपोकळीत घनीभूत झालेली त्रासदायक स्पंदने कार्यरत होऊन त्यांचे विघटन त्याच जागी होण्यास साहाय्य होते.
ए. कानाची पाळी
ही तर्जनी आणि अंगठा यांमध्ये धरून तिथल्या तिथे हलवून उटणे लावावे.
ऐ. दोन्ही कान
दोन्ही कान हातांनी पकडून कानाच्या मागच्या बाजूला केवळ अंगठा ठेवून खालून वरच्या दिशेने फिरवावा.
ओ. मान
मानेच्या मागून मध्यातून दोन्ही हातांची बोटे पुढे विशुद्धचक्राकडे आणावीत.
औ. छाती अन् पोट यांचा मध्यभा
उजव्या हाताच्या तळव्याने छातीच्या मध्यरेषेवर वरून खालच्या दिशेने नाभीकडे हात फिरवत आणणे. यामुळे चक्रे जागृत होतात. त्यानंतर दोन्ही हातांची बोटे छातीच्या मध्यरेषेशी येतील अशा पद्धतीने दोन्ही हात वरून खाली एकाच वेळी फिरवावेत.
अं. काखेपासून कमरेपर्यंत
काखेपासून पितृतीर्थासारखा हात, म्हणजेच अंगठा एका बाजूला आणि चार बोटे दुसर्या बाजूला ठेवून अंगाच्या दोन्ही बाजूच्या रेषेवरून वरून खाली या पद्धतीने फिरवावेत.
क. पाय आणि हात
हाताची बोटे फिरवत पायांवर आणि हातांवर वरून खालच्या दिशेने उटणे लावावे.
ख. पावलाच्या अन् पायाच्या जोडरेषा
पावलाच्या आणि पायाच्या जोडरेषेवर अंगठा अन् तर्जनी यांनी विळखा घालून तो भाग कड्यासारखा घासावा.
ग. डोक्याच्या मध्यभागी
डोक्याच्या मध्यभागी तेल लावून ते हाताने घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरवावे.
२. दुसर्या व्यक्तीला उटणे लावणे
अ. पाठ
दुसर्या व्यक्तीच्या पाठीला उटणे लावतांना पाठीच्या मणक्याच्या रेषेशी दोन्ही हातांच्या बोटांची अग्रे येतील अशा पद्धतीने वरून खालच्या दिशेने दोन्ही हात एकाच वेळी फिरवावेत.
आ. कंबर
दुसर्या व्यक्तीला लावतांना कमरेच्या आडव्या रेषेवर पाठीकडून तिच्या डाव्या बाजूकडून उजवीकडे येऊन परत उजवीकडून डावीकडे जावे. असे परत परत लावावे.
– श्रीचित्शक्ति सौ. अंजली मुकुल गाडगीळ (३.१०.२००६)