समाज, राष्ट्र आणि धर्म यांना सर्वांगीण अभ्युदयाकडे नेण्याचा संदेश देणारी दीपावली हवी !

‘खरी दिवाळी हिंदु राष्ट्रात साजरी होईल’, असे आम्ही म्हणतो, ते याचसाठी !…

सुखसमृद्धीचे प्रतीक असलेली व्यष्टीतील दिवाळी आतापर्यंत आपण उत्साहाने साजरी करत आलो. आज आतंकवाद, भ्रष्टाचार, गुन्हेगारी, बलात्कार, नक्षलवाद, गरिबी, हिंदूंच्या हत्या, गोहत्या आदी दुष्प्रवृत्तींरूपी रज-तमाचा अंधार दिसून येतो. आपला समाज, राष्ट्र आणि धर्म हे या अंधारात खितपत पडले आहेत; म्हणूनच समाजाला अंधारातून प्रकाशाकडे, म्हणजे सर्वांगीण अभ्युदयाकडे नेण्याची आवश्यकता आहे.

वसुबारस हा गोमातेच्या संवर्धनाचे महत्त्व सांगणारा सण !

…गोहत्या कायमच्या बंद व्हायला हव्यात !

वसुबारस म्हटले की ‘गाय तिच्या बछड्याला दूध पाजत उभी आहे (सवत्सधेनु)’, असे चित्र डोळ्यांसमोर येते. वात्सल्यप्रेमाचा तो क्षण किती हृदयस्पर्शी असतो ! पण हा भाव फार काळ टिकून रहात नाही.

हिंदूंच्या कानावर गोहत्येची वृत्ते रात्रंदिन आदळतात. कित्येक किलो टन गोमांसाचे ट्रक सापडल्याची वृत्ते येत असतात. गोरक्षक जिवाची बाजी लावून कित्येक वर्षे गोरक्षण करत आहेत; परंतु धर्मांधांना अपेक्षित अशी कठोर शिक्षा अद्यापही होतांना दिसत नाही. १३ राज्यांत गोहत्या बंदीचा कायदा असूनही धर्मांधांचे लांगूलचालन आणि भ्रष्टता यामुळे गोमाता आणि तिचे वासरू यांच्या वेदना अद्याप संपलेल्या नाहीत… !

नरकचतुर्दशी आणि भाऊबीज हे स्त्रियांच्या सन्मानाचे सण !

…स्त्रियांना सुरक्षित वाटेल असे वातावरण देशात सर्वत्र हवे !

नरकचतुर्दशी या तिथीला भगवान श्रीकृष्णाने नरकासुराच्या बंदीवासातील सोळा सहस्र स्त्रियांना मुक्त केले आणि नरकासुराचे पारिपत्य केले. भाऊबीजेला बहिणीच्या रक्षणाची ग्वाही देणारी ओवळणी भाऊ बहिणीला घालत असतो.

सांप्रतकाळी युवती आणि महिला यांवरील अत्याचारांनी परिसीमा गाठली आहे. त्यांची स्थिती पहाता त्यांच्या रक्षणासाठी कोणत्याही वेळी कुठेही धाव घेणे अगत्याचे झाले आहे. स्त्रियांना पूर्णतः सुरक्षित वाटेल, असे वातावरण निर्माण होण्यासाठी प्रजा धर्माचरणी असणे आवश्यक आहे. रामराज्यात स्त्रिया सुरक्षित होत्या. तसे रामराज्य, म्हणजेच छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याप्रमाणे हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी पुढाकार घेणे, ही काळाची आवश्यकता आहे.

धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन हे सन्मार्गाने धनप्राप्ती करण्याची शिकवण देणारे सण !

…भ्रष्टाचाराचा असुर संपवण्याची मनीषा हवी !

धनत्रयोदशीचा दिवस सन्मार्गाने धनप्राप्ती करण्याची शिकवण देतो. ‘चांगल्या नियतीच्या आधारावर धनप्राप्ती करून त्याचा विनियोग सत्कार्यासाठी करणे’, ही हिंदु धर्मातील शिकवण आहे. देशात नेमके याच्या उलट घडत असून भारत देश ‘आशिया खंडात प्रथम क्रमांकाचा भ्रष्ट देश’, अशी त्याची कुप्रसिद्धी झाली आहे. शासकीय स्तरावरील भ्रष्टाचार आणि घोटाळे उघड झाले आहेतच. सरकारमधील पदाधिकारी असे करायला लागल्यावर जनतेपुढे कोणते आदर्श रहाणार ? जनतेमधील काही नतद्रष्ट वाममार्गाला लागले आणि देशातील भ्रष्टाचार बळावला. ही सर्व स्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन आदर्श हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे.

सर्वांत मोठा दीपोत्सवाचा सण !

…पण चिनी दिव्यांची आयात नको !

चिनी पणत्या, रोषणाईचे दिवे यांसारख्या चिनी मालावर बहिष्कार घातला नाही, तर उद्या चीनमधील देवता आणि चीनचा साम्यवादही आपल्या घरात यायला वेळ लागणार नाही. प्रथम चीनहून हसणारा बाहुला (म्हातारा) घराघरात पोचला. आपल्या मंगलमय दिवाळीच्या सणातील महत्त्वाचे आकाशकंदिलही चीनहून यायला आरंभ झाला, तरी त्या विरोधात कुणीही चकार शब्द काढत नाही. चीन प्रतिदिन भारताच्या सीमेवर कुरघोडी करत आक्रमणाच्या पावित्र्यात असतांना आपल्या सणांना चिनी वस्तू घेणे म्हणजे आपल्याच नाशासाठी शत्रूला पैसे पाठवण्यासारखे आहे ! त्यामुळे चिनी वस्तूंवर बहिष्कार टाका.

(संदर्भ – दैनिक ‘सनातन प्रभात’, वर्ष २०१८)