लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी स्थानिक धर्मगुरूंचे साहाय्य घ्या ! – पंतप्रधान मोदी यांचे जिल्हाधिकार्‍यांना आवाहन

केवळ लसीकरणासाठीच नव्हे, तर देशातील प्रत्येक समस्या आणि योजना यांसाठी हिंदूंच्या धर्मगुरूंचे साहाय्य घेतले, तर अधिकाधिक लाभ होईल, याचा विचार सरकारने करावा ! – संपादक

पंतप्रधान नरेंद्र मोदी जिल्हाधिकार्‍यांशी संवाद साधताना

नवी देहली – कोरोनाच्या संदर्भातील लसीविषयी लोकांमध्ये असलेली अफवा आणि गोंधळ हे एक आव्हान आहे. यावर उपाय म्हणजे लोकांना अधिकाधिक जागरूक करणे. लसीकरणाचे वेग वाढवण्यासाठी तुम्ही स्थानिक धर्मगुरूंचेही साहाय्य घेऊ शकता. लसीविषयी धर्मगुरूंचा संदेश लोकांपर्यंत पोचवण्यावरही आपल्याला विशेष भर द्यावा लागेल, असे आवाहन पंतप्रधोन मोदी यांनी देशातील लसीकरणाविषयी घेतलेल्या ऑनलाईन आढावा बैठकीत केले. या बैठकीस लसीकरणाची अल्प गती असलेल्या देशातील ४० जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी जिल्हाधिकार्‍यांना उद्देशून म्हणाले की, तुमच्या जिल्ह्यांमध्ये लसीकरण वाढवण्यासाठी तुम्हाला नवीन नाविन्यपूर्ण मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न करावा लागेल. तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील प्रत्येक गाव आणि प्रत्येक शहर यांसाठी वेगळी रणनीती बनवायची असेल, तर तीही बनवा. तुम्ही प्रदेशानुसार २० – २५ लोकांचे पथक बनवूनही हे करू शकता.