‘क्लीन चीट’ मिळत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात मुनव्वरचा एकही कार्यक्रम होऊ देणार नाही ! – सिद्धांत मोहिते, संस्थापक अध्यक्ष, सॅफ्रॉॅन थिंक टँक

हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी याचा कार्यक्रम रहित होण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करणार्‍या ‘सॅफ्रॉॅन थिंक टँक’चा आदर्श समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी घ्यावा ! – संपादक 

श्री. सिद्धांत मोहिते

मुंबई, २८ ऑक्टोबर (वार्ता.) – हिंदूंच्या देवता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह टिपण्या केल्या प्रकरणी मुनव्वर फारूकी याला अटक होऊन सध्या तो जामिनावर बाहेर आहे. मुनव्वर याने प्रथम न्यायालयात निर्दाेष मुक्त व्हावे, मग कार्यक्रम करावेत. जोपर्यंत ‘क्लीन चीट’ मिळत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात मुनव्वर फारूकी याचा एकही कार्यक्रम होऊ देणार नाही, अशी चेतावणी ‘सॅफ्रॉॅन थिंक टँक’चे संस्थापक अध्यक्ष श्री. सिद्धांत मोहिते दिली आहे. मुनव्वर याचे नियोजित कार्यक्रम रहित करण्यात आल्यावर दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना श्री. सिद्धांत मोहिते यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

या वेळी सिद्धांत मोहिते म्हणाले, ‘‘दाऊद याच्या जीवनावर आधारित ‘डोंगरी टू दुबई’ या पुस्तकावर आधारित मुनव्वर ‘डोंगरी टू नोवेअर’ हा कार्यक्रम घेत आहे. ज्या मुंबई पोलिसांनी दाऊद याला दुबईला पळवून लावले. त्याचा आदर्श घेऊन कार्यक्रम करणार्‍याचे स्वागत मुंबई पोलीस कसे काय करू शकतात ? यापूर्वी मुनव्वर याच्यावर असलेल्या आरोपांविषयी चालू असलेला खटला त्याने जिंकावा. हा खटला जिंकल्यास आम्ही त्याच्या कार्यक्रमाला विरोध करणार नाही; मात्र त्यापूर्वी त्याने कार्यक्रम केल्यास ते कार्यक्रम आम्ही होऊ देणार नाही. मुनव्वर याचा कार्यक्रम होऊ नये, यासाठी आम्ही राज्यपाल, मुख्यमंत्री, मुंबईचे पोलीस आयुक्त, तसेच मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांत पत्र पाठवले होते. या प्रकरणी आम्ही स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकार्‍यांची भेट घेऊन मुनव्वर याच्या कार्यक्रमामुळे कायदा-सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याची माहिती दिली. कार्यक्रम घेण्यात येऊ नये, यासाठी प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाच्या व्यवस्थापकांनाही आम्ही पत्र दिले होते. या कार्यक्रमाच्या विरोधात आम्ही ‘ट्विटर’वर घेतलेला ‘#GoBackMunawar’ हा ‘हॅशटॅग’ भारतात चौथ्या क्रमांकावर पोचला. याला ५० सहस्र जणांनी ‘लाईक’ केले, तर ५ कोटीपर्यंत हा संदेश पोचला. सर्व मुंबईतील युवकांसह समस्त मुंबईकर, तसेच समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी केलेल्या विरोधामुळे हा कार्यक्रम रहित झाला.’’