तत्त्वनिष्ठ राहून यजमानांना साधनेत साहाय्य करणार्‍या ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) प्रमिला केसरकर (वय ६६ वर्षे) !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६८ टक्के पातळीच्या साधिका सौ. प्रमिला केसरकर यांचा निधनानंतरचा दहावा दिवस २७ ऑक्टोबर या दिवशी आहे. त्यांच्याविषयी श्री. रामचंद्र कुंभार यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत. हे लिखाण सौ. केसरकर यांचे निधन होण्यापूर्वीचे आहे.

कै. (सौ.) प्रमिला केसरकर

१. ‘काकू नेहमी आनंदी आणि समाधानी असतात. काकांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयात त्या नेहमी सहभागी असतात.

२. तत्त्वनिष्ठ राहून यजमानांचे स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू सांगितल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी कौतुक करणे

श्री. रामचंद्र कुंभार

एकदा परात्पर गुरु डॉक्टर कुडाळ येथे साधकांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. त्या वेळी तिथे जिल्ह्यातील पुष्कळ साधकही उपस्थित होते. परात्पर गुरु डॉक्टरांनी अधिवक्ता केसरकरकाकांना त्यांच्याजवळ बोलावून घेतले आणि तेथे उपस्थित साधकांना ‘काकांकडे पाहून काय जाणवते ?’, याचे निरीक्षण करायला सांगितले. तेव्हा काही साधकांनी काकांकडे पाहून चांगले वाटत नसल्याचे सांगितले. त्यानंतर गुरुदेवांनी सौ. केसरकरकाकूंना ‘काकांकडे पाहून काय जाणवते ?’, याविषयी सांगण्यास सांगितले. तेव्हा काकूंनी सर्वांसमोर तत्त्वनिष्ठ राहून काकांच्या साधनेला हानीकारक असणारे त्यांचे स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू मोकळेपणाने सांगितले. काकांकडे ‘यजमान’ म्हणून न पहाता ‘एक साधक’ या नात्याने पाहून त्यांनी काकांचे सर्व स्वभावदोष सांगितले. त्या वेळी गुरुदेवांनी काकूंच्या या गुणाचे कौतुक केले आणि तेव्हापासून काकांनीही त्यांच्यातील स्वभावदोषांकडे लक्ष देऊन जोमाने साधना चालू केली.’

– श्री. रामचंद्र (दादा) कुंभार (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.१०.२०२१)


गुर्वाज्ञा म्हणून सर्वस्वाचा त्याग करणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे अधिवक्ता रामदास केसरकर (वय ६९ वर्षे) !

अधिवक्ता रामदास केसरकर

१. परिस्थिती स्वीकारणे

अ. एकदा काकांच्या कुडाळ येथील रहात्या घरावर वीज पडली. त्यामुळे घरातील पुष्कळ साहित्य जळून गेले. देवाच्या कृपेने त्या वेळी घरात कुणीही नसल्याने जीवित हानी झाली नाही. वीज पडल्याने त्यांच्या घराची पुष्कळ हानी झाली, तरी काका स्थिर होते.

आ. काका देवदहून कुडाळ येथे आल्यावर त्यांना सेवाकेंद्रात रहायला खोली नव्हती आणि त्यांचे घरही वीज पडल्याने रहाण्याजोगे नव्हते. त्या वेळी ते सेवाकेंद्राजवळ असलेल्या एका पत्र्याच्या खोलीत रहात होते. त्या खोलीचे दार आणि पत्रे चांगल्या स्थितीत नव्हते, तरीही तिथे ते आनंदाने रहायचे.

२. अहं अल्प असणे

वर्ष १९९८ पासून केसरकरकाका सनातनच्या कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील सेवाकेंद्रात होते. त्या वेळी त्यांच्याजवळ ३ चारचाकी आणि ४ दुचाकी गाड्या होत्या. ते श्रीमंत असूनही त्यांच्या वागण्यातून मोठेपणा अथवा अहंभाव जाणवत नव्हता. काकांमध्ये इतरांशी बोलणे, साधकांच्या घरातील नातेवाईकांची चौकशी करणे आणि त्या माध्यमातून साधकांशी जवळीक साधणे, हे गुण आहेत.

३. त्यागी वृत्ती

अ. काका त्यांच्या सासूरवाडीला रहात होते. तेव्हा तेथील परिसरात जांभूळ, फणस, आंबा, काजू इत्यादी झाडे होती. काकांनी त्या झाडांची फळे काढून ती गोवा, मिरज अन् देवद येथील आश्रमात पाठवली.

आ. पूर्वी काका घरी रहात असतांना त्यांच्याकडे तेलाच्या बरण्या आणलेल्या असायच्या. त्यातील तेल संपल्यावर ते रिकाम्या बरण्या साधकांना वापरण्यासाठी आणून द्यायचे.

इ. काकांकडे असलेली सायकल त्यांनी एका साधकाला आवश्यकता असल्याने वापरायला दिली.

४. आज्ञापालन

अ. एका संतांनी काकांकडे असलेल्या ३ चारचाकी गाड्या विकायला सांगितल्या. तेव्हा काकांनी एका व्यक्तीकडे गाड्यांच्या चाव्या दिल्या आणि त्यालाच त्या गाड्या विकायला सांगून काका गोव्याला सेवेसाठी आले.

आ. परात्पर गुरु डॉक्टरांनी काकांना त्यांचे सर्व साहित्य घेऊन सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमात जाण्यास सांगितले. काका लगेच देवद आश्रमात आले. देवदला काही दिवस राहिल्यानंतर गुरुदेवांनी पुन्हा त्यांना कुडाळ येथे यायला सांगितले. त्याप्रमाणे ते कुडाळला आले.

५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती भाव

आम्ही रामनाथी आश्रमातून कुडाळ येथे गेल्यावर काका आम्हाला बोलावून ‘गुरुदेव कसे आहेत ?’, अशी आदराने चौकशी करायचे.’

– श्री. रामचंद्र (दादा) कुंभार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.१०.२०२१)